IND vs NZ : न्यूझीलंडचं भारतासमोर 158 धावांचं आव्हान

विराट कोहली, भारतीय संघ, न्यूझीलंड Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा न्यूझीलंड दौऱ्यातही विराटवर लक्ष असणार आहे.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा डाव 157 धावांमध्ये गुंडाळला. कुलदीप यादवनं 39 धावांत घेतलेल्या 4 विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडला 157 धावांत रोखण्यात यश आलं.

भारताला विजयासाठी 158 धावांची गरज आहे. कुलदीप यादवने 4 विकेट घेतल्या आहेत. शमीनं 19 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या तर यजुवेंद्र चहलने 2 विकेट्स चटकावल्या. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे 37 ओव्हर्समध्येच न्यूझीलंडचा डाव संपला.

आज नेपियरच्या मैदानात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सामन्याच्या सुरुवातीलाच मोहम्मद शमी आणि यजुवेंद्र चहलनं कमाल दाखवली. त्याने सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कॉलीन मुन्रो या दोघांनाही माघारी धाडलं.

गप्टिलनं केवळ 5 तर मुन्रोनं 8 धावा करुन तंबू गाठला. तर यजुवेंद्र चहलने रॉस टेलरला 24 धावांवर तर लॅथमला अवघ्या 11 धावांवर बाद केलं.

भारतीय संघाकडून

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली ( कर्णधार ), अंबाती रायडु, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव मैदानावर असतील.

तर न्यूझीलंड संघाकडून

मार्टिन गप्टिल, कॉलिन मुन्रो, केन विल्यम्स ( कर्णधार ) ,रॉस टेलर, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट, मिचेल सँटनर, डो ब्रेसवेल मैदानावर असतील.

दरम्यान विराट सेनेसाठी ही मालिका का महत्वाची असणार आहे, नक्की वाचा..

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ट्वेन्टी-20 मालिका बरोबरीत सोडवली. वनडे आणि टेस्ट मालिका 2-1 फरकाने जिंकत इतिहास घडवला.

या दौऱ्यात कोणतीही मालिका न गमावण्याचा विक्रमही भारतीय संघाने नावावर केला. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर विराट सेनेसमोर न्यूझीलंडचं तगडं आव्हान आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ संक्रमण स्थितीत आहे. कर्णधार स्टीव्हन स्मिथ, धडाकेबाज सलामीवीर आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरसह युवा कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर बॉल टेंपरिंगप्रकरणी घालण्यात आलेल्या बंदीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाचं आव्हान कमकुवत झालं.

भारतीय संघाने सर्वोत्तम प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीतच कसोटी मालिकेत चीतपट करण्याचा पराक्रम केला. 72 वर्षांनंतर भारतीय संघाचं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. कसोटी मालिकेतला सूर कायम राखत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिकाही जिंकली.

वर्ल्डकपसाठी अचूक संघबांधणीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वर्ल्डकप इंग्लंडमध्ये होणार आहे. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होतो. न्यूझीलंडमध्येही चेंडू मोठ्या प्रमाणावर स्विंग होत असल्याने हा दौरा भारतीय संघासाठी रंगीत तालीम आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. मात्र भारत आणि इंग्लंडमधील मैदानं तसंच भौगौलिक वातावरण वेगळं आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत वर्ल्डकपसाठी पक्की संघबांधणी करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फिनिशर धोनी भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे.

शिखर धवन आणि रोहित शर्मा ही बिनीची सलामीची जोडी भारतीय संघाचा कणा आहे. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये 30 यार्ड वर्तुळात क्षेत्ररक्षक असताना जास्तीतजास्त धावा लुटण्याचं काम ही जोडगोळी नेटाने करत आहे.

धावांचा पाठलाग करताना दमदार सलामी देत पाया रचण्याचं कामही ही जोडगोळी इमानेइतबारे करत आहे. शिखर धवनची आयसीसी स्पर्धांमध्ये तसंच इंग्लंडमध्ये कामगिरी चांगली आहे.

