झिम्बाब्वे : इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर अत्याचार केल्याचा आरोप

झिम्बाब्वे Image copyright Getty Images

झिम्बाब्वेमध्ये इंधन दरवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनासाठी सरकारने नियुक्त केलेल्या मानवी हक्क गटानं लष्कराकडून आंदोलकांवर अनन्वित अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निदर्शनं थांबवण्यासाठी लष्करातर्फे बळाचा वापर होत असल्याचा आरोप झिम्बाब्वे मानवी हक्क आयोगाने केला आहे.

गेल्या आठवड्यात इंधनाचे दर एका आठवड्यात दुप्पट झाल्यानं तिथं असंतोष उफाळला आहे. राजधानी हरारेमध्ये सैन्यानं बळाचा वापर करत अत्याचार केल्याच्या बातम्या आल्या आहेत.

बीबीसी प्रतिनिधी अँड्रू हार्डिंग यांनी एका व्यक्तीशी संवाद साधला. जवळजवळ 30 व्यक्तींना बाजूला घेऊन मारहाण केल्याचा आरोप या व्यक्तीने लष्करावर केला आहे.

सातत्याने सुरू असलेल्या हिंसाचारामुळे राष्ट्राध्यक्ष मर्सन म्नानगाग्वा यांच्या लष्करावरच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

चौदा महिन्यापूर्वी सत्तेत येण्यासाठी मर्सन म्नानगाग्वा यांना लष्कराची मदत झाली होती, असंही आमच्या प्रतिनिधीने पुढे सांगितलं.

Image copyright AFP

नागरिकांवर झालेले अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, अशी शाश्वती म्नानगाग्वा यांनी दिली आहे.

नक्की काय आरोप झाले आहेत?

गेल्या आठवड्यात आठ मृत्यू झाले होते. बळाचा वापर केल्यामुळेच हे मृत्यू झाल्याचा आरोप या संघटनेनं केला आहे.

"झिम्बाब्वे नॅशनल आर्मी आणि झिम्बाब्वे पोलिसांनी नियोजनबद्ध अत्याचार करण्यास सुरुवात केली. जिथं बॅरिकेड्स घातले आहेत त्या परिसराच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना तसंच जिथं निदर्शनांची तीव्रता जास्त होती किंवा निदर्शकांनी गोंधळ घातला अशा ठिकाणी हे अत्याचार जास्त प्रमाणात झाले," असंही या अहवालात पुढे म्हटलं आहे.

सुरक्षा दलातील लोक घरात शिरून अगदी 11 वर्षांच्या मुलाला जमिनीवर झोपवून मारहाण करत असल्याचंही या अहवालात पुढे म्हटलं आहे.

"लष्कर तैनात केल्यामुळे जीवितहानी झाली आहे, अनेक लोक जखमी झाले आहेत आणि मानवी हक्कांचं उल्लंघन झालं आहे. तरीही सरकारने लष्कराला तैनात करणं थांबवलं नाही," निवेदनात पुढे म्हटलं आहे.

इतर बातम्यांनुसार 12 लोक मृत्युमुखी पडले आहेत. अनेक जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरू आहेत.

म्नानगाग्वाचं म्हणणं काय?

म्नानगाग्वा यांनी त्यांचा युरोप दौरा अर्धवट सोडला आहे. दावोस येथे होणाऱ्या परिषदेत ते झिम्बाब्वेमध्ये गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार होते. हरारेत आल्यावर त्यांनी मोडकळीला आलेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी मिळून काम करण्याचं आवाहन ट्विटरवरून केलं आहे.

सुरक्षा दलांनी केलेल्या हिंसाचाराचाही त्यांनी निषेध केला आहे. गरज पडल्यास 'वेगळा विचार' करावा लागेल.

आंदोलनाची सुरुवात कशी झाली?

म्नानगाग्वा यांनी झिम्बाब्वेमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला इंधनाच्या दरात मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे. इंधन तुटवड्याला तोंड देण्यासाठी ही दरवाढ केल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र globalpetrolprices.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीवर पेट्रोलचे दर झिम्बाब्वेत सगळ्यांत जास्त आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)