बांगलादेश पंतप्रधान शेख हसीनांचा वादग्रस्त निवडणुकीत एकहाती विजय

शेख हसीना

फोटो स्रोत, Getty Images

बांगलादेशमध्ये रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगने प्रचंड बहुमतानं विजय मिळवला आहे. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणुकांचे निकाल जाहीर केले. या विजयासोबतच शेख हसीना सलग तिसऱ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील.

हसीनांच्या अवामी लीगने 350 पैकी 281 जागा जिंकल्या. गेल्यावेळेच्या तुलनेत अवामी लीगच्या जागांमध्येही वाढ झाली आहे.

दरम्यान, विरोधकांनी मात्र या निकालांवर टीका केली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची संभावना 'फार्स' म्हणून केली आहे. या निवडणुकीमध्ये हिंसाचार, बळाचा वापर झाल्याची टीकाही विरोधकांनी केली.

या निवडणुकांचे निकाल अवैध घोषित करण्याची मागणी आम्ही करत आहोत, असं विरोधी नेते कमाल होसैन यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी बांगलादेशमध्ये तातडीने फेरनिवडणुका घेण्याची मागणीही केली आहे.

फोटो स्रोत, Reuters

"देशभरातून आम्हाला बनावट मतदानासंबंधीच्या तक्रारी मिळत आहेत. आम्ही त्याची चौकशी करू," अशी माहिती बांगलादेशच्या निवडणूक आयोगानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली.

तर निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षाचे समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या हिंसाचारात 17 लोक ठार झाले.

काय आहेत विरोधकांचे आरोप?

2009पासून पंतप्रधानपदी असलेल्या शेख हसीनांनी सत्ता टिकवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याची टीका विरोधक करत आहेत. अनेक मतदान केंद्रांवर आधीपासूनच भरलेल्या मतपेट्या ठेवण्यात आल्या होत्या, असा विरोधकांचा आरोप आहे. 300 पैकी 221 मतदारसंघांमधील मतदान प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्याचा आरोप बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) प्रवक्त्यांनी केला.

मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात चितगावमधीलल एका मतदान केंद्रावर मतपत्रिकांनी भरलेल्या पेट्या ठेवल्याचं बीबीसीच्या प्रतिनिधीच्याही निदर्शनास आलं होतं.

फोटो स्रोत, Reuters

चितगाव हे बांगलादेशमधील दुसरं सर्वांत मोठं शहर आहे. या शहरातल्या अनेक मतदान केंद्रांवर केवळ सत्ताधारी पक्षाचेच 'पोलिंग एजंट' उपस्थित होते.

विरोधी पक्षांच्या आघाडीमधील किमान 47 उमेदवारांनी मतदान पूर्ण होण्यापूर्वीच माघार घेतली. बळाचा वापर आणि बनावट मतदान होत असल्याचं पाहून त्यांनी आधीच आपला पराभव मान्य केला.

निरीक्षक, कार्यकर्ते आणि सर्व विरोधी पक्ष मतदानाची प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत असतानाच सत्ताधारी मात्र विरोधकांचे आरोप हे खोटे, तथ्यहीन असल्याचं म्हणत आहेत.

शेख हसीना यांनी शुक्रवारी बीबीसीशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "एका बाजूला ते आमच्यावर आरोप करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर तसंच नेत्यांवर हल्लेही करत आहेत. हीच या देशाची शोकांतिका आहे."

बांगलादेशसाठी ही निवडणूक का आहे महत्त्वाची?

पुढचे पाच वर्षं बांगलादेशचं राजकारण कोणत्या मार्गाने जाणार तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर बांगलादेशची भूमिका काय असणार आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. मुस्लीमबहुल बांगलादेशसमोर सध्या हवामान बदल, दारिद्र्य, भ्रष्टाचार अशा समस्या आहेत. पण त्यासोबतच म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्नही बांगलादेशला भेडसावत आहे. या सर्वच मुद्द्यांवर पहिल्यांदाच सर्व विरोधी पक्ष अवामी लीगविरोधात एकवटले आहेत.

'विजयाला वादाची किनार' : योगिता लिमये, बीबीसी न्यूज, ढाका

रविवारी ढाक्यामधल्या मतदान केंद्रांवर तिथली परिस्थिती आम्ही पाहत होतो. एक गोष्ट ठळकपणे दिसत होती. पंतप्रधान शेख हसीनांचे समर्थक बोलायला उत्सुक होते. कॅमेऱ्यावर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला अगदी आनंदानं तयार होते. कोणत्या मुद्द्यावर त्यांनी मतदान केलं, हे पण त्यांनी सांगितलं. इतरांना मात्र बोलायचीही भीती वाटत होती.

फोटो स्रोत, Reuters

एका मतदारानं त्याच्या कुटुंबाची गोष्ट सांगितली. या एकत्र कुटुंबातले सदस्य जेव्हा मतदानासाठी केंद्रावर गेले, तेव्हा त्यांच्या नावे कोणीतरी आधीच मतदान केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हे सांगताना आपली ओळख कोणालाही पटू नये असंच त्याला वाटत होतं. त्याला एवढी भीती का वाटत होती, हे समजणं अवघड नव्हतं. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर सत्ताधारी पक्षाचे किमान डझनभर कार्यकर्ते उभे असायचे. कोणाची मुलाखत घेतली जात असेल तर कान देऊन ऐकायचे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती मात्र जाणवतच नव्हती.

निवडणूक आयोगाने बनावट मतदानाच्या प्रकाराची आम्ही चौकशी करू असं म्हटलं होतं. मात्र निवडणूक आयोग पक्षपाती असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

पंतप्रधानांनी आतापर्यंत विरोधकांच्या कोणत्याही आरोपाला उत्तर दिलं नव्हतं. मात्र दोन दिवसांपूर्वीच त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप फेटाळून लावले.

निकालापूर्वीच हसीना यांच्या पक्षाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र या विजयाला विवादाची किनार असेल, हे नक्की.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)