हार्दिक पंड्या टीम इंडियासाठी इतका महत्त्वाचा का?

हार्दिक पंड्या Image copyright Getty Images

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत अष्टपैलू हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं. एका टीव्ही शो दरम्यान महिलांसंदर्भात आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी हार्दिकवर बीसीसीआयने बंदी घातली होती.

मात्र प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत बीसीसीआयने ही बंदी उठवली आणि तो हार्दिक न्यूझीलंडला रवाना झाला. जेटलॅगची तक्रार न करता हार्दिक तिसऱ्या वनडेत संघाचा भाग झाला. केन विल्यमसनचा अफलातून झेल टिपत हार्दिकने आपली छाप उमटवली. सोशल मीडियावर हार्दिकच्या कॅचची जोरदार चर्चा आहे.

Image copyright Twitter

काय झालं होतं नेमकं?

कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांसंदर्भात आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल या दोघांवर बंदी घालण्यात आली. बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला तेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका खेळत होता. बंदीच्या निर्णयामुळे हार्दिकला मायदेशी पाठवण्यात आलं.

हार्दिकची माफी

दरम्यान या कालावधीत हार्दिकने आपल्या उद्गारांसाठी चाहत्यांची माफी मागितली. कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, कार्यक्रम हलक्याफुलक्या स्वरुपाचा होता. भावनेच्या भरात मी बोलून गेलो असं हार्दिकने सांगितलं.

बंदी उठवली मात्र कारवाई बाकी

बीसीसीआयच्या COA अर्थात प्रशासकीय समितीने या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी ओमबड्समनची नियुक्ती झालेली नसल्याने हर्दिक आणि के एल राहुल या दोघांवरील बंदी उठवली.

अमायकस क्युरी अर्थात न्यायालयाचे मित्र पी. व्ही. नरसिंहा यांच्याशी सल्लामसलत करून प्रशासकीय समितीने बंदी हटवण्याचा निर्णय घेतला.

मात्र ओमबड्समनच्या नियुक्तीनंतर याप्रकरणाची सुनावणी होईल आणि कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. बंदी उठवण्यात आल्याने लोकेश राहुलची भारतीय अ संघात निवड करण्यात आली तर हार्दिक न्यूझीलंडला रवाना झाला.

राहुल तिरुवनंतपुरममध्ये भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळला.

हार्दिकची उपयुक्तता

भागीदारी तोडण्यात वाकबगार गोलंदाज अशी ओळख हार्दिकने निर्माण केली आहे.

वनडे संघात तीन वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज अशा समीकरणासह भारतीय संघ खेळतो. पिचनुसार दोन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू असंही समीकरण केलं जातं.

पाचवा गोलंदाज म्हणून हार्दिक भारतीय संघासाठी उपयुक्त आहे. दहा षटकांमध्ये धावा रोखतानाच हार्दिक खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजांना माघारी धाडतो.

हार्दिक पाचवा अर्थात कामचलाऊ गोलंदाज आहे या पवित्र्यात असलेले प्रतिस्पर्धी फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर धोका पत्करतात आणि बाद होतात.

तिसऱ्या वनडेत संधी मिळाल्यानंतर हार्दिकने 2 विकेट्स पटकावल्या. चांगल्या तंत्रकौशल्यासाठी प्रसिद्ध हेन्री निकोल्स आणि चिवटपणे फलंदाजी करणाऱ्या मिचेल सँटनरला तंबूत धाडत हार्दिकने न्यूझीलंडचा संघ अडीचशेचा टप्पा गाठणार नाही याची काळजी घेतली. धावा रोखणं आणि सातत्याने विकेट्स पटकावणं अशा दोन्ही आघाड्या हार्दिक उत्तम सांभाळतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हार्दिक पंड्या

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत टोलेबाजी करण्यात त्याचा हातखंडा आहे. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणं अवघड असतं.

कारण प्रथम फलंदाजी असेल तर मोठी धावसंख्येची मजल मारण्याचं आव्हान असतं आणि धावांचा पाठलाग असेल तर वाढणाऱ्या रनरेटचं दडपण असतं.

