टॉयलेटमध्ये लपलेल्या सापाचा महिलेला चावा

ऑस्ट्रेलिया, वन्यजीव Image copyright Jasmine Zeleny
प्रतिमा मथळा कमोडमध्ये साप

ऑस्ट्रेलियातली एक महिला नैसर्गिक विधीसाठी टॉयलेटमध्ये गेली. कमोडच्या सीटवर ती बसली आणि काही क्षणांतच तिला चक्क साप चावला!

59 वर्षीय हेलेन रिचर्ड्स यांच्याबाबतीत हा प्रकार घडला. त्या एका नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. तिथे तो 1.5 मीटर लांबीचा साप वेटोळं घालून कमोडमध्ये बसला होता.

सापाने जोरदार डंख केल्याचं हेलेन यांनी सांगितलं. साप चावल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या. पण सुदैवाने तो साप बिनविषारी होता. हेलेन यांच्या जखमांवर आवश्यक उपचार करण्यात आले. साप बिनविषारी असल्याने हेलेन यांच्या प्रकृतीला धोका नाही.

सर्पमैत्रीण जास्मिन झेलेनी यांनी या सापाला पकडून सोडून दिलं.

ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यानजीक साप मोठ्या प्रमाणात आढळतात. ऑस्ट्रेलियात सध्या प्रचंड उष्ण वातावरण आहे. या काळात पाण्यासाठी साप अशा ठिकाणी जाऊन बसतात असं जास्मिन यांनी सांगितलं.

Image copyright Jasmine Zeleny
प्रतिमा मथळा कमोडमध्ये वेटोळे करून बसलेला साप

"मी होते त्या स्थितीत उठून उभे राहिले. लांब वेटोळं घातलेला काळसर साप पाहून मला भीती वाटली," असं हेलेन यांनी सांगितलं.

हेलेन कमोड सीटवर बसल्यामुळे सापाचा बाहेर जाण्याचा मार्गच रोखला गेला, असं जास्मिन यांनी सांगितलं.

''मी घटनास्थळी पोहचेपर्यंत हेलेन यांनी सापाला पकडून परिस्थिती नियंत्रणात आणली. हेलेन यांनी खूपच शिताफीने परिस्थिती हाताळली," असं जास्मिन यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)