अमेरिकेत कडाक्याची थंडी, पोलर व्हर्टेक्समुळे पारा उणे 53 अंश सेल्सियसपर्यंत खाली जाण्याची शक्यता

हिमवृष्टी Image copyright AFP

अमेरिकन नागरिक अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. अनेक भागांमध्ये तापमान इतकं घटलं आहे की, काही भाग गोठण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

वातावरणातील बदलांमुळे अमेरिकेतलं तापमान -53 अंश सेल्सियसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. लोकांनी घरातून बाहेर पडल्यानंतर खोल श्वास घेऊ नये, तसंच कमीत कमी बोलावं असा सल्ला लोवा राज्यातील हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिला आहे.

जवळपास 5.5 कोटी लोक शून्याहून कमी तापमान अनुभवण्याची शक्यता आहे.

यामुळे विस्कॉन्सिन, मिशिगन, इलिनॉय, अलाबामा आणि मिसिसीपी राज्यांत आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.

"सध्याच्या थंड हवेची तीव्रता इतकी जास्त आहे की, अशी परिस्थिती पिढ्यानपिढ्यांमध्ये एकदाच येते, असं मी म्हणेन," असं National Weather Service (NWS) चे हवामानतज्ज्ञ जॉन गॅगन यांनी म्हटलं आहे.

केवळ 10 मिनिटं या तीव्र वातावरणात काढल्यास हिमबाधा होऊ शकते, अशी सूचना NWSनं जारी केली आहे.

मंगळवार ते गुरूवार या कालावधीत सर्वाधिक थंड तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. या काळात शिकागो शहर अंटार्क्टिकाहून अधिक थंड राहण्याची शक्यता आहे.

इलिनॉयमधील तापमान -33C राहण्याची शक्यता आहे. विस्कॉन्सिनमध्ये 2 तर इलिनॉयमध्ये 6 फूट बर्फवृष्टीचा अंदाज आहे. अलाबामा आणि जॉर्जिया या राज्यांतही हिमवृष्टीची शक्यता आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी वाद कसा सुरू केला?

'सामान्य माणूस हवामान बदलासाठी कारणीभूत आहेत का,' असा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उपस्थित केला आहे.

"हवामान बदलानं हे काय आक्रित घडत आहे?" असं त्यांनी ट्वीट केलं आहे.

सरकारच्या National Oceanic and Atmospheric Administrationनं ट्वीट करत म्हटलं आहे की, हवामानात बदल होतोय, असं या हिमवृष्टीमुळे सिद्ध होत नाही.

"उत्तर ध्रुवाच्या वरील हवामानात अचानक बदल झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली," असं विभागाचं म्हणणं आहे. याला कारण म्हणून गेल्या वर्षी मोरोक्कोत गरम हवेमुळे झालेला स्फोट सांगितला जात आहे.

वातावरणातील बदल मानवप्रेरित आहे आणि यामुळे हिवाळा अधिक प्रकर्षानं जाणवू शकतो, असं जगातल्या अग्रगण्य शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

हवामानाचा काय परिणाम?

या हवामानामुळे लोकांची लूट केली जात आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. स्थानिक माध्यमांनुसार, 78,340 रुपयांचं Canada Goose जॅकेट घातलेल्या लोकांना टार्गेट करण्यात आलं आहे.

याशिवाय Hamilton या संगीत कार्यक्रमाचे तिकीट 4,500 रुपयांना म्हणजेच नेहमीच्या दरापेक्षा निम्म्या दरानं विकले जात आहेत.

Image copyright Getty Images

तसंच गेल्या 85 वर्षांच्या इतिहासात बुधवारी आणि गुरुवारी असं चौथ्यांदा शहरातील Brookfield Zoo बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय मंगळवारी USमध्ये येणाऱ्या अथवा बाहेर पडणाऱ्या 1,100हून अधिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच हजारो शाळा आणि सरकारी कार्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.

"अनेक पिढ्यांनंतर आलेला हा अनुभव आहे," असं मिल्वाकी शहराचे महापौर टॉम बॅरेट यांनी म्हटलं आहे.

USच्या अनेक शहरांत आश्रयगृह स्थापन करण्यात आले आहेत.

"बाहेर पडण्यासाठी कोणताही रात्र योग्य नाही," असं बॅरेट यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)