नैरोबीतील हॉटेलवर सोमालियन कट्टरवाद्यांचा हल्ला, 21 जणांचा मृत्यू

केनिया हल्ला Image copyright EPA

सोमालियन कट्टरवाद्यांनी नैरोबीच्या एका हॉटेलवर केलेल्या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. केनिया सरकारनं याबाबत माहिती दिली आहे.

DusitD2 या हॉटेलवरील हल्ल्यात 100हून अधिक लोकांना रक्तपाताला सामोरं जावं लागलं.

28 लोकांना दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे, तर केनिया रेड क्रॉसच्या मते 19 जण अद्याप बेपत्ता आहेत.

सोमालिया स्थित इस्लामिक गट अल्-शबाबनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

"जवळपास 19 तास चाललेल्या या चकमकीत केनियन पोलिसांनी 5 कट्टरवाद्यांना ठार केलं आहे," असं केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहुरू केन्याट्टा यांनी सांगितलं आहे.

जिहादी गटांविरुद्ध लढण्यासाठी केनियानं 2011मध्ये लष्कराला सोमालियात पाठवलं होतं. तेव्हापासून केनिया अल्-शबाब संघटनेच्या रडारवर आहे.

"हॉटेलमधील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याची मोहीम मंगळवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती, तर पहाटेपर्यंत बंदुका आणि स्फोटांचा आवाज ऐकू येत होता. दरम्यानच्या काळात अनेक लोक ऑफिस आणि बाथरुमध्ये लपून बसले होते," असं बीबीसीचे नैरोबीतील प्रतिनिधी अँड्र्यू हार्डिंग यांनी सांगितलं.

सुटकेनंतर भावनावश झालेल्या व्यक्ती सुरक्षा दलांचे आभार मानत होत्या. आप्तेष्टांना भेटताना त्यांना भावना अनावर होत होत्या.

Image copyright Getty Images

माध्यमांना सामोरं जाताना राष्ट्राध्यक्ष केन्याट्टा यांनी म्हटलं की, "या भयंकर अपराधासाठी पैसे पुरवणाऱ्या, याचं नियोजन करणाऱ्या आणि अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तींचा कठोरपणे समाचार घेतला जाईल."

बुधवारी या हल्ल्याशी संबंधित दोघांना अटक करण्यात आली, असं AFP या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलची राजधानी म्हणून जेरूसलेमला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला करण्यात आला आहे, असं अल्-शबाबनं जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलं आहे, असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

इस्लाम, ख्रिश्चन आणि यहुदी धर्मीयांमध्ये जेरुसलेमला पवित्र स्थान आहे.

एकीकडे इस्रायल संपूर्ण जेरुसलेमला अविभाज्य राजधानी मानतो, तर दुसरीकडे पॅलेस्टिनी नागरिक जेरुसलेमचा पूर्वेकडचा भाग हा पॅलेस्टाईनची भविष्यातील राज्याची राजधानी असल्याचा दावा करतात.

बळी कोण?

या हल्ल्यात अमेरिकन नागरिक जेसॉन स्पिंड्लर यांचा मृत्यू झाला आहे.

न्यूयॉर्क येथे 2011मध्ये 9/11ला झालेल्या हल्ल्यात जेसॉन वाचला होता, असं त्यांचे भाऊ जोनाथन यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे.

अमेरिकेतील NBC या वाहिनीला मुलाखत देताना सारा स्पिंड्लर यांनी म्हटलं की, "उदयोन्मुख बाजारपेठेतील जगात सकारात्मक बदल करण्यासाठी माझा मुलगा प्रयत्न करत होता."

ब्रिटिश नागरिक ल्यूक पॉटर यांचाही या हल्ल्यात बळी गेला आहे. त्यांच्याकडे ब्रिटन आणि आफ्रिका या दोन्ही देशांचं नागरिकत्व होतं.

तसंच केनियास्थित फुटबॉलपटू जेम्स ओड्यूर ज्याला कोब्रा म्हणून ओळखलं जात असे, त्याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. जेम्सला त्याच्या फुटबॉलवरील प्रेमापोटी केनियात ओळखलं जायचं.

