तीन दिवस लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या महिलेची गोष्ट

अमेरिका Image copyright Google MAPS
प्रतिमा मथळा याच इमारतीच्या लिफ्टमध्ये फोर्टलिझा तीन दिवस अडकल्या होत्या.

अमेरिकेतील एका शहरात एक महिला पूर्ण वीकेंड (शुक्रवार ते रविवार) लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली आहे. या महिलेचा यशस्वीपणे बचाव केल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

53 वर्षीय मार्टिस फोर्टलिझा मॅनहटन टाऊनहाऊस या इमारतीच्या लिफ्टमध्ये शुक्रवारपासून अडकल्या होत्या. ही इमारत वॉरन स्टीफन्स या इन्व्हेस्टमेंट बँकरच्या मालकीची आहे.

अग्निशमन दलाची लोक सोमवारी सकाळी 10 वाजता तिथे आले आणि लिफ्टचा दरवाजा तोडला.

फोर्टलिझा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता सुधारत आहे.

त्यांच्या कुटुंबाने जारी केलेलं एक निवेदन AP या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे. फोर्टलिझा यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं असून वेल कॉर्नेल मेडिकल सेंटर या रुग्णालयात दाखल आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

''त्या स्टीफन्स परिवाराच्या सन्माननीय सदस्य असून त्या 18 वर्षांपासून आमच्याबरोबर आहेत.'' असं त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांनं त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सांगितलं.

स्टीफन हे 'स्टीफन्स Inc' या इन्व्हेस्टमेंट बँकेचे अध्यक्ष असून अर्कानास इथल्या लिटिल रॉक या ठिकाणी या कंपनीचं कार्यालय आहे.

प्रशासनाच्या मते त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्या मध्ये अडकल्या होत्या. सेंट्रल पार्कच्या जवळ असलेल्या पूर्व भागात ही घटना घडली.

स्टीफन यांचं संपूर्ण कुटुंब वीकेंडला फिरायला गेले होते. घरी कुणीही नव्हतं आणि फोर्टझिला काम करत होत्या.

स्टीफन्स यांची इमारत धोकादायक असून ती बंद केल्याची बातमी न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)