अंगावर पाचशे गोचीड चिकटलेल्या अजगराला ऑस्ट्रेलियात जीवदान

अजगर Image copyright GOLD COAST AND BRISBANE SNAKE CATCHER/FACEBOOK

ऑस्ट्रेलियामध्ये सर्पमित्रांनी शेकडो गोचीड चिकटलेल्या अजगराला वाचवले आहे. गोडीच एक परजीवी कीटक आहे. शेळ्या, मेंढ्या, साप अशा जनावरांच्या अंगावर तो चिकटतो आणि त्यांचे रक्त शोषतो.

क्विन्सलँडमधील गोल्ड कोस्टच्या स्विमिंग पूलमध्ये हा अजगर सापडला.

त्यानंतर सर्पमित्राला बोलवण्यात आले. त्यानेच या सापाला बाहेर काढून त्याला जनावरांच्या दवाखान्यात दाखल केले.

वेटर्नरी डॉक्टरांनी या अजगराच्या शरीरावरून एक दोन नव्हे तब्बल 500 गोचीड काढले, अशी माहिती सर्पमित्र टोनी हॅरिसन यांनी बीबीसीला दिली आहे. या अजगराची प्रकृती लवकरच सुधारेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

या अजगराला 'निक' नाव देण्यात आले आहे. गोल्ड कोस्ट आणि ब्रिस्बेनमध्ये सर्पमित्र म्हणून काम करणारे टोनी हॅरिसन सांगतात, "या अजगराला साहजिकच खूपच त्रास होत असणार. त्यामुळेच हे गोचीड काढण्यासाठी तो स्विमिंग पूलमध्ये गेला असणार."

"त्याचा चेहऱ्यावर सूज होती. त्याचं तोंड फुगलं होतं आणि त्याच्या शरीरावर गोचीड मोठ्या प्रमाणावर प्रजनन करत असल्याने त्याला खूप वेदना होत होत्या."

'गोट्यांची पिशवी धरल्यासारखा भास'

ते सांगतात, गोचिडीने भरलेल्या सापाच्या अंगावरून हे गोचीड काढताना गोट्यांनी भरलेली बॅग उचलल्यासारखा भास मला होत होता.

क्विन्सलँड विद्यापीठातील सह प्राध्यापक ब्रायन फ्राय सांगतात, "जंगलात फिरताना सापांच्या शरीरावर नेहमीच थोडेफार गोचीड चिकटत असतात."

Image copyright GOLD COAST AND BRISBANE SNAKE CATCHER/FACEBOOK

मात्र या अजगराच्या शरीरावर एवढ्या मोठ्या संख्येने गोचीड चिकटल्यामुळे तो आधीच खूप आजारी असावा, असा अंदाज आहे. अतिउष्णतेमुळे तो आजारी पडला असण्याची शक्यता आहे.

सह प्राध्यापक फ्राय सांगतात, "हा प्राणी अतिशय आजारी होता आणि म्हणूनच त्याची नैसर्गिक स्वसंरक्षण यंत्रणा पार कोलमडली होती, हे स्पष्टच आहे."

"अजगराला इथे आणून त्याच्यावर उपचार केले नसते तर तो जिवंत राहिला नसता."

निकला संसर्ग झाला होता, असं टोनी हॅरिसन यांनी सांगितले आहे. मात्र आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

गोल्ड कोस्ट अँड ब्रिस्बेन स्नेक कॅचर्स फेसबुक पेजवर हॅरिसन यांनी टाकलेल्या एका व्हिडिओत ते म्हणतात, "निक आज अधिक उत्साही आहे."

"मात्र पुन्हा जंगलात सोडण्याइतपत तो बरा होत नाही, तोवर तो करंबिन वन्यजीव अभयारण्यातच राहणार आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)