जपानमध्ये 100 लोकांसाठी 160 नोकऱ्या उपलब्ध आहेत, पण...

  • ब्रायन लुफ्किन
  • बीबीसी कॅपिटल
जपानी लोक

फोटो स्रोत, Getty Images

भारतात सध्या सगळ्यात मोठा प्रश्न कुठला असेल तर तो बेरोजगारी. त्यावर उत्तर शोधण्यासाठी केंद्र सरकार आणि इतर संस्था आपआपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. पण जपान हे त्यावरचं हमखास उत्तर ठरू शकतं.

दहा वर्षापूर्वी जेव्हा मी जपानच्या ग्रामीण भागात फिरायचो तेव्हा मला क्वचितच कुणी परदेशी माणूस नजरेस पडायचा.

इतकंच नव्हे तर टोकियोमध्येसुद्धा उंचपुरा अमेरिकन नागरिक बघितला की जपानी लोक दचकायचे.

पण गेल्या महिन्यात जेव्हा मी जपानला गेलो, तेव्हा तिथला बदल बघून मी हैराण झालो. शॉपिंग सेंटर्स, कॅफे प्रत्येक ठिकाणी बिगरजपानी लोक काम करताना दिसत होते.

टोकियोच्या उत्तरेला असलेल्या कनजावा शहरात मी एका बार रेस्टॉरंटमध्ये काकेशियाई भागातून आलेल्या एका युवकाला सुशी शेफची मदत करताना पाहिलं.

दुसऱ्या एका हॉटेलातसुद्धा एका गैरजपानी वेटरनं आम्हाला जेवण वाढलं, इतकंच नाही तर तो आमच्याशी इंग्रजीतून बोललादेखील.

फोटो स्रोत, Alamy

थोडक्यात काय तर जपानचं वेगानं आंतरराष्ट्रीयीकरण होत चाललंय आणि ही प्रक्रिया आणखी वेगानं होणार आहे.

जपानला काम करणारे लोक हवेत

अर्थात या बदलामागे जपानची डेमोग्राफी आहे. इथले लोक वेगानं म्हातारे होता आहेत आणि लोकसंख्याही घटत चालली आहे.

जपानमध्ये पर्यटनही वाढत चाललंय आणि 2020च्या टोकियो ऑलिम्पिकची तयारीसुद्धा जोरदार सुरू आहे आणि इथं परदेशी लोकांचं काम करणाऱ्यांचं प्रमाण वाढण्यामागे हेसुद्धा महत्त्वाच कारण आहे.

जपानला काम करणाऱ्या लोकांची प्रचंड गरज आहे, ते लोक दुसऱ्या देशातूनच मिळू शकतात.

घटणारी लोकसंख्या आणि वेगानं म्हातारा होणारा देश याची कल्पना जपानला काही दशकं आधीच आली होती. पण त्या काळातील सरकारांनी कुठलीही पावलं उचलली नाहीत, त्यामुळे आज हे परिणाम पाहायला मिळत आहे.

कमी वेतनावर काम करतील असे मजूर परदेशातून आणण्यावर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा भर आहे.

त्यामुळेच 2025पर्यंत लाखो ब्लू कॉलर नोकऱ्यांमध्ये परदेशी नागरिकांची भरती करण्याचा आबे यांचा प्रस्ताव वादात सापडलाय.

जास्त म्हातारे लोक आणि तेवढेच परदेशी

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील शनिवारी जपानच्या संसदेनं आबे यांचा हा अभूतपूर्व प्रस्ताव मान्य केला.

याअंतर्गत पुढच्या पाच वर्षांत परदेशातून तीन लाख मजुरांना जपानमध्ये कामाची संधी मिळणार आहे. ज्याची सुरुवात एप्रिल 2019पासून होईल.

भूपाल श्रेष्ठ हे इथल्या युनिव्हर्सिटीत लेक्चरर आहेत. ते टोकियोच्या सुगिनामी वॉर्डात राहतात. ही रहिवाशी वस्ती अरुंद गल्ल्या, जुने कपडे आणि प्राचीन वस्तूंच्या दुकानासाठी प्रसिद्ध आहे.

