इजिप्त: गिझा पिरॅमिडजवळ बाँबस्फोट, 4 पर्यटकांचा मृत्यू

बस

फोटो स्रोत, Reuters

इजिप्तमध्ये एक बस पर्यटकांना घेऊन जात असताना रस्त्याच्या बाजूला बाँबस्फोट झाला. त्यामध्ये व्हिएतनामचे 3 नागरिक आणि एका स्थानिक टुरिस्ट गाइड अशा 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

बस व्हिएतनामच्या एकूण 14 पर्यटकांना घेऊन पिरॅमिडकडे जात होती. त्यावेळी रस्त्याजवळ असलेल्या भिंतीमागे ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाला, अशी माहिती इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा माडबुली यांनी दिली. यामध्ये आणखी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं.

स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सांयकाळी 6.15 वाजता हराम जिल्ह्यातल्या गिझा पिरॅमिडकडे जाणाऱ्या मारियुतिया रस्त्यावर ही घटना घडली.

बस वेगळ्या मार्गाने का नेण्यात आली?

याआधी पर्यटक बस ठराविक मार्गाने नेण्यात यायची. पण अपघात झालेली बस सुरक्षा अधिकाऱ्यांना कल्पना न देता वेगळ्या मार्गाने नेण्यात आली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये बसचा ड्रायव्हर वगळता इतर सर्व व्हिएतनामचे नागरिक आहेत. इजिप्तच्या शेजारी देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

हल्ला कुणी केला?

अजूनपर्यंत कुणीही या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. पण इस्लामिक स्टेटने याआधी इजिप्तमध्ये परदेशी पर्यटकांवर अशा प्रकारचे हल्ले केलेले आहेत.

गेल्यावर्षी (2017) प्रसिद्ध लाल समुद्राजवळ एका रिसॉर्टमध्ये जर्मनीच्या दोन पर्यकटांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

ऐन पर्यटनाच्या मोसमात बाँबस्फोट

सध्या इथला पर्यटनाचा व्यवसाय तेजीत आहे. तसंच इजिप्तमधला अल्पसंख्याक ख्रिश्चन समुदाय ख्रिसमस सण साजरा करत आहे. या दोन कारणांमुळे इजिप्तमधली सुरक्षा व्यवस्था अगोदरच कडक करण्यात आली होती, असं बीबीसी अरेबिकच्या प्रतिनिधी सल्ली नाबील यांनी सांगितलं.

पर्यटन हा इजिप्तमधला मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. 2010मध्ये हा व्यवसाय शिगेला पोहोचला होता. त्यावर्षी 1.4 कोटी पर्यटांनी इजिप्तला भेट दिली होती. पण अरब स्पिंगनंतर या व्यवसायाला उतरती कळा लागली.

फोटो स्रोत, EPA

2015मध्ये शर्म-अल-शेख येथे कट्टरपंथींयांनी रशियन प्रवासी विमानावर केलेल्या हल्लात 224 जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)