रनमशीन विराट

रनमशीन विराट कोहली भारतीय संघाचा आधारस्तंभ आहे. धावांचा पाठलाग करतानाची विराटची आकडेवारी अचंबित करणारी आहे.

गेले तीन ते चार वर्षं विराट वनडेत सातत्याने धावांची टांकसाळ रचतो आहे. त्याला बाद करणं प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी अवघड होत चाललं आहे.

आयसीसीच्या 2018 वर्षासाठीच्या सर्व पुरस्कारांवर छाप उमटवणाऱ्या विराटसाठी न्यूझीलंड एक नवं आव्हान असणार आहे.

न्यूझीलंडमधील छोटी मैदानं विराटला फटकेबाजी उत्तम व्यासपीठ आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ समतोल आहे. न्यूझीलंडचा संघ वनडेत सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. घरच्या मैदानावर त्यांच्याविरुद्ध धावा करणं विराटसाठी महत्त्वाचं आहे.

फिनिशर धोनी

वर्ल्डकपपूर्वी महेंद्रसिंग धोनीला सूर गवसल्याने भारतीय संघात उत्साहाचं वातावरण आहे. गेल्या दशकभरातला वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून धोनीचं नाव अव्वल स्थानी आहे.

मात्र स्ट्राईक रेटची गती मंदावल्याने पूर्वीचा धोनी राहिला नाही, धोनी सामने जिंकून देऊ शकत नाही अशी टीका होऊ लागली होती. 2011 मध्ये धोनीनेच विश्वचषकाचं स्वप्न पूर्णत्वास नेलं होतं.

चार वर्षांनंतर म्हणजे 2015 मध्ये मात्र धोनीला भारताला वर्ल्डकप जिंकून देता आला नाही. त्याचवेळी धोनी पुढचा म्हणजेच 2019चा वर्ल्डकप खेळणार का? याविषयी शंकाकुशंकांना उधाण आलं होतं.

धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलग तीन सामन्यात अर्धशतकी खेळी साकारल्या. धोनीच्या बळावरच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला मायदेशात वनडे मालिकेत नमवण्याची किमया केली.

धोनीलाच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. धोनीने नेहमीप्रमाणे बॅटनेच टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. संघाच्या गरजेप्रमाणे मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार असल्याचं धोनीने सांगितलं.

रायुडू, जाधव आणि कार्तिक-त्रिकुटावर लक्ष

भारतीय संघव्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायुडूचं नाव पक्कं केलं आहे. त्यानुसार वर्ल्डकपआधीच्या सामन्यांमध्ये रायुडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणं अपेक्षित आहे.

मात्र ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेत तिसऱ्या वनडेत धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. नाबाद 87 धावांची खेळी साकारत धोनीने भारतीय संघाला सामना आणि मालिका जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

या सामन्यात संधी मिळालेल्या केदार जाधवने दमदार अर्धशतकी खेळी साकारली होती. अशा समीकरणांमुळे अंबाती रायुडू आणि केदार जाधव या दोघांवर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत लक्ष असणार आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अंबाती रायुडू

वर्ल्डकपसाठी धोनीला पर्यायी विकेटकीपर म्हणून दिनेश कार्तिकला पसंती मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय अनुभव पणाला लावत वर्ल्डकपसाठी सज्ज असल्याचं दाखवण्याची संधी कार्तिककडे आहे.

शुभमन पदार्पण करणार?

कॉफी विथ करण कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि फलंदाज लोकेश राहुल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणत्याही स्वरुपाच्या सामन्यांमध्ये खेळता येणार नसल्याने हे दोघे तूर्तास भारतीय संघाचा भाग नाहीत.

आक्रमक फटकेबाजी, उपयुक्त गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षक असणारा हार्दिक संघात नसल्याने भारतीय संघाचं संतुलन बिघडलं आहे.

