भारताने ऑस्ट्रेलियाला नमवले : मालिकेत 2-1ची आघाडी

भारतीय क्रिकेट संघ

फोटो स्रोत, Getty Images

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मेलबर्न इथल्या तिसऱ्या कसोटीमध्ये भारताने 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मेलबर्न मैदानावर भारताने 37 वर्षांनी कसोटी विजय नोंदवला. चार कसोटींच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पुढील सामना सिडनी येथे होणार आहे. हा सामना जरी ऑस्ट्रेलियाने जिंकला तरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आता भारताकडे राहाणार हे पक्क झालं आहे. तसेच सिडनीतील कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची संधीही भारतीय संघाला मिळाली आहे.

या कसोटीत एकूण 9 बळी घेणारा जसप्रीत बुमराह 'मॅन ऑफ द मॅच'चा मानकरी ठरला.

भारताने दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियाला 399 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 261 धावांत गुंडाळला. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर इशांत शर्मा आणि शमी यांनी प्रत्येकी 2 बळी घेत भारताचा विजय सुकर केला.

सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे 8 खेळाडू बाद झाले होते. पण पॅट कमिन्सने खिंड लढवत ठेवली होती. चौथ्या दिवशीचा खेळ संपताना ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 8 बाद 258 अशी होती. भारत विजयापासून फक्त 2 विकेट दूर होता. पण 5व्या दिवसाचा खेळ सुरू होतानाच पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. चहापानानंतर सामना पुन्हा सुरू झाला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

जसप्रीत बुमराह

जसप्रीतने दुसऱ्याच षटकात भारताला नववी विकेट मिळवून दिली. बुमराहने पॅट कमिन्सला पॅव्हेलियनमध्ये धाडले, तर इशांतने नॅथन लायनची विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

भारताचा हा 150वा कसोटी विजय आहे. तसेच 'बॉक्सिंग डे' कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवण्याची ही पहिलीच वेळ आहे. मेलबर्न टेस्टच्या आधी ऑस्ट्रेलिया आणि भारतात सात 'बॉक्सिंग डे' टेस्ट झाल्या आहेत. यातील 5 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर 2 सामने ड्रॉ झाले आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)