पाकिस्तान: आसिया बिबीच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

आसिया बिबी
प्रतिमा मथळा आसिया बिबी

जगभर गाजलेल्या आसिया बीबी ईशनिंदा प्रकरणी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. आसिया बीबी यांच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

त्यामुळे आसिया बीबी यांना पुन्हा तुरूंगात डांबण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लागला आहे.

प्रेषित मोहम्मद यांच्यावर टीका केली म्हणून त्यांना 2010 मध्ये आसिया बीबी यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. यासाठी त्यांनी आठ वर्षं तुरुंगवास भोगला होता. आपण निर्दोष असल्याचा दावा त्यांनी सातत्याने केला होता.

गेल्या वर्षी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने आसिया बीबी यांची फाशीची शिक्षा रद्द केली. त्यानंतर पाकिस्तानात हिंसक आंदोलनं झाली. ईशनिंदेसंबंधी कडक कायद्याचं समर्थन करणाऱ्या कट्टर धार्मिक नेत्यांनी ही निदर्शनं केली होती. मात्र पुरोगामी गटांनी त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. याच कट्टर नेत्यांनी सुटकेला आव्हान दिलं होतं.

"मात्र खटल्याची गुणवत्ता पाहता ही याचिका फेटाळून लावण्यात येत आहे." असं सरन्यायाधीश असिफ सईद खोसा मंगळवारी म्हणाले.

आता पुढे काय होणार?

इस्लामाबादमधील बीबीसी प्रतिनिधी सिकंदर किरमानी म्हणाले की आसिया बिबी त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेता देश सोडून जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या दोन मुलींनी याआधीच पाकिस्तान सोडल्याचं सांगण्यात येतं. आता आसिया बिबीसुद्धा दुसऱ्या देशात आसरा घेतील अशी अपेक्षा आहे.

आसिया बिबी या आसिया नावाने ओळखल्या जातात. त्यांची याचिका विचाराधीन असल्यामुळे त्यांना पाकिस्तान सोडता येत नव्हतं. सुटका झाल्यापासून त्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलं आहे. आता काही इस्लामी गट पुन्हा निदर्शन करतील अशी आशा आहे. गेल्या वर्षी ज्यांनी निदर्शनं केली ते सध्या तुरुंगात आहेत.

काय आहे प्रकरण ?

लाहोरजवळच्या शेखूरपुरामध्ये आसिया आणि इतर महिलांमध्ये एक बादली पाण्यावरून भांडण झालं. ही घटना 2009 सालची आहे.

आसियांनी त्या पाण्याला स्पर्श केल्यामुळे इतरांचा धर्म भ्रष्ट झाला असा आरोप या महिलांनी केला. आसिया ख्रिश्चन तर इतर महिला मुस्लीम आहेत.

या महिलांनी पुढे आग्रह धरला की आसियांनी इस्लाम धर्म स्वीकारावा. त्यानंतर आसियांनी प्रेषित मोहम्मदांबद्दल तीन अपमानास्पद शब्द काढले, असा महिलांचा आरोप आहे.

Image copyright EPA

या महिलांनी आसियांना चोप दिल्यानंतर आसियांनी ईशनिंदेची कबुली दिली, असा महिलांचा दावा आहे. पोलीस तपासानंतर आसियांना अटक करण्यात आली.

मी रागावून शेजाऱ्यांशी बोलले, पण ईशनिंदा केली नाही आणि कबुलीही दिली नाही, असा आसियांचा दावा आहे.

हे प्रकरण इतकं वादग्रस्त का आहे?

इस्लाम हा पाकिस्तानचा राष्ट्रीय धर्म आहे आणि इस्लाम पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेचा गाभा आहे. त्यामुळे ईशनिंदेला कठोर शिक्षेची तरतूद आहे आणि या तरतुदीला लोकांचा पाठिंबा आहे.

मतं मिळवण्यासाठी कट्टरवादी नेते ईशनिंदेसाठी कठोर कारवाईचं नेहमी समर्थन करत आले आहेत. तर वैयक्तिक प्रकरणांत सूड घेण्यासाठी या कायद्याचा वापर होण्याची उदाहरणं आहेत, असं टीकाकारांचं मत आहे.

या कायद्यात सुरूवातीला मुस्लीम आणि अहमदिया पंथातील लोकांना शिक्षा झाली. पण 1990नंतर अनेक ख्रिश्चनधर्मीय लोकांना या कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या 1.6 टक्के आहे.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानतल्या ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य केलं जात आहे. 1990पासून ईशनिंदेच्या आरोपावरून जवळजवळ 65 लोकांची हत्या झाली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)