व्हेनेझुएलामध्ये पेटलेल्या संघर्षामागे आहेत ही 7 महत्त्वाची कारणं

व्हेनेझुएलामध्ये चलनवाढ झाली आहे Image copyright Getty Images

मोठ्या प्रमाणावर झालेली चलनवाढ, वीज कपात, अन्न आणि औषधांचा तुटवडा याचीच परिणती व्हेनेझुएलामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये झाली आहे. विरोधी पक्षनेते खुआन ग्वाइडो यांनी स्वतःला हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि अन्य लॅटिन अमेरिकन देशांनीही त्यांच्या अध्यक्षपदाला मान्यता दिली आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना कायदा-सुव्यवस्था विभाग आणि विशेषतः लष्कराचा पाठिंबा आहे. रस्त्यावर उतरलेले आंदोलकही दोन गटांत विभागले गेले आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनामध्ये 26 लोक मारले गेले. संयुक्त राष्ट्रांनी ही परिस्थिती अजूनच चिघळेल असा इशाराही दिला आहे.

व्हेनेझुएलातील 30 लाखांहून अधिक लोक गेल्या काही वर्षांत आपला देश सोडून निघून गेले आहेत. उपासमार, आरोग्यसुविधांचा अभाव, वाढती बेरोजगारी आणि गुन्हेगारी यांमुळे या लोकांनी आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला.

व्हेनेझुएलामध्ये ही परिस्थिती नेमकी कशी ओढावली, सध्या तिथं काय सुरू आहे यापेक्षाही ते कसं सुरू झालं हे समजून घेण्यासाठी सात कारणांचा विचार व्हायला हवा-

1. प्रचंड चलनवाढ

सध्या व्हेनेझुएलातील नागरिकांना बेसुमार चलनवाढीला सामोरं जावं लागत आहे. विरोधकांचं प्राबल्य असलेल्या नॅशनल असेंब्लीनं काही दिवसांपूर्वी चलनवाढीचा अभ्यास केला. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार गेल्या वर्षभरात व्हेनेझुएलात चलनवाढीचा दर 1,300,000 टक्क्यांनी वाढला आहे.

Image copyright Reuters

सरासरी 19 दिवसांनी वस्तूंच्या किमती जवळपास दुप्पट होत होत्या. त्यामुळं रोजचं जेवण मिळवण्यासाठीही व्हेनेझुएलातल्या नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. डॉलरच्या तुलनेत व्हेनेझुएलाचं चलन बोलिव्हार घसरलं आहे. व्हेनेझुएलात सध्या एका डॉलरसाठी 1600 बोलिव्हार मोजावे लागत आहेत. तर एका रुपयासाठी त्यांना 3,496.57 बोलिव्हार मोजावे लागतील.

2. तेलाच्या घसरलेल्या किमती

व्हेनेझुएलात मोठ्या प्रमाणावर तेलसाठे आहेत. या तेलाच्याच जीवावर एकेकाळी व्हेनेझुएला स्वतःला लॅटिन अमेरिकेतली बलाढ्य अर्थव्यवस्था म्हणवून घेत होता.

मात्र 2013 मध्ये निधन झालेले माजी अध्यक्ष ह्युगो चावेझ आणि सध्याचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या काळात भ्रष्टाचार वाढला. नैसर्गिक स्त्रोतांचे गैरव्यवस्थापन तसंच कर्जांचं वाढतं प्रमाण यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोसळायला सुरूवात झाली.

Image copyright Getty Images

2000 साली जगभरात निर्माण झालेल्या 'ऑईल बूम'चा फायदा ह्युगो चावेझ यांनी घेतला आणि सरकारी खर्चात प्रचंड वाढ केली.

त्यानंतर अध्यक्षपदावर आलेल्या मादुरो यांच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था गडगडायला लागली. अनेकांनी मादुरो आणि त्यांच्या समाजवादी सरकारला व्हेनेझुएलाच्या आर्थिक दुरवस्थेबद्दल जबाबदार धरलं आहे.

2016 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती घसरल्या आणि ज्या अर्थव्यवस्था केवळ तेलावरच अवलंबून होत्या त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली.

3. लोकांची उपासमार

व्हेनेझुएलामध्ये सध्या लोकांना खायला अन्न नाहीये. देशातल्या वार्षिक जीवनमानाचा आढावा घेण्यासाठी 2017 मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 10 पैकी 8 लोकांनी घरी पुरेसं अन्न नसल्यानं आपण पोटभर जेवू शकत नाही, असं सांगितलं.