रॉयटर्स न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, दोन केनियन मित्र अब्दल्ला दाहिर आणि फैझल अहमद हॉटेलच्या तळघरात एकत्रित भोजन करत होते. त्यांचाही या हल्ल्यात मृत्यू झालाय. मित्रांनी या दोघांचं वर्णन अविभाज्य जोडी असं केलं आहे.

हल्ला कसा उघडकीस आला?

केनियातील स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता हल्ल्यास सुरुवात झाली.

लॉबीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बंदुकधारी हल्लेखोरांनी पार्किंगमधील गाड्यांकडे बॉम्ब फेकले. यात एका हल्लेखोराचा बळी गेला.

Image copyright Reuters

शेजारच्या इमारतीत काम करणाऱ्या एका महिलेनं रॉयटर्सला सांगितलं की, "मला गोळाबारीचा आवाज आला. त्यानंतर मी लोकांना हात वर करून धावताना पाहिलं. यातील काही लोक जीव वाचवण्यासाठी शेजारच्या बँकेत प्रवेश करू पाहत होते."

जवळपास 4 शस्त्रधारी माणसं बंदुक चालवत होते, असं सीसीटीव्ही फुटेजवरून लक्षात येतं. काही दिवसांपूर्वी हीच माणसं या जागेची पाहणी करत असताना आढळून आली होती, अशाही बातम्या होत्या.

रात्री 11 वाजता परिसरातल्या सगळ्या इमारतींभोवती सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले, असं सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं. पण त्यानंतर गोळीबार आणि स्फोट झाले. बुधवारी सकाळी 7 वाजता मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला.

त्यानंतर सुरक्षा दलांनी इमारतीतून मार्ग काढला जिथे भयभीत कामगार दबा धरून बसले होते. फाईव्ह-स्टार DusitD2 हॉटेलमध्ये 101 रुम्स आहेत. तसंच स्वत:चं स्पा आणि रेस्टॉरंटही आहे.

कॉम्प्लेक्सच्या आत काय घडलं?

बंदुकधारी व्यक्तींनी जेव्हा आत प्रवेश केला तेव्हा गोंधळ उडाला. सुरुवातीला लोकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर त्यांनी इमारतीतचं स्वत:ला कोंडून घेतलं.

लोक गेटकडे धावत जात होते. पण गेटकडे जाणारा प्रत्येक जमपरत इमारतीकडे येत आहे, हे मला दिसलं. त्यानंतर इमारतीचं दार बंद करण्यात आलं आणि सगळीकडे गोळीबार सुरू झाला. मला वाटलं, बंदुकाधारी इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन गोळीबार करत आहे.

यानंतर नागरिकांनी स्वत:ला बाथरूम आणि टेबल-खुर्चीच्या आड डांबून ठेवलं.

काही जण मेसेजद्वारे इतरांच्या संपर्कात होते. यात माजी सिनेटर बोनी खाल्वॅले यांची मुलगी झिंझचा समावेश होता.

सुटका होईपर्यंत ती कार्यालयातील एका खोलीत लपून बसली होती, असं तिच्या वडिलांनी The Daily Nationला सांगितलं.

संध्याकाळपर्यंत काही नागरिक तिथं अडकलेले होते.

अल्-शबाब कोण?

अल्-शबाब ही इस्लामिक संघटना सोमालिया सरकारच्या विरोधात आहे. ही संघटना पूर्व आफ्रिकेवर सातत्यानं हल्ले करत आली आहे.

सप्टेंबर 2013 मध्ये, अल-शबाबच्या हल्लेखोरांनी नैरोबीमधील वेस्टगेट शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश केला आणि खरेदीदारांना लक्ष्य केले होते.

80 तासांच्या या मोहीमेत 67 जणांचा मृत्यू झाला होता.

दोन वर्षानंतर, या गटाने केनियामध्ये सर्वांत घातक हल्ला केला. गॅरिसा विद्यापीठातील या हल्ल्यात जवळपास 150 लोक ठार झाले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)