अँजेलिना जोली राजकारणात येणार? 'जिथे गरज आहे, तिथे जायलाच हवं'

अँजेलिना जोली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अँजेलिना जोली

हॉलिवुड अभिनेत्री अँजेलिना जोलीने राजकारणात एन्ट्री करण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत.

"20 वर्षांपूर्वी मी राजकारणात येण्यास ठाम नकार दिला असता, पण मला वाटतं, जिथं माझी गरज आहे तिथं मी जायलाच हवं," असं अँजेलिनानं बीबी टूडे प्रोगामला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

अँजेलिना ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या शरणार्थींसाठीच्या UN Refugee Agency ची विशेष दूत आहे. शिवाय, शरणार्थी, लैंगिक हिंसाचार आणि संरक्षण तसंच संवर्धनासारख्या अनेक समस्यांवर ती सक्रिय भूमिका मांडत असते.

शुक्रवारी ती बीबीसीच्या टूडे प्रोगामची पाहुणी संपादक होती. यावेळी जस्टिन वेब यांच्याबरोबरील विस्तृत मुलाखतीत तिनं अमेरिकेचं राजकारण, सोशल मीडिया, लैंगिक हिंसाचार आणि जागतिक शरणार्थी संकटांविषयी चर्चा केली.

राजकारणात येणार का, या प्रश्नावर तिनं सांगितलं, "तुम्ही मला हा प्रश्न 20 वर्षांपूर्वी विचारला असता तर ही हसतपणे याला नकार दिला असता. जिथं माझी गरज आहे मी तिथं जायला नेहमीच तयार आहे, असं मी नियमितपणे म्हणत आले आहे. राजकारणासाठी मी फिट आहे की नाही, हे मला माहिती नाही. कारण माझी काही गुपितं आहेत की नाही, हेही मला माहिती नाही, असा विनोद मीच केला होता."

"सरकारसोबत काम करायला मी सक्षम आहे तसंच लष्करासोबत काम करायलाही मी सक्षम आहे. त्यामुळे खूप काही करता येईल, अशा जागेवर सध्या मी बसली आहे."

आताच तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नावर मात्र तिनं शांत राहणं पसंत केलं. डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या 30 ते 40 जणांच्या यादीत तू असणार, असं वेब यांनी म्हटल्यानंतर तिनं फक्त 'धन्यवाद' असं उत्तर दिलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अँजेलिना जोली

मुलांच्या सोशल मीडियावरील वागणुकीबद्दलही तिनं चर्चा केली. इतर पालकांप्रमाणे मीही पूर्णपणे माझ्या मुलांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, असं तिनं म्हटलं आहे.

"किशोरवयीन मुलांशी संबंधित अशा काही बाबी आहेत ज्यांना आमची पिढी समजू शकत नाही. ते सतत फोनवर नेमकं करत आहेत, यातील अर्ध्याहून अधिक गोष्टी आम्हालाही समजत नाही. माझ्या एकाही मुलानं मला फेसबुकवर अकाउंट तयार करण्यासाठी विचारलं नाही आणि मीसुद्धा अद्याप फेसबुक वापरत नाही.

"आमचं कुटुंब अद्यापही फेसबुकवर आलेलं नाही," ती सांगते.

फोटो स्रोत, UNHCR/ANDREW MCCONNELL

फोटो कॅप्शन,

अँजेलिना जोली शरणार्थी, लैंगिक हिंसाचार आणि संरक्षण तसंच संवर्धनासारख्या अनेक समस्यांवर ती सक्रिय भूमिका मांडत असते.

मुलांसाठीच्या एका नवीन बातम्या कार्यक्रमासाठी ती बीबीसीबरोबर काम करत आहे. पुढच्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर या कार्यक्रमाला सुरुवात होईल.

7 ते 12 या वयोगटातील मुलांचं तंत्रज्ञान, पर्यावरण आणि सोशल मीडियाशी संबंधित आंतरराष्ट्रीय बातम्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ती बीबीसीच्या कार्यक्रमात कार्यकारी निर्माती म्हणून काम करेल.

"एक आई म्हणून मला माझ्या मुलांसोबत बसून हा कार्यक्रम पाहता येईल. त्यांना जगाबद्दल योग्य ती कल्पना मिळतेय की नाही, हेही पाहता येईल," असं ती सांगते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)