भूपाल 15 वर्षांपासून जपानमध्ये राहतात. त्यांच्यासाठी कायमचं नागरिकत्व मिळवणं सोपं नव्हतं.

अगदी छोट्याछोट्या गोष्टीत, म्हणजे राहण्यासाठी घर, बँक खातं उघडणं किंवा क्रेडिट कार्ड मिळवतानाही त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला.

परदेशी कामगारांची गरज

ते सांगतात "जपान आता परदेशी लोकांचं स्वागत करतो आहे, मात्र काही ठिकाणी अजूनही ते जुन्या विचारात आणि रूढींमध्ये अडकलेले आहेत."

"अर्थात हे परदेशी लोकांसोबत सांस्कृतिक मेळ वाढवण्यात कमतरता असल्यामुळेच आहे," असं ते सांगतात

भूपाल श्रेष्ठ मूळचे नेपाळचे आहेत.

ते जपानमध्ये काम करणाऱ्या 12.8 लाख परदेशी लोकांपैकी एक आहेत. 2008मध्ये जपानमध्ये फक्त 4 लाख 80 हजार परदेशी कामगार आहेत.

जपानमध्ये परदेशी लोकांची संख्या इतक्या वेगाने वाढल्यानंतरही ती एकूण लोकसंख्येच्या फक्त 1 टक्का इतकीच आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

टोकियोमध्ये ऑलिम्पिकची तयारी सुरू आहे.

त्याचवेळी ब्रिटनमध्ये 5 टक्के तर अमेरिकेत 17 टक्के परदेशी कामगार आहेत. जपानमध्ये जे परदेशी लोक काम करत आहेत, त्यातील 30 टक्के लोक चीनचे आहेत.

सांस्कृतिक ओळख

शिवाय व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि ब्राझिलियन लोकांची संख्याही बरीच आहे. जपानमध्ये परदेशी लोकांची संख्या कमी असण्याचं कारण म्हणजे तिथं कधी परदेशी कामगारांचं नीट स्वागत झालं नाही.

हे द्विपराज्य कधीकाळी अगदी वेगळं होतं. 19व्या शतकात इथं घुसखोरी करणाऱ्यांना किंवा इथून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चक्क मृत्युदंड दिला जायचा.

नवं जपान स्वत:ला समरूपी समाज मानतो. ज्याची ओळख इथली शक्तिशाली संस्कृती आहे.

इथं असा समज आहे, की परदेशी नागरिक आले तर इथल्या भूमिपुत्रांचा रोजगार जाईल. सांस्कृतिक वाद वाढतील आणि गुन्हेगारीही.

आता वेगळीच समस्या आहे. इथं जपानी माणसांची संख्या कमी होते आहे. 2010 ते 2015 या काळात जपानची लोकसंख्या तब्बल 10 लाखांनी घटली होती. तर गेल्या वर्षी जपानच्या लोकसंख्येत 2 लाख 70 हजारांनी घट झाली.

जपानची नेमकी समस्या काय आहे?

जपानमध्ये 65 वर्ष वय असलेल्यांची संख्या 27 टक्क्यांवर पोहोचली आहे. हा विक्रम आहे आणि 2050पर्यंत ही संख्या 40 टक्क्यांवर जाईल.

मे 2018मध्ये इथल्या रोजगाराचं प्रमाण 44 वर्षातलं सर्वांत उच्च होतं. म्हणजे 100 कामगारांमागे इथे 160 नोकऱ्या उपलब्ध आहेत.

जपानमध्ये अशा नोकऱ्यांची संख्या प्रचंड आहे, ज्या इथले म्हातारे लोक करू शकत नाहीत आणि तरुण लोकांना या नोकऱ्या करायचा नाहीत.

अमेरिकन थिंक टँक वूडरो विल्सन सेंटरच्या सीनियर असोसिएट शिहोको गोटो यांच्या मते ही स्थिती अतिशय भयावह आहे.