अशावेळी रनिंग बिटविन द विकेट्स उत्तम असेल आणि दमदार स्ट्राईक रेटसह धावा करू शकेल असा बॅट्समन आवश्यक असतो. हार्दिकने या रोलसाठी स्वत:ला तयार केलं आहे.

याव्यतिरिक्त हार्दिक चपळ क्षेत्ररक्षक आहे. तिसऱ्या वनडेत युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्याने केन विल्यमसनचा अफलातून झेप टिपला.

केन हा न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा आहे. सातत्याने धावा करण्यासाठी केन प्रसिद्ध आहे. केन टिकला असता तर न्यूझीलंडने तीनशे धावांचा टप्पा सहज गाठला असता.

मात्र युझवेंद्रच्या गोलंदाजीवर डाऊन द ट्रॅक येत मिडविकेटच्यावरून फोर मारण्याचा केनचा प्रयत्न हार्दिकच्या थरारक झेलमुळे फसला.

कॅच घेताना काही क्षण पक्ष्याप्रमाणे हवेत असलेल्या हार्दिकची सोशल मीडियावर मजबूत चर्चा आहे. चित्तथरारक कॅच असेल किंवा भन्नाट रनआऊट असेल किंवा जीव तोडून धाव वाचवणं असेल- हार्दिकचं हे कौशल्य भारतीय संघासाठी मोलाचं आहे.

बॅटिंग-बॉलिंग-फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर एक पॅकेज म्हणून हार्दिक भारतीय संघाच्या योजनांचा महत्वाचा भाग आहे.

हार्दिक संघात हवा असे संकेत

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी ही भारतीय संघाची फलंदाजीची फळी पक्की आहे.

अंबाती रायुडू, केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांच्यात वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे.

दुखापतीमुळे केदार जाधवला सातत्याने खेळता आलेलं नाही. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या दोघांनी एकत्रित खेळताना नुकताच शंभर विकेट्स पूर्ण केल्या.

जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाजीचं त्रिकुट सज्ज आहे. बॅटिंग आणि बॉलिंग विभागांना सांधण्यासाठी दोन्ही गोष्टी करू शकेल असा खेळाडू संघव्यवस्थापनाला हवा आहे.

हार्दिकने गेल्या दोन ते तीन वर्षात ही दुहेरी कसरत सांभाळली आहे. संघाचं संतुलन राखण्यासाठी अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता असते असं कर्णधार विराट कोहली काही दिवसांपूर्वीच म्हणाला होता.

हार्दिकच्या अनुपस्थितीत विजय शंकरला ही जबाबदारी देण्यात आली. मात्र काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर हार्दिकवर महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.

केदार जाधवने बॅटिंगबरोबर फिरकीपटू म्हणून छाप उमटवली आहे. मात्र वर्ल्डकप इंग्लंडमध्ये होणार आहे. ढगाळ वातावरणात स्विंग होणाऱ्या वातावरणात हार्दिकची गोलंदाजी उपयुक्त ठरू शकते. इंग्लंड दौऱ्यात हार्दिकने आपली उपयुक्तता सिद्ध केली होती.

Image copyright Getty Images

2016 मध्ये वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिकने आतापर्यंत 42 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडेतलं त्याचं बॅटिंग अॅव्हरेज 29.13 इतकाच आहे पण स्ट्राईकरेट शंभरपल्याडचा आहे.

सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी स्ट्राईकरेट महत्त्वाचा असतो. वनडेत हार्दिकच्या नावावर 40 विकेट्स आहेत. 5.55ची इकॉनॉमी काटकसरी नक्कीच नाही, पण हुकमी विकेट्स काढण्याच्या बाबतीत हार्दिक पटाईत आहे.

मोठ्या स्पर्धांचं, मोठ्या संघांचं तसंच अव्वल प्रतिस्पर्धी खेळाडूंचं हार्दिकवर दडपण नसतं. हार्दिक नेहमीच त्याचा नैसर्गिक आक्रमक खेळ करतो.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)