व्हॉट्सअॅप काही वेळासाठी ठप्प झाल्याने लोकांचा ट्विटरवर गोंधळ

व्हॉट्स अॅप Image copyright AFP

सलग काही वेळ व्हॉट्सअॅप चॅट पाहिले नाहीत तर अनेकांना अस्वस्थ व्हायला होतं. जगभरातील व्हॉट्सअॅप युजर्समध्ये ही बैचेनी एकाचवेळी पाहायला मिळाली, जेव्हा मंगळवारी रात्री उशीरा काही वेळासाठी व्हॉट्स अॅप ठप्प झालं.

आयफोन आणि अँड्रॉईड फोन तसंच वेब व्हॉट्स अॅपसारख्या इतर प्लॅटफॉर्मवरून मेसेज पाठवता येत नव्हते, असं 'डाऊन डिटेक्टर' या वेबसाईटनं म्हटलं होतं.

लोकांनी मग तातडीनं ट्विटरचा आधार घेतला आणि यासंबंधी प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केली. #whatsappdown हा हॅशटॅगही ट्रेंड होत होता. 'व्हॉट्स अॅप की व्हॉट्स डाऊन' असं म्हणत अनेकांनी या प्रकाराची खिल्लीही उडवली.

व्हॉट्सअपवरून मेसेजेस जात नाहीयेत तसंच अॅप्लिकेशन लोड होत नसल्याची तक्रार मंगळवारी रात्रीपासून सुरू झाली. काही वेळानंतर व्हॉट्सअॅपची सेवा पूर्ववत झाली, मात्र हा व्यत्यय नेमका कशामुळे आला हे कंपनीकडून अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आलं नाही.

व्हॉट्सअॅपनं फॉरवर्डेड मेसेजच्या धोरणात बदल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जगभरात काहीकाळ सेवा खंडित झाल्यामुळं अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत. युजर्सचा खाजगीपणा आणि सुरक्षितता जपण्याच्या दृष्टिकोनातून व्हॉट्स अॅपनं एखादा मेसेज एकावेळी किती जणांना फॉरवर्ड करता येईल यावर काही मर्यादा घातल्या होत्या.

"व्हॉट्सअॅपचं नवीन व्हर्जन वापरणाऱ्यांना यापुढे एकावेळी पाच जणांनाच एखादा मेसेज फॉरवर्ड करता येईल," असं कंपनीनं सोमवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं होतं. यापूर्वी व्हॉट्स अॅपवरून एकावेळी 20 जणांना पाठवता येत होता.

भारतात व्हॅट्सअॅपने हे बदल आधीच लागू केले होते. जे आता जगभरातील व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांनाही पाळावे लागतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)