पृथ्वीवरील मानवी जीवन या 5 कारणांनी पूर्णतः नष्ट होऊ शकतं

  • सायमन बिअर्ड आणि लॉरेन हॉल्ट
  • सेंटर फॉर स्टडी ऑफ इक्सिस्टेंशिएल रिस्क
वादळ

फोटो स्रोत, Getty Images

प्रलय येऊन मानवी जीवन नष्ट होऊ शकतं असं म्हणतात, पण मानवी जीवन नष्ट होण्याच्या इतरही अनेक शक्यता आहेत.

इंडिपेंडन्स डे किंवा आर्मागेडन सारख्या चित्रपटांत असं दाखवलं आहे की पृथ्वीवर अशनी (अॅस्टेरॉइड) आदळू शकते आणि जीवन नष्ट होऊ शकतं. अशा नाट्यमय घटनांनी मानवता नष्ट होऊ शकते पण आपलं जीवन नष्ट होण्याचं हे एकमेव कारण आहे असं समजणं म्हणजे सध्या ज्या गंभीर समस्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. या समस्या अशा आहेत की ज्यांच्यावर आपण उपाय योजना केली तर मानवतेवरील संभाव्य धोका टळू शकतो.

1. ज्वालामुखीचा उद्रेक

1815 मध्ये इंडोनेशियातल्या 'माऊंट तंबोरा' ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यात 70,000 हून अधिक लोक मारले गेले होते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जी राख पसरली त्या राखेनी वातावरणाचा एक स्तर झाकोळून टाकला होता. त्या राखेमुळे सूर्यकिरणं पृथ्वीच्या पृष्टभागावर पडणं कठीण झालं होतं. त्या वर्षी उन्हाळा आलाच नाही असं म्हटलं जात होतं. त्या वर्षाचा उल्लेख उन्हाळ्याविनाचं वर्ष असाच करतात.

सुमात्राच्या टोकाला 'लेक टोबा' आहे. त्याची कथा तर भीषण आहे. 75,000 वर्षांपूर्वी हे तळं एका मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालं होतं. त्याचा परिणाम पूर्ण जगावर झाला होता. असं म्हणतात की या घटनेमुळे जगाची लोकसंख्या नाट्यमयरीत्या कमी झाली होती. पण या घटनेच्या सत्यतेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

ज्वालीमुखीचा उद्रेक होईल हा विचार भयंकर वाटतो पण आपण याची फार काळजी करायचं कारण नाही. 2019 मध्ये किंवा त्याच्या नंतर ज्वालीमुखीचा उद्रेक होईल किंवा लघुग्रह येऊन आदळेल याची शक्यता कमीच आहे.

पण इतर काही गोष्टी आहेत ज्याची आपण काळजी घेणं आवश्यक आहे.

2. हवामान बदल

'क्लायमेट चेंज' किंवा हवामान बदल हा 2019 वर्षाचा सर्वांत मोठा धोका ठरू शकतो असं जागतिक आरोग्य संघटना आणि 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं म्हटलं आहे.

नुकतीच संयुक्त राष्ट्रांची परिषद झाली त्यात हवामान बदल हा आपल्या जीवन मृत्यूचा प्रश्न आहे असाच सूर उमटलेला दिसला. त्याच वेळी निसर्गावर डॉक्युमेंटरीज बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले सर डेव्हिड अॅटनबरो यांचे सारखे तज्ज्ञ हवामान बदलामुळे संस्कृती नष्ट होईल आणि 'नैसर्गिक जीवनाचा ऱ्हास' होईल, असं सांगतात.

हे धोके गुंतागुंतीचे आहेत. उष्ण वारे आणि समुद्राची पातळी वाढण्यापासून ते उपासमार किंवा मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होणे यासारख्या अनेक गोष्टी हवामान बदलामुळे घडतील अशी भीती व्यक्त केली जाते.

3. आर्टिफिशिएल इंटेलिजन्स आणि अणुयुद्ध

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे संभाव्य धोके वाढू शकतात असंही तज्ज्ञांना वाटतं. कल्पना करा की सायबर वेपन्सचा वापर करून एखाद्या पूर्ण राष्ट्राचा डेटा चोरीला गेला आणि त्याबदल्यात मोबदल्याची अपेक्षा केली तर ती किंमत काय राहील? किंवा स्टॉक मार्केटमध्ये अॅलगॉरिदमचा काही घोळ झाला आणि शेअर बाजार गडगडला तर?