त्यांचं म्हणणं आहे की परदेशी नागरिक हे जपानच्या समस्या सोडवण्याचं औषध ठरू शकत नाहीत.

मात्र त्याचवेळी काही उद्योगपती आणि लोकप्रतिनिधी मात्र शिंजो आबे यांच्या परदेशातून कामगार आणण्याच्या योजनेचं स्वागत करतात.

तर इतर लोकांना मात्र यामुळे जपानचा समाज बदलून जाईल, अशी भीती वाटते.

टोकियोतले परदेशी नागरिकांच्या समस्यांवर काम करणारे वकील मसाहितो नकाई सांगतात "जपानच्या खूप कमी लोकांना परदेशी नागरिकांसोबत राहण्याचा आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आहे."

तरीही काही लोक म्हणतात की यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचं आहे. "आता परदेशी लोकांशिवाय देश चालणं मुश्कील असल्याचं त्यांनी मान्य केलं आहे."

घरबांधणी, शेती आणि जहाज बांधणीच्या व्यवसायांमध्ये कामगारांची तातडीनं गरज आहे.

पर्यटन वाढल्यामुळे हॉटेल व्यवसाय आणि इतर व्यापारात इंग्रजीसह अन्य भाषा बोलणाऱ्यांची गरज वाढली आहे.

तर निवृत्त झालेल्या लोकांच्यासाठी नर्सिंग स्टाफची जास्त गरज आहे.

शिंजो आबेंच्या योजनेला विरोध

नोव्हेंबरमधील एका अहवालानुसार जर पंतप्रधान शिंजो आबे यांचा प्रस्ताव लागू केला तर सगळ्या क्षेत्रांमधे रिक्त असलेली पदं भरण्यासाठी किमान 3 लाख 45 हजार कामगार परदेशातून आणावे लागतील.

जपान सध्या "टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्राम"च्या माध्यमातून परदेशी कर्मचाऱ्यांना जपानमध्ये आणतो.

या माध्यमातून तरुणांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परतण्याआधी 3 ते 5 वर्ष कमी वेतनात जपानमध्ये काम करण्याची परवानगी दिली जाते.

कामगारांचं शोषण, कमी वेतन आणि हलाखीची स्थिती यामुळे या व्यवस्थेवर जोरदार टीकासुद्धा होते.

गेल्या वर्षी असं उघडकीस आलं होतं की, 24 वर्षांच्या व्हिएतनामच्या तरुणाला फुकुशिमाच्या रेडिओअॅक्टिव्ह कचऱ्याच्या सफाईचं जोखमीचं काम देण्यात आलं होतं.

नवी व्हिसा योजना

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आता शिंजो आबे अकुशल कामगारांना जपानमध्ये किमान 5 वर्षं राहण्याची परवानगी देण्याच्या विचारात आहेत.

कुशल कामगारांना त्यांनी पुन्हा व्हिसा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

असे कामगार आपल्या कुटुंबासह जपानमध्ये राहू शकतील. ही योजना एप्रिलपासून लागू करण्याचा आबे यांचा मानस आहे.

मात्र परदेशातून आलेले कामगार फक्त शहरातच राहतील आणि ग्रामीण भागाकडे कुणी फिरकणार नाही, अशी भीतीही जपानी लोकांना वाटते.

इतकी कठीण परिस्थिती असतानाही कामगारांचं शोष करु नये, हेसुद्धा जपानला शिकता आलं नाही.

कोलंबिया युनिव्हर्सिटीत इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्सचे प्राध्यापक ताकातोशी इतो यांच्या मते जपानी समाज आता भूमंडलीकरणाप्रति जागृत होत आहे.

ते सांगतात "खरंतर परदेशी कामगार जपानच्या आर्थिक प्रगतीसाठी मदतच करतायत, ते लोक असं काम करतायत, जे जपानी लोक करू इच्छित नाहीत."

जपानी वकील नकाई यांच्या मते व्हिसा मिळणं ही केवळ एक सुरुवात आहे. परदेशी लोकांसाठी जपानच्या संस्कृतीत मिसळणं खूप अवघड आहे.

