शाहरुखला भेटायला आलेला पाकिस्तानचा तरुण पोहोचला भारताच्या तुरुंगात

  • रविंदर सिंह रॉबिन
  • बीबीसी हिंदीसाठी अमृतसरहून
इमरान वारसी-अब्दुल्लाह

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या प्रेमिकेला भेटण्यासाठी बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेललेल्या हामिद निहाल अन्सारीला काही दिवसांपूर्वीच भारतात परत पाठविण्यात आले. पाकिस्तानी तुरुंगात सहा वर्षांची शिक्षा पूर्ण करुन हामिद आपल्या मायदेशी परतला.

बुधवारी हामिदसारख्याच दोन प्रेमवीरांची सुटका करण्यात आली...फरक इतकाच होता की हे दोघे पाकिस्तानी होते आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतात घुसले होते.

अटारी वाघा बोर्डरवर भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात दिले. या दोघांपैकी एकजण आपल्या मामेबहिणीच्या प्रेमात पडून भारतात आला होता. तर दुसरा थेट शाहरुख खानच्या ओढीनं भारतात दाखल झाला होता.

इमरान वारसी आणि अब्दुल्लाह शाह अशी या दोघांची नावं आहेत.

पाकिस्तानमधील स्वात प्रांतातील रहिवासी असलेला अब्दुल्लाह शाहरुखचा प्रचंड चाहता आहे. 21 वर्षीय अब्दुल्लाहला ऑटिझमने ग्रस्त आहे. आपल्या कुटुंबासोबत तो वाघा बोर्डरवर एका कार्यक्रमासाठी आला होता. कदाचित त्याचवेळी त्यानं शाहरुखला भेटायचंच हे ठरवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या कुटुंबाचा डोळा चुकवून तो कागदपत्रांशिवाय भारतीय सीमेत घुसला. अब्दुल्लाहला शाहरुख तर भेटला नाही, तुरुंगाची हवा मात्र खावी लागली. अब्दुल्लाहनं जवळपास दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगली. अखेरीस बुधवारी त्याची सुटका करण्यात आली.

इमराननं भोगला 10 वर्षांचा तुरुंगवास

इमरान वारसीची प्रेमकथा तर हिंदी चित्रपटांच्या गोष्टीसारखी आहे. इमरान 2004 साली आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कोलकात्याला आले होते. तिथे ते त्यांच्या मामेबहिणीच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न केले आणि त्यांना दोन मुलंही आहेत.

मात्र 2008 मध्ये इमरानना कारस्थान रचण्याच्या आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. 10 वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर इमरान वारसी मायदेशी परत गेले.

पुन्हा कागदपत्रांसह भारतात येणार

फोटो स्रोत, BBC/RAVINDER SINGH

सुटकेनंतर सीमापार करुन आपल्या भूमीवर गेलेले अब्दुल्लाह आणि इमरान थोडावेळासाठी भावूक झाले. त्यांनी वाकून मायभूमीला अभिवादन केलं, जमिनीचं चुंबन घेतलं.

या दोघांनी माध्यमांशी संवादही साधला. तुरुंगवास भोगल्यानंतरही अब्दुल्लाहचं शाहरुख प्रेम कायम आहे. शाहरुखला भेटण्यासाठी पुन्हा भारतात येण्याचीही त्याची तयारी आहे.

"व्हिसा आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करुनच मी आता भारतात परत येईन आणि शाहरुखला भेटेन," अब्दुल्लाहनं सांगितलं. आपण शाहरुखचे सगळे चित्रपट पाहिल्याचं सांगून त्यानं बॉर्डरवरच शाहरुखची 'सिग्नेचर' पोझही घेऊन दाखवली. भारत खूप आवडत असल्याचंही अब्दुल्लाहनं आवर्जून नमूद केलं.

इमरान वारसीचं कुटुंब भारतात आहे. त्यांना घेऊन जाण्यासाठी परत भारतात येणार असल्याचं वारसींनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)