भारताचा न्यूझीलंडवर 7 विकेटनी विजय, टीम इंडियाची मालिकेत 3-0ने विजयी आघाडी

Image copyright Twitter / BCCI
प्रतिमा मथळा दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडू

दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत 7 विकेटनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारतीय संघाने याआधी केवळ एकदा न्यूझीलंडमध्ये वनडे मालिका जिंकली आहे.

न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कर्णधार रॉस टेलर (93) आणि टॉम लॅथम (53) या दोघांचा धावांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

टेलरने 9 चौकारांसह 93 धावांची संयमी खेळी साकारली. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या रॉसचा अडथळा युझवेंद्र चहलने दूर केला. मिडविकेटला फिल्डिंग करणाऱ्या डावीकडे झेपावत अफलातून झेल टिपला.

लॅथमने 51 धावांची खेळी केली.

भारतातर्फे मोहम्मद शमीने 3 तर भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रॉस टेलरने 93 धावांची खेळी केली

प्रत्युत्तरादाखल खेळताना विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय संघाने सहज विजय साकारला. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी 39 धावांची सलामी दिली. धवन 28 धावा करून बाद झाला.

मात्र त्यानंतर विराट-रोहित जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. 77 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 66 धावांची खेळी करून रोहित बाद झाला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा हार्दिक पंड्याचं पुनरागमन भारतीय संघासाठी सुफळ ठरलं

विराट संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार अशी चिन्हे असतानाच ट्रेंट बोल्टने त्याला बाद केलं. विराटने 74 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची खेळी केली. अंबाती रायुडूने 40 तर दिनेश कार्तिकने 38 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रोहित शर्माने 60 धावांची खेळी केली.

भारतीय संघाने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे महेंद्रसिंग धोनीऐवजी दिनेश कार्तिकला संधी मिळाली. कॉफी विथ करण कार्यक्रमातील महिलांबाबत आक्षेपार्ह उद्गारांमुळे बंदीची शिक्षा उठवण्यात आलेल्या हार्दिकला अंतिम संघात स्थान मिळाले. विजय शंकरच्या जागी त्याची निवड झाली. न्यूझीलंडने कॉलिन डी ग्रँडहोमच्या जागी मिचेल सँटनरला संघात समाविष्ट केलं.

न्यूझीलंडमध्ये भारताचं वनडे मालिकेतील प्रदर्शन

वर्ष निकाल स्कोअर
1976 भारत पराभूत 0-2
1981 भारत पराभूत 0-2
1994 सामना बरोबरी 2-2
1999 सामना बरोबरी 2-2
2002 भारत पराभूत 2-5
2009 भारत विजयी 3-1
2014 भारत पराभूत 0-4
2019 भारत विजयी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)