IND vs AUS: ...आणि ऋषभ पंत बेबीसीटिंग करू लागला!

मेलबर्न कसोटीदरम्यानचा एक क्षण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मेलबर्न कसोटीदरम्यानचा एक क्षण

मैदानावर घडणाऱ्या मैदानातच सोडून देऊन यायच्या असतात या पारंपरिक उक्तीचं पालन करत ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनबरोबरच्या शाब्दिक द्वंद्वंला नवा आयाम दिला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल अर्थात आयसीसीने ट्वीटर हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऋषभ पंत टीम पेनच्या दोन मुलांसोबत दिसतो आहे. मेलबर्न कसोटीदरम्यान पेन आणि ऋषभ यांच्यात बेबीसीटिंगवरून शेरेबाजी रंगली होती. मात्र मैदानावरच्या शत्रूत्वाला कटू वळण न देता हलक्याफुलक्या स्वभावाची झलक ऋषभने सादर केली आहे.

ऋषभ पंत, टीम पेनची पत्नी आणि मुलांसमवेत.

आयसीसीने केलेल्या या ट्वीटला तुडुंब प्रतिसाद मिळाला आहे. 11 हजारहून अधिक लोकांनी हे ट्वीट लाइक केलं तर दोन हजारहून अधिक नेटिझन्सनी हे ट्वीट रिट्वीट केलं आहे.

मेलबर्न कसोटी भारताने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली. खेळाइतकंच शाब्दिक फटकेबाजीमुळेही ही टेस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा विकेट कीपर ऋषभ पंत यांच्यातली बाचाबाची स्टंपच्या माईकमध्ये कैद झाली होती. सोशल मीडियावर या शाब्दिक खेळीची खूप चर्चा होती.

टीम पेन म्हणाला होता...

गुरुवारी ऋषभ पंत फलंदाजी करायला आला तेव्हा टीम पेन त्याला म्हणाला, "एक गोष्ट सांगू. एकदिवसीय सामन्यांसाठी आता महेंद्र सिंग धोनीची निवड झाली आहे. ऋषभ पंतला आता हॉबर्ट हरिकेन्स संघात सामील करायला हवं. त्यांना एका फलंदाजाची गरज आहे. यामुळे तुझा ऑस्ट्रेलियातला हॉलिडे लांबेल. हॉबर्ट सुंदर शहर आहे. याला एक वॉटर-फ्रंट अपार्टमेंट देण्याचंही बघू." यानंतर टीमने ऋषभला विचारलं, "तू माझ्या मुलांना सांभाळू शकशील का? मी माझ्या पत्नीला पिक्चरला घेऊन जाईल, तेव्हा तू माझ्या मुलांना सांभाळत जा."

शुक्रवारी ऋषभ पंतनं दिलं होतं प्रत्युत्तर

"आज आमच्याकडे एक विशेष पाहुणा आहे. आज त्यांचा विशेष रोल आहे. कर्णधारानं त्यांना काहीही जबाबदारी सोपावलेली नाहीये. नेहमीच जबाबदारीपासून ते पळत आले आहेत. खूपच कठीण आहे हे. कदाचित जड्डू इथून बॉल टाकेल. कम ऑन जड्डू, कम ऑन जड्डू."

सिली पॉइंटवरील मयंक अग्रवालकडे निर्देश करत तो म्हणाला, "कम ऑन मॉन्की, आज आपल्याकडे एक विशेष पाहुणा आहे. तू कधी एका अस्थायी कर्णधाराबद्दल ऐकलं आहेस का? सांग मॉन्क. कारण मला तो दिसत आहे. याला बाद करण्यासाठी काहीच करायची गरज नाही. फक्त चेंडू टाका. याला गप्पा करायला खूप आवडतात आणि हा फक्त तेच करू शकतो."

दोन्ही घटनांमध्ये विकेटच्या मागून फलंदाजाला छेडण्यात आलं, पण फलंदाजानं काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र यानंतर अंपायर इयान गूल्ड यांनी पंतला बोलावून दोनदा त्याच्याशी चर्चा केली.

यानंतर भारतात टीम पेन आणि ऋषभ पंत दोघंही पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागले.

पेट्री वान यांनी लिहिलं की, "पेनला मुलांची काळजी घेणारा भेटला, इयान गूल्ड."

सौरभ पंत यांनी लिहिलं की, "आता ही लढाई अधिकच वाढत आहे. पेन पंतला मुलांचा सांभाळ करण्यासाठी विचारत आहे तर पंत पेनला अस्थायी कर्णधार म्हणत आहे. कसं का असेना, पण फ्रीलान्स नोकऱ्यांसाठी ही एक चांगली जाहिरात आहे."

यापूर्वी ऋषभ पंतनं विकेटच्या मागून पॅट कमिंसलाही छेडलं होतं. याचीही ट्वीटरवर चर्चा झाली होती.

क्रिकेटच्या मैदानात फलंदाजांची बाचाबाची नेहमीचीच बाब आहे. या गोष्टीनं कधीकधी उग्र रूपही धारण केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)