'इस्लामिक स्टेटचा पाडाव ही ट्रंप यांची प्राथमिकता'

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, AFP/GETTY

सीरियातून सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असला तरी इस्लामिक स्टेटचा (आयएस) पाडाव ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची प्राथमिकता असल्याचं मत रिपब्लिकन पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं व्यक्त केलं आहे.

रविवारी ट्रंप यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या सीरिया प्रश्नावरील बांधिलकीची खात्री पटल्याचं सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी स्पष्ट केलं.

सीरियातून सैन्य माघारी बोलावण्याच्या ट्रंप यांच्या निर्णयावर त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी तसंच ग्रॅहम यांच्यासारख्या वरिष्ठ रिपब्लिकन नेत्यांनी कडाडून टीका केली होती. ट्रम्प यांचे सुरक्षा सल्लागार जिम मॅटीस आणि आयएसविरुद्धच्या युद्धात सहभागी झालेले ज्येष्ठ लष्करी अधिकारी ब्रेट मॅक्गर्क यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ राजीनामाही दिला होता.

इस्लामिक स्टेटचा पाडाव झाल्यामुळे अमेरिका आपल्या सैन्याच्या 2 हजार तुकड्या माघारी बोलावत असल्याची घोषणा ट्रंप यांनी 19 डिसेंबरला केली होती. या घोषणेनंतर ट्रंप यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली होती.

अमेरिकेनं सैन्य माघारी बोलावल्यास इस्लामिक स्टेट उचल खाईल आणि त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असा टीकाकारांचा युक्तिवाद होता. अमेरिकन सैन्यानं सीरियाच्या ईशान्य भागातील जिहादी गटांचा बीमोड करण्यात यश मिळवलं होतं. मात्र सीरियातील काही भागात अजूनही इस्लामिक स्टेट सक्रिय आहे.

सिनेटर ग्रॅहम यांना ट्रम्पनी काय सांगितलं?

ग्रॅहम यांनी ट्रंप यांचा निर्णय 'ओबामांसारखीच घोडचूक' असल्याचं म्हटलं होतं. ट्रंप यांच्या भेटीनंतर मात्र ग्रॅहम यांनी आपले सूर बदलले. ट्रंप यांनी सीरियातील आपली भूमिका योग्यरीतीने बजावण्याचं आणि इस्लामिक स्टेटचा पूर्ण बीमोड करण्याचं आश्वासन दिल्याचं ग्रॅहम यांनी सांगितलं. ट्रंप आपलं आश्वासन पाळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ट्रंप सीरियाच्या मुद्द्यावर आपले हात झटकून सीरियाचा प्रश्न रशिया, टर्की तसंच इराणच्या गळ्यात घालत असल्याचं बीबीसीच्या जोनाथन मार्कस यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, AFP

नंतर सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ग्रॅहम यांनी अमेरिकेच्या माघारीनंतर कुर्द समुदायाचं काय होणार याबद्दल चिंता व्यक्त केली होती. इस्लामिक स्टेट विरोधात लढण्यासाठी अमेरिकेनं कुर्दांचं सहकार्य घेतलं होतं. "मात्र अमेरिकेनं सीरियातून सैन्य काढून घेतल्यास उत्तर सीरियामधील आमचे कुर्द सहकारी टर्कीच्या हल्ल्यांना बळी पडतील," अशी भीती ग्रॅहम यांनी बोलून दाखवली होती.

"आम्ही आता सीरियातून बाहेर पडलो, तर कुर्दांचं शिरकाण होईल. त्यामुळे सैन्याला माघारी कसं बोलवायचं याबद्दल राष्ट्राध्यक्ष विचार करत आहेत. ते काहीसे वैतागले आहेत, हे मी समजू शकतो," असं ग्रॅहम यांनी म्हटलं होतं.

अमेरिकेची सीरियातील उपस्थिती

अमेरिकन सैन्य पहिल्यांदा 2015 मध्ये सीरियामध्ये गेलं. इस्लामिक स्टेटशी लढणाऱ्या कुर्दांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकन सैन्याच्या काही तुकड्या सीरियात पाठवण्याचा निर्णय तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतला होता. मात्र सीरियातील परिस्थिती चिघळल्यानं अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांची संख्या वाढली. आजघडीला अमेरिकेच्या सीरियामध्ये 2 हजार तुकड्या आहेत. इस्लामिक स्टेट आणि अन्य कट्टरपंथी संघटनांविरुद्ध हवाई हल्ल्यांची कारवाई करणाऱ्या आंतरराष्ट्रीय आघाडीमध्ये अमेरिकेचा सहभाग होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)