Ind Vs New Zealand: रोहित शर्माचा 200 वनडे सामन्याचा विक्रम

रोहित शर्मा, भारतीय क्रिकेट संघ, Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रोहित शर्मा

वनडेत तीन द्विशतकं नावावर असणाऱ्या हिटमन रोहित शर्माने आज एक विशेष विक्रम केला. हा त्याचा 200 वा वनडे सामना आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये न्यूझीलंडविरोधातल्या वनडेचं रोहित शर्मा नेतृत्व करत आहे.

न्यूझीलंडविरोधात हॅमिल्टन येथे सध्या रोहित शर्मा वनडे खेळत आहे. हा त्याचा 200 वा वनडे आहे. विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे तो आज भारतीय टीमचा कर्णधार आहे. न्यूझीलंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बारा वर्षांपूर्वी 23 जून 2007 रोजी रोहितने आयर्लंडविरुद्ध बेलफास्ट इथे वनडेमध्ये पदार्पण केले होते.

टीम इंडियात त्यावेळी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे रोहित शर्माने सातव्या क्रमांकावर खेळायला सुरुवात केली. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणं खडतर आव्हान होतं. प्रथम फलंदाजी असेल तर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी झटपट धावा कराव्या लागतात. खेळपट्टीवर दाखल झाल्या झाल्या मोठे फटके खेळावे लागतात. मोठी खेळी करण्यासाठी वेळच नसतो. कमी वेळात जास्तीत जास्त धावा असं समीकरण असतं. धावांचा पाठलाग करताना हे आव्हान आणखी खडतर होतं. कारण लक्ष्य मोठं असेल तर धावगतीचं म्हणजे रनरेटचं आव्हान सातत्याने वाढत जातं.

देशातील सगळ्यात प्रतिभाशाली खेळाडू असं वर्णन होणाऱ्या रोहित शर्माला आपलं नैपुण्य दाखवण्यासाठी सातव्या क्रमांकावर पुरेसा वेळच मिळत नसे. हळूहळू रोहितला सहाव्या-पाचव्या तसंच चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू लागली. यामुळे रोहितच्या अर्धशतकांची संख्या वाढू लागली.

धोनीचा तो निर्णय

रोहितला आपलं कौशल्य दाखवण्यासाठी वेळ मिळायला हवा असं तत्कालीन भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वाटलं. वीरेंद्र सेहवागच्या निवृत्तीनंतर डावाच्या सुरुवातीला आक्रमक पावित्र्यासह खेळू शकेल अशा ओपनरची भारतीय संघाला आवश्यकता होती. धोनीने रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. स्थानिक क्रिकेटमध्येही रोहित मधल्या फळीत खेळत असे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेच रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला.

त्याच्याकडे सलामीला खेळण्याचा अनुभव नव्हता. मात्र रोहित या भूमिकेसाठी चपखल आहे यावर धोनी ठाम होता. 23 जानेवारी 2013 रोजी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या वनडेत धोनीने गंभीरच्या बरोबरीने रोहितला सलामीला पाठवलं. ओपनर म्हणूनच पहिल्याच लढतीत 11 चौकार आणि एका षटकारासह 83 धावांची खेळी करत रोहितने धोनीचा निर्णय योग्य ठरवला.

ओपनर रोहित

मोठी खेळी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याने रोहितने धोनीने दिलेल्या संधीचं अक्षरक्ष: सोनं केलं. मायदेशात तसंच विदेशातही रोहितने सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध केलं. नव्या चेंडूचा सामना करत दमदार खेळी करण्यात रोहितने सातत्य जपलं. रोहित शर्मा-शिखर धवन ही जोडगोळी भारतासाठी वनडेतल्या यशस्वी सलामीवीरांच्या जोडीपैकी एक ठरली. जगातल्या अव्वल गोलंदाजांविरुद्ध, जिवंत खेळपट्यांवर या जोडीने मॅरेथॉन भागीदाऱ्या रचल्या आहेत. चार ते सात क्रमांक आणि सलामीवीर म्हणून रोहितची आकडेवारी यातील तफावत बोलकी आहे.

क्रमांक मॅचेस रन्स अॅव्हरेज शतकं अर्धशतकं
1-2 114 5832 58.32 20 27
3 9 120 15.00 0 0
4 26 715 31.08 2 3
5 25 862 45.36 0 8
6 12 200 28.57 0 1
7 7 70 14.00 0 0
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रोहित शर्मा आणि शिखर धवन

द्विशतकी मनसबदार

वनडेत पहिलंवहिलं द्विशतक झळकावण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 24 फेब्रुवारी 2010 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेर येथे नाबाद 200 धावांची खेळी केली. पुढच्याच वर्षी वीरेंद्र सेहवागने 8 डिसेंबर 2011 रोजी इंदूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावांची खेळी केली. या दोन दिग्गजांना प्रमाण मानत रोहितने तब्बल तीन द्विशतकं झळकावली आहेत. वनडेत तीन द्विशतक झळकावणारा रोहित एकमेव फलंदाज आहे. रोहितने 2 नोव्हेंबर 2013 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरू येथे 209 धावांची खेळी केली. पुढच्याच वर्षी म्हणजे 13 नोव्हेंबर 2014 रोजी रोहितने आणखी एका द्विशतकाची नोंद करत जगभरातल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. यावेळी रोहितने कोलकाता येथे श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची अफलातून खेळी साकारली. या दोन द्विशतकांनी धावांची भूक न भागलेल्या रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे नाबाद 208 धावांची खेळी साकारली.

दोनशेवी वनडे

दोनशे वनडे खेळणारा रोहित हा केवळ पंधरावा भारतीय तर 80वा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर (463), राहुल द्रविड (344), महेंद्रसिंग धोनी (337), मोहम्मद अझरुद्दीन (334), सौरव गांगुली (311), युवराज सिंग (304), अनिल कुंबळे (271), वीरेंद्र सेहवाग (251), हरभजन सिंग (236), जवागल श्रीनाथ (229), सुरेश रैना (226), कपिल देव (225),विराट कोहली (222), झहीर खान (200) यांनी दोनशे वनडे खेळण्याचा विक्रम केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)