हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळतायत: भारतासाठी का आहे धोक्याची घंटा?

हिमनद्या, हिमालयातील नद्यांचे स्रोत Image copyright Getty Images

हवामान बदलामुळे हिंदुकुश आणि हिमालयातील हिमनद्या वेगानं वितळत असल्याचं दिसून आलं आहे.

जर कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन लवकर कमी झालं नाही तर हे मोठे हिमाच्छादित प्रदेश नष्ट होतील, असं अभ्यासातून दिसून आलं आहे.

या शतकामध्ये 1.5 अंश सेल्सियसपर्यंत तापमानवाढ रोखू शकलो तरीही यामधील एक-तृतियांश बर्फ वितळेल असं दिसतं. या हिमनद्या त्यांच्या आसपासच्या 8 देशांमधील 2.5 अब्ज लोकांना पाणी पुरवणारा महत्त्वाचा स्रोत आहेत.

के 2 आणि माऊंट एव्हरेस्ट ही हिंदुकुश आणि हिमालय पर्वत रांगेतील हिमाच्छादित शिखरं आहेत. ध्रुवीय प्रदेशानंतर पृथ्वीवर सर्वांत जास्त बर्फ याच प्रदेशात आहे.

पण तापमानवाढीमुळे या शिखरांवरील बर्फ शतकभराच्या आत वितळेल असं वैज्ञानिकांचं मत आहे. वाढती लोकसंख्या आणि प्रदूषणामुळे तापमानवाढ वेगानं होऊन येत्या काही दशकांमध्ये बर्फ वितळून जाईल.

गंगा-सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये हवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषकं मिसळली जातात. हा जगातील प्रदूषित प्रदेशांपैकी एक आहे. प्रदूषित हवेमुळे हिमनद्यांमधील बर्फावर कार्बन आणि धूळ साचते आणि त्यामुळे बर्फ वेगाने वितळतो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा माऊंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहक

जर तापमानात 2 अंश सेल्सियसने जर वाढ झाली तर वर्ष 2100 पर्यंत अर्ध्या हिमनदया वितळून जातील. तसंच तापमानवाढ 1.5 अंशांपर्यंत रोखण्यासाठी या काळामध्ये जगभरात आटोकाट प्रयत्न केले तरीही या शतकभरामध्ये 36 टक्के हिमनद्या नष्ट होतील.

'हवामान बदलाच्या या प्रश्नाबद्दल तुम्ही आजवर ऐकलंही नसेल' असं हा अहवाल देणारे इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंटचे फिलिप वेस्टर सांगतात. ते या अहवालाचे प्रमुख अभ्यासक आहेत.

ते म्हणतात, "जगातील अत्यंत नाजूक आणि संकटग्रस्त पर्वतमय प्रदेशातील लोकांवर हवामान बदलाचे परिणाम होत जातील. यामुळे मान्सून पूर्व काळामध्ये नद्यांचे प्रवाह कमी होतील आणि मान्सूनमध्ये बदल झाल्यामुळे त्याचा सर्वाधिक तोटा शहरांच्या जलपुरवठ्याला होईल. तसंच अन्न आणि ऊर्जा निर्मितीचा समतोल जाईल."

यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि म्यानमारच्या 3500 किमी परिसराच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

या पर्वतांवरील हिमनद्यांवर जगातील सर्वांत महत्त्वाच्या दहा नदी प्रणाली अवलंबून आहेत. त्यामध्ये गंगा, सिंधू, पीतनदी, मेकाँग, इरावती यांचा समावेश आहे.

तसेच त्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अब्जावधी लोकांना अन्न, ऊर्जा, शुद्ध हवा आणि रोजगार देतात.

Image copyright Inpho
प्रतिमा मथळा बर्फ वितळल्यामुळे हिमालय पर्वतरांगांमधील तलावांमध्ये विलिन होणाऱ्या हिमनद्या

हवामान बदलाचा परिणाम केवळ या पर्वतमय प्रदेशात राहाणाऱ्या लोकांवर होईल असं नाही तर त्याखाली असणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये अचानक येणारे पूर, पिकं नष्ट होणं अशा बदलामुळे 1.65 अब्ज लोकांवरही परिणाम होईल.

ब्रिटिश अंटार्क्टिक सर्व्हेचे डॉ. हामीश प्रीतचंद म्हणतात, "जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामामुळे केवळ पर्वतमय प्रदेशातील लोकांच्या आयुष्यावर परिणाम होतो असं नाही तर त्याखालील खोऱ्यांमध्ये राहाणाऱ्या लोकांवरही होतो. हिम वितळल्यामुळे नद्या कशा बदलतील तसंच सुरुवातीच्या काळात उन्हाळ्यात नद्यांचे प्रवाह वाढतील असं या अहवालात म्हटलं आहे."

"पण नंतर एकदा पावसाचं प्रमाण कमी झाल्यावर या मोठ्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये काय होईल? हा खरा प्रश्न मला दिसतो. जर पर्वतमय प्रदेशामध्ये हिमाच्छादन राहिलं नाही तर आगामी काळात नद्यांच्या खोऱ्यांमध्ये राहाणाऱ्या लोकांना मोठ्या दुष्काळांचा सामना करावा लागेल."

"या परिसरात पाणी हा आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. इथलं जगणं दिवसेंदिवस कठिण होत चाललं असून असह्य दुष्काळांचा आधीच कमकुवत बनलेल्या व्यवस्थेला तडाखा बसू शकतो. मला हा अहवाल म्हणजे या आगामी धक्क्यांची पूर्वसूचनाच वाटतो. "

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)