10 पैकी 6 जणांनी उपाशीपोटीच झोपत असल्याचं सांगितलं. जवळपास 65 टक्के लोकांनी आपलं वजन कमी झाल्याचं म्हटलं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांचं वजन सरासरी 11.4 किलोनं कमी झालं आहे. या सर्वेक्षणातून समोर आलेले काही महत्त्वाचे मुद्देः

•पारंपारिक जेवणातील पदार्थांचं कमी होणारे प्रमाण आणि दर्जा

•10 पैकी 9 जणांना अन्न विकत घेणं परवडत नाही.

•लोह, जीवनसत्त्वं आणि अन्य पोषणमूल्यांचं आहारातील प्रमाण कमी होणं.

Image copyright Getty Images

याचा परिणाम म्हणजे व्हेनेझुएलातील लोक विस्मरणात गेलेल्या किंवा 'गरीबांचं अन्न' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदार्थांकडे वळत आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे युका किंवा कॅसाव्हा.

हे कंदमूळ उकडून किंवा तळून खाल्लं जातं. या बदलत्या परिस्थितीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न मॅकडॉनाल्डनंही केला. त्यांनी मेन्यूमध्ये बदल करून पोटॅटो फ्रायऐवजी युका फ्राईज द्यायला सुरुवात केली आहे.

4. पुरेशा औषधांचा अभाव

काही वर्षांपासून व्हेनेझुएलामध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच्याविरुद्ध लॅटिन अमेरिकेतील इतर देशांमध्ये ही संख्या वेगानं कमी होत आहे.

1961 मध्ये हाच व्हेनेझुएला मलेरियाचं उच्चाटन करणारा जगातला पहिला देश होता. आणि आता व्हेनेझुएलामध्ये 24 पैकी 10 राज्यांत मलेरियाचे रुग्ण आढळतात.

कॅनडामधील एका एनजीओनं म्हटलं, की सध्या व्हेनेझुएलात निर्मूलन करण्यासाठी अवघड अशा मलेरियाचं प्रमाण अधिक आहे.

मलेरियाचा प्रादुर्भाव ज्या वेगानं होत आहे, ते पाहता एका वर्षात मलेरियाच्या रुग्णांची संख्या दहा लाखांहून अधिक होईल, असं आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे.

5. खालावणारे तेलसाठे

व्हेनेझुएलामध्ये जगातले सर्वांत मोठे तेलसाठे आहेत. व्हेनेझुएलाच्या निर्यातीमध्ये सर्वांत मोठा वाटा पेट्रोलिअम पदार्थांचा आहे. 2002 पासून 2008 पर्यंत देशातील तेलाचं उत्पादन स्थिर होतं.

2008 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती कमाल पातळीवर असताना व्हेनेझुएलानं तेलनिर्यातीतून 60 अब्ज डॉलर कमावले होते.

2014 च्या शेवटी शेवटी तेलाच्या किमती घसरायला लागल्या. त्याचवर्षी अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचं निधन झालं.

व्हेनेझुएलाची अंतर्गत परिस्थिती आणि तेलावर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था डगमगायला लागली. पुढच्याच वर्षी जीडीपी 6 टक्क्यांनी कमी झाला आणि चलनदरही वाढला. तेलाचं उत्पादनही कमी व्हायला लागलं.

6. स्थलांतर

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 2014 पासून व्हेनेझुएलातून 30 लाख लोकांनी स्थलांतर केलं आहे. यातले बरेचसे लोक हे शेजारच्या कोलंबियामध्ये गेले आहेत. तर काही जण इक्वेडोर, पेरू आणि चिलीमध्ये. काहींनी ब्राझीलचा पर्यायही निवडला.

उपाध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी संयुक्त राष्ट्रसंघांचा हा आकडा फेटाळून लावताना म्हटलं, की ही संख्या आमच्या शत्रू राष्ट्रांनी वाढवून सांगितली आहे.

7. समर्थनावरून मतभेद

अमेरिका, कॅनडा आणि जवळपास सर्व लॅटिन अमेरिकन राष्ट्रांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खुआन ग्वाइडो यांना पाठिंबा दिला आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे घेणाऱ्या निकोलस मादुरो यांच्या सत्तेला यामुळे आव्हान मिळालं.

शनिवारी स्पेन, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटननं व्हेनेझुएलात आठ दिवसांमध्ये मतदान घेण्याची सूचना केली आहे.

मतदान घेतलं न गेल्यास ग्वाइडोंनाच पाठिंबा देण्याचंही या देशांनी जाहीर केलं आहे. रशियानं मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे.

ग्वाइडोंना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय समर्थनाचा रशियानं निषेध केला केला आहे. हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग झाला असून यामुळे हिंसाचार वाढीस लागू शकतो, असं मत रशियानं व्यक्त केलं आहे. चीन, मेक्सिको आणि टर्कीनं निकोलस मादुरोंना पाठिंबा दिला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)