ट्रंप झुकले : अमेरिकेतील शटडाऊनचं संकट तात्पुरतं संपलं

डोनाल्ड ट्रंप Image copyright Reuters

अमेरिकेत गेली 35 दिवस सुरू असलेले शटडाऊन तात्पुरत्या स्वरूपात संपणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात तडजोड झाली असून 15 फेब्रुवारीपासून सरकारचं कामकाज पूर्ववत होईल, असं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, 3 आठवड्यात द्विपक्षीय समितीची बैठक होणार असून यामध्ये सीमेवरील सुरक्षेवर विचार होणार आहे. ट्रंप म्हणाले काँग्रेससोबत योग्यरीत्या तडजोड झाली नाही तर सरकारचं काम पुन्हा थांबू शकतं. मेक्सिकोच्या सीमेवर आणीबाणीच्या स्थितीचा सामना करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

अमेरिकेत गेली 35 दिवस शटडाऊन सुरू आहे. त्यानंतर राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे आता दबावाला झुकले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे असलेले ट्रंप यांनी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी बजेटमध्ये 5.7 अब्ज डॉलरची तरतुद होत नाही तोपर्यंत बजेट स्वीकार न करण्याचा निर्णय घेतला होता. पण डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रंप यांची मागणी अमान्य केली होती.

काँग्रेसमध्ये झालेल्या मतदानानंतर ट्रंप म्हणाले 'माझी भूमिका म्हणजे कोणत्याही अर्थाने माघार नाही तर कर्मचाऱ्यांचं होत असलेलं नुकसान लक्षात घेवून मी हा निर्णय घेतला आहे.'

ते म्हणाले, "मी अभिमानाने हा करार जाहीर करत आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत निधी उपलब्ध होत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. ते खरे देशप्रेमी आहेत."

पण मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याशिवाय पर्याय नाही. जर 15 फेब्रुवारीला रास्त तडजोड झाली नाही तर पुन्हा शटडाऊन सुरू होईल. तसं झालं तर या आणीबाणीच्या स्थितीला तोंड देण्यासाठी राज्यघटनेने मला दिलेले अधिकार मी वापरणार आहे, असं ते म्हणाले.

या शटडाऊनमुळे अमेरिकेतील 8 लाख कर्मचाऱ्यांना वेतन मिळू शकलेलं नाही. याचा फटका विमानसेवेलाही बसला आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विमानाच्या उड्डाणांना विलबं झाला. अमेरिकेच्या महसुल विभागावरही याचा परिणाम दिसून आला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)