'आता कंटाळा आलाय!' सीरियाच्या युद्धात वारंवार माती होणाऱ्या गावाची व्यथा

मनबिज Image copyright EPA
प्रतिमा मथळा एकामागोमाग एका गटाने ताब्यात घेतलेल्या गावाला आपल्या भविष्याची चिंता वाटत आहे.

"प्रत्येक वेळी आम्ही ढिगाऱ्यातून हे शहर पुन्हा उभारायचा प्रयत्न करतो आणि पुन्हा कोणता नवा गट या गावाचं रूपांतर मातीच्या ढिगाऱ्यांत करतो. आता कंटाळा आलाय या युद्धाचा!" 35 वर्षांचा कृषी अभियंता अली अगदी हताश होऊन सांगतो.

उत्तर सीरियामधल्या मंबिज गावातले लोक आता सततच्या युद्धाला कंटाळलेले आहेत. सीरियातलं यादवी युद्ध सुरू झाल्यापासून एकामागोमाग एक गटांनी या गावाचा ताबा घेतल्यामुळे गावाचं स्थैर्य नाहीसं झालं आहे.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा कुर्दांच्या प्रशासनामुळे गावात स्थैर्य आलं असं स्थानिकांना वाटतं.

राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या बाजूने असणाऱ्या सुरक्षा फौजांना बाहेर काढून बंडखोरांच्या एका गटाने 2012 साली या गावावर ताबा मिळवला. दोन वर्षांनंतर इस्लामिक स्टेटने हे गाव काबीज केलं.

2016 साली अमेरिकेचा पाठिंबा असलेली कुर्दीश आणि अरब बंडखोरांची आघाडी म्हणजे सीरियन लोकशाहीवादी आघाडीने (SDF) इस्लामिक स्टेटकडून हे गाव आपल्या ताब्यात घेतलं. त्यामुळं मंजिब पुन्हा एकदा युद्धभूमीवर आलं आहे.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा गेल्या सहा वर्षांमध्ये मंजिबमध्ये अनेकदा लढाई झाली आहे.

SDFच्या People's Protection Units (YPG) मध्ये कुर्दांचं प्राबल्य आहे. त्यामुळे SDFवर हल्ला करून त्यांना या अरबबहुल गावातून बाहेर काढून युफ्रेटिस नदीच्या पूर्वेस हाकलायची धमकी टर्कीने यापूर्वीच दिली आहे.

YPG हे कुर्दिस्तान वर्कर्स पाटीची (PKK) शाखा असल्याचं तसेच आपल्या दक्षिण सीमेवर बंडखोरांची उपस्थिती असणे धोकादायक असल्याचं तुर्कस्थानच्या सरकारला वाटतं. पीकेकेने गेली 30 वर्षे तुर्कस्थानमध्ये कुर्दांच्या स्वायत्तेसाठी प्रयत्न केले आहेत.

उत्तर सीरियात इस्लामिक स्टेटला बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचे पाठबळ लाभलेले SDF उपस्थित असल्यामुळं सीमेपासून 30 किमी अंतरावरच्या मंबिजवर हल्ला करण्यापासून टर्की सैन्याने स्वतःला परावृत्त केलं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा अमेरिकन फौजा मंबिजमध्ये अजूनही गस्त घालत असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र 19 डिसेंबर रोजी सीरियातून आपल्या फौजा मागे घेण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी घेतल्यावर परिस्थिती बदलली.

या निर्णयाने SDFला धक्काच बसला. अमेरिका सीरियातून बाहेर पडल्यास येथे राजकीय आणि लष्करी पोकळी तयार होईल आणि दोन लढाई करत बसलेल्या गटांच्या भांडणात लोक सापडतील असा इशारा SDFने दिला होता.

मंजिबवर तात्काळ हल्ला करणार नसल्याचे तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रसेप तयप एअरडोआन यांनी स्पष्ट केलं. मात्र तरीही सीरियाचा पाठिंबा असणाऱ्या बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशात आणि सीमेजवळ हालचाली सुरू झाल्याचं कार्यकर्ते सांगतात.

संभाव्य हल्ल्याची भीती पाहून SDFने सीरियन सरकारने यात लक्ष घालण्याची विनंती केली. 28 डिसेंबर रोजी आपल्या फौजांनी या गावात प्रवेश केल्याचे सीरियन लष्कराने स्पष्ट केलं होतं. मात्र वस्तुतः सीरियन फौजा आणि बंडखोर केवळ दक्षिण सीमेजवळच थांबले आहेत.

प्रतिमा मथळा युद्धग्रस्त सीरियाचा नकाशा

समझोत्याचा भाग म्हणून 400 कुर्दी सैनिकांनी मंबिज सोडल्याचा दावा सरकारी वृत्तवाहिनी 'सना'ने केला आहे. मात्र मंबिजच्या लोकांनी अजूनही कुर्दी संघटनेची गावावर पूर्ण पकड असल्याचे बीबीसीला सांगितले.

जर सीरियन सरकारने मंबिज गावात प्रवेश करायचा प्रयत्न केल्यास ते आदिवासी बंडखोरांच्या मदतीने आत शिरतील. अल-बूबाना सारख्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या जमातींच्या मदतीने ते येतील, असं अली म्हणतो.

सध्याच्या प्रशासनाने स्थैर्य आलं असलं तरी वाटाघाटी करून प्रश्न सोडवणं, हा सर्वोत्तम उपाय असल्याचं अली सांगतो.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा कुर्दांच्या नेत्यांमध्ये आणि सीरियन सरकारमध्ये काय समझोता झाला आहे याबाबत काही स्पष्टता नाही.

काही लोकांना तुर्कस्थानचा पाठिंबा असलेल्या बंडखोरांनी प्रशासनाचा ताबा घ्यावा, असं वाटतं. या लोकांत अरबांचा समावेश असून त्यांनी कुर्दी लोकांनी गेल्या दोन वर्षांमध्ये येथे मानवाधिकारांचे उल्लंघन केले असा आरोप केला आहे.

राष्ट्राध्यक्ष असद यांना विरोध करणारे तसेच गेल्या सात वर्षांमध्ये लष्कराची सेवा टाळणाऱ्या लोकांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.

तर 2012 आणि 2014 मध्ये मंबिजवर सत्ता गाजवणाऱ्या बंडखोरांची आठवण काही लोकांना सावध करत आहे. विरोधकांची भीती वाटत असणारे लोक सरकारला पाठिंबा देतात तर काही लोक वैयक्तिक कारणं आणि त्यांच्या राजकीय कलामुळे निर्णय घेत आहेत, असं एका कुर्दी स्थानिकाने सांगितले.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा यादवी युद्धामुळे सीरिया उद्ध्वस्त झाला आहे.

"बहुतांश लोकांना केवळ युद्धाची समाप्त हवी आहे."

आता आपल्या गावाच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे, याची गावकऱ्यांना चिंता वाटत आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन अंकारा भेटीवर येणार आहेत. तिथे त्यांची सीरियन आणि तुर्की अधिकाऱ्यांशी चर्चा होईल. जोपर्यंत अमेरिकेच्या पाठिंब्याने लढणाऱ्या आघाडी फौजा तेथे असतील तोपर्यंत सीरिया किंवा तुर्कस्थान मध्ये पडणार नाहीत असे स्थानिक पत्रकार सांगतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)