हार्दिकच्या अनुपस्थितीत विजय शंकर खेळत आहे. राहुलच्या जागी युवा शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे.

वर्षभरापूर्वी न्यूझीलंडमध्येच युवा विश्वचषकात शुभमनने खोऱ्याने धावा केल्या होत्या. देशात सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत शुभमन आहे. दमदार आंतरराष्ट्रीय पदार्पणाची शुभमनला संधी आहे.

छोटी मैदानं, मोठी आव्हानं

कुलदीप यादव, युझवेंद्र चहल ही युवा जोडगोळी भारतीय संघाच्या रणनीतीचा भाग आहे. चायनामन गोलंदाज असणाऱ्या कुलदीपला खेळणं प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरतं.

युझवेंद्रची लेगस्पिन गोलंदाजी भल्याभल्या फलंदाजांना अडचणीत टाकते आहे. न्यूझीलंडमध्ये मैदानांचा आकार खूपच छोटा असतो. अशावेळी चेंडूला फ्लाइट देणाऱ्या फिरकीपटूंना विकेट मिळवताना धावा रोखण्याचं मोठं आव्हान आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा न्यूझीलंड दौऱ्यात युझवेंद्र चहलला संधी मिळणार का?

बुमराहची अनुपस्थिती जाणवणार?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद या चौकडीवर वेगवान गोलंदाजांची धुरा आहे. वर्ल्डकपपूर्वी गोलंदाजांना त्यांच्यातील समतोल सिद्ध करण्याची हा दौरा सर्वोत्तम संधी आहे.

भुवनेश्वर आणि शमी यांनी वेळोवळी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. वर्ल्डकपसाठी उमेश यादव संघात परतू शकतो. वर्ल्डकपसाठी डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून खलील अहमदकडे पाहिले जात आहे. त्यादृष्टीने खलीलसाठी न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा आहे.

न्यूझीलंडचं दमदार आव्हान

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा न्यूझीलंडचा संघ घरच्या मैदानावर मातब्बर समजला जातो. मार्टिन गप्तील आणि कॉलिन मुन्रो यांच्या रुपात त्यांच्याकडे धडाकेबाज सलामीची जोडी आहे.

स्वत: केन, अनुभवी रॉस टेलर आणि भरवशाचा युवा हेन्री निकोल्स न्यूझीलंडला मधल्या फळीत आधार मिळवून देतात. टॉम लॅथम विकेटकीपिंगची धुरा सांभाळणार आहे. लॅथम दर्जेदार फलंदाज आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांला बळकटी मिळाली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कर्णधार केन विल्यमसनवर न्यूझीलंडची मदार आहे.

कॉलिन डी ग्रँडहोम आणि मिचेल सँटनर या दोन अष्टपैलू खेळाडूंपैकी एकाला संधी मिळू शकते. टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, डग ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट अशी वेगवान गोलंदाजांची दमदार फौज न्यूझीलंडकडे आहे. भारताची सक्षम फलंदाजी बघता भारतीय वंशाचा फिरकीपटू इश सोधीवर दडपण असणार आहे.

न्यूझीलंड दौऱ्याचा कार्यक्रम

पहिली वनडे- 23 जानेवारी- नेपियर

दुसरी वनडे-26 जानेवारी- माऊंट माऊंगनी

तिसरी वनडे-28 जानेवारी- माऊंट माऊंगनी

चौथी वनडे- 31 जानेवारी- हॅमिल्टन

पाचवी वनडे- 3 फेब्रुवारी- वेलिंग्टन

........................................

पहिली ट्वेन्टी20- 6 फेब्रुवारी- वेलिंग्टन

दुसरी ट्वेन्टी20- 8 फेब्रुवारी-ऑकलंड

तिसरी ट्वेन्टी20- 10 फेब्रुवारी- हॅमिल्टन

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)