पूर्वजांनी एकमेकांच्या कवट्यांना भोक पाडण्याचं रहस्य

  • रॉबिन वायली
  • बीबीसी अर्थ
कवटी, शास्त्र, पुरातत्व
फोटो कॅप्शन,

कवटीला पाडलेलं भोक

आधुनिक वैद्यकशास्त्रात ज्याचा उल्लेख आपण सर्जरी म्हणून करतो, त्याच्याशी मिळती जुळती एक प्रक्रिया हजारो वर्षांपूर्वीं तत्कालीन समाजात पार पाडली जात होती. साधीसुधी नाही तर माणसाच्या कवटीतून आरपार होल करण्याची ही अवघड आणि पूर्वी कधीही न ऐकलेली ही क्रिया ट्रिपेनेशन म्हणून ओळखली जाते असे. काय असेल बरे या गूढ शस्त्रक्रियेचा हेतू?

प्रागैतिहासिक काळात मोठ्या प्रमाणावर लोकांकडून या ट्रिपेनेशनचा वापर केला जात होता, जिवंत माणसाच्या कवटीतून ड्रील करून किंवा थेट कापून कवटीच्या हाडांवरील एकेक थर काढून तेथे छिद्र केले जात असे. मेंदूशी निगडित आधुनिक काळातल्या सर्जरीचा अविकसित टप्पा म्हणता येईल, अशी ही क्रिया कित्येक वर्षांपूवी, इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्याची कारणे काय असतील, याचा मागोवा घेणे औत्सुक्यपूर्ण आहे.

आजच्या तारखेपर्यंत, या ट्रिपेनेशनचा पुरावा म्हणता येतील अशा हजारो मानवी कवट्या जगभरातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या पुरातत्त्वीय उत्खननात सापडल्या आहेत. वरवर पाहता या प्रक्रियेचे महत्त्वही शास्त्रज्ञांनी मान्य केले असले तरी आपल्या पूर्वजांनी ट्रिपेनेशनची ही किचकट आणि जीवघेणी प्रक्रिया नेमक्या कोणत्या उद्देशाने पार पाडली असेल, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. ट्रिपेनेशन म्हणजे नेमके काय आणि या गूढ क्रियेमागचे उद्देश उलगडण्याचे आव्हