ऑस्ट्रेलियन ओपन 2019: नोव्हाक जोकोव्हिचचा राफेल नदालवर अंतिम फेरीत दणदणीत विजय

चषकासह जोकोव्हिच Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चषकासह जोकोव्हिच

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने राफेल नदालला सरळ सेट्समध्ये नमवत ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं. जोकोव्हिचने नदालवर 6-3, 6-2, 6-3 असं हरवलं.

जोकोव्हिचचं ऑस्ट्रेलियन ओपनचं हे सातवं जेतेपद आहे. या स्पर्धेची सर्वाधिक जेतेपदं पटकावणारा जोकोव्हिच पहिलाच विजेता आहे. कारकिर्दीतलं जोकोव्हिचचं हे पंधरावं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.

2012 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम मुकाबला नदाल आणि जोकोव्हिच यांच्यात रंगला होता. त्यावेळी तो सामना 5 तास 54 मिनिटे चालला होता. त्या ऐतिहासिक मैफलीची पुनरावृत्ती रविवारी होणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र जबरदस्त फिटनेस, कमीत कमी चुकांसह सर्वसमावेशक आणि चिवट खेळ करणाऱ्या जोकोव्हिचने मुकाबला एकतर्फी ठरवला.

नदाल-जोकोव्हिच या दोन दिग्गजांमधील मुकाबला नेहमीच बहुचर्चित असतो. या दोघांदरम्यानच्या मुकाबल्यात जोकोव्हिच 28-25 असा आघाडीवर आहे.

या स्पर्धेच्या सातव्या विजयासह जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदांच्या यादीत फेडररला मागे टाकलं. फेडररच्या नावावर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची सहा जेतेपदं नावावर आहेत.

जोकोव्हिच ग्रँड स्लॅम जेतेपदं

स्पर्धा वर्ष
ऑस्ट्रेलियन ओपन 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019
फ्रेंच ओपन 2016
विम्बल्डन 2011, 2014, 2015, 2018
अमेरिकन ओपन 2011, 2015, 2018
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राफेल नदालला नमवत नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपनचं सातवं जेतेपद पटकावलं

जोकोव्हिचचा जेतेपदापर्यंतचा प्रवास

फेरी प्रतिस्पर्धी स्कोअर
प्राथमिक फेरी मिचेल क्रुगनर 6-3, 6-2, 6-2
दुसरी फेरी जो विलफ्रेड सोंगा 6-3, 7-5, 6-4
तिसरी फेरी डेनिस शापोलाव्ह 6-3, 6-4, 4-6, 6-0
चौथी फेरी डॅनिल मेददेदेव्ह 6-4, 6-7 (5-7), 6-2, 6-3
उपांत्यपूर्व फेरी केई निशिकोरी 6-1, 4-1
उपांत्य फेरी ल्युकास पौऊल 6-0, 6-2, 6-2
अंतिम लढत राफेल नदाल 6-3, 6-2, 6-3

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)