ते भाषा आणि संस्कृतीत असलेल्या दरीकडे इशारा करतात. ही दरी पार करणं मोठं आव्हान आहे.

"जर करदाते राजी असतील तर सरकार त्यांना जपानी भाषा शिकवण्यासाठी स्वस्त कोर्सेसची सुरुवात करुन देऊ शकतं," असं ते म्हणाले.

मात्र काही परदेशी नागरिकांच्या मते सरकार त्यांच्याशी संपर्कही करत नाही.

भूपाल श्रेष्ठ सांगतात की "मला वाटतं की जपानी आणि परदेशी लोकांमध्ये मेळ वाढवण्यासाठी खूप कमी संधी आहेत. कारण इथं एकाच अपार्टमेंटमध्ये राहणारे लोकही अपरिचित लोकांप्रमाणे राहतात."

"जर शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्येच सामंजस्य नसेल तर बहुसांस्कृतिक समाज बनणं दूरची गोष्ट आहे," सेंट लुईसमध्ये मिसौरी युनिव्हर्सिटीच्या समाजशास्त्राच्या प्राध्यापिका चिकाको उसूई यांच्या मते जपानमध्ये परदेशी नागरिकांशी तटस्थपणे वागण्याची अनेक कारणं आहेत.

"यामध्ये अलिप्ततावादी इतिहासापासून ते समरूपतेपर्यंत या सगळ्यांच्या काही जुन्या मान्यता आहेत, आणि त्याच याला जबाबदार आहेत. जपानच्या समाजाचा पाया काही अलिखित नियम आणि मान्यतांवर आधारलेला आहे," असं त्या सांगतात.

"यामुळे स्थानिक समाजही काही स्तरांमध्ये विभागलेला आहे. हे नियम परदेशी लोकांची उपेक्षा करण्याचं काम करतात"

उसूई "हवेचा अभ्यास" करण्याच्या जपानी धारणेबाबत सांगतात. जपानी लोकांचा समज आहे की ते अलिखित सामाजिक धारणांना टेलिपथीद्वारे समजून घेतात.

"जपानी लोकांना असं वाटतं की परदेशी लोकांना हे शक्य नाहीए. खरंतर सत्य हे आहे की मीसुद्धा जपानमध्ये राहून असं करु शकत नाही."

वूडरो विल्सन संस्थेच्या गोटो यांच्या म्हणण्यानुसार जपानी होण्याचा अर्थ म्हणजे एक कठीण 'संकेत' आहे.

"हे फक्त नागरिकत्वाबद्दल नाहीए. हे वंशाबाबत आहे, भाषेबाबत आहे. शरीराच्या भाषेबाबत आहे. आता इतक्या सूक्ष्म गोष्टी परदेशी माणूस कशा आत्मसात करु शकेल?"

फोटो स्रोत, Getty Images

कामगार समस्येचा अंत कसा होणार?

पण आता थोडा बदल होत आहे. असं गोटो यांना वाटतं की, 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत जपानी लोकांकडे आता परदेशी लोकांसोबत राहण्याच्या जास्त संधी उपलब्ध आहेत.

जसजसं जपानी समाजाचं वय वाढत चाललंय आणि ऑलिम्पिक जवळ येतंय, तसा परदेशातून कामगार आणण्यासाठी जपानवर दबाव वाढतो आहे.

भूपाल यांच्या मते जे लोक जपानला चालले आहेत, त्यांना माहिती असलं पाहिजे की ते कुठे चालले आहेत.

भूपाल यांना जपानमध्ये राहणं आवडतं. ते सांगतात "इथं कष्ट, मेहनीची पूजा होते, आणि नियमांचं पालन होतं."

ते सांगतात की जपानची संस्कृती आणि दैनंदिन जीवनाची थोडी माहिती घेऊन जपानमध्ये आलात तर बरं असतं.

नव्या वर्षात म्हणजे 2019 मध्ये जपानला परदेशी कामगारांबाबत निर्णय घ्यावा लागेल, उपाय शोधावा लागेल. तोवर त्यांच्यासमोरच्या समस्या सुटणार नाहीत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)