ते ही जाऊ द्या. पण अणुयुद्ध हा धोका नाही असं कुणीच छातीठोकपणे म्हणू शकणार नाही.

आपलं लक्ष जगातल्या महासत्तांमधल्या संघर्षाकडे आहे. पण नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला जास्त सुरक्षित वाटत आहे का?

या महासत्तांमध्ये कुणाकडे जास्त अण्वस्त्र आहेत याची चढाओढ लागली आहे, त्याच बरोबर पारंपरिक शस्त्रांचा वापरही सर्रास होताना दिसत आहे. आर्टिफिशिएल इंटिलिजन्समुळे त्यात आणखी भर घातली आहे. आर्टिफिशिएल इंटेलिजन्समुळे अणुयुद्धाचा धोका वाढतो असं एक संशोधन सांगतं.

4. साथीचे रोग

अजून एक धोका आहे तो म्हणजे साथीचे रोग. उदाहरणार्थ इंफ्लूएंझामुळे वर्षाला 7,00,000 लोक दगावू शकतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेला किमान 500 अब्ज डॉलरचा फटका बसू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

आता लोकसंख्येची घनता वाढली आहे. त्याचबरोबर लोकांच्या प्रवासात वाढ देखील झाली आहे त्यामुळे साथीचे रोग झपाट्याने पसरू शकतात. 1918मध्ये स्पॅनिश फ्लू'मुळे 5 कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. तशी परिस्थिती उद्भवली तर भविष्य कसं राहील?

5. वाढती लोकसंख्या

आपण या प्रश्नांकडे पाहत आहोत पण आणखी एक गंभीर समस्या आहे ती म्हणजे लोकसंख्या. अंदाजे 8 अब्ज लोक सध्या पृथ्वीवर राहत आहेत. आणि लोकसंख्येत वाढ होतच आहे. इतक्या लोकांचे पोट भरेल इतकं अन्न उपलब्ध राहू शकेल का? इतकंच नाही अन्न, पाणी, शुद्ध हवा आणि ऊर्जा याचा तुटवडा तर आपल्याला भासणार नाही ना? याचा विचार आपण केला आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

जैवविविधतेची होणारी घसरण, पायाभूत सुविधा आणि पुरवठा साखळीवर इतका असह्य ताण निर्माण झाला आहे आणि हवामान बदलामुळे ही समस्या आणखी गंभीर बनली आहे.

या सर्वांचा परस्पर संबंध काय?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

आता या पाच कारणांचा एकत्रितरीत्या आपण विचार करू.

आतापर्यंत या धोक्यांनी किती बळी गेले असा विचार करण्यापेक्षा या धोक्यांमुळे व्यवस्थेवर कसा परिणाम होत आहे किंवा होईल याचा विचार करणं श्रेयस्कर आहे.

2010 मध्ये आइसलॅंडच्या Eyjafjalljokull (एयाफात्लायोकुत) ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यात एकही जीव गेला नव्हता पण युरोपची हवाई वाहतूक सहा दिवसांसाठी बंद होती. 2017मध्ये WannaCry या रॅन्समवेअर अॅटकमुळे ब्रिटनच्या आरोग्य विभागावर परिणाम झाला होता. अनेक संस्थांना या सायबर हल्ल्याचा फटका बसला होता.

आपलं आयुष्य वीज, इंटरनेट, कंप्युटरवर अवलंबून आहे. या गोष्टींना नुकसान पोहचवू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे आपल्या आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. सौर वादळं किंवा अणुस्फोटामुळे देखील संपर्क तुटू शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते.

हे धोके कसे टाळता येतील याचा प्रश्न साहजिकच आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. पण यावर काही उपाययोजना करण्याआधी याबाबत गांभीर्यानं विचार करायला आपण शिकायला हवं. हे धोके आल्यानंतर नवी उभारी कशी घेता येईल याचा विचार करता यायला हवा. तरंच मानवी जीवन सुरक्षित राहील आणि दीर्घकाळ टिकेल असं वाटतं.

(सायमन बिअर्ड आणि लॉरेन हॉल्ट हे सेंटर फॉर स्टडी ऑफ इक्सिस्टेंशिएल रिस्क, केंब्रिज येथे संशोधक आहेत. या लेखात त्यांनी मांडलेले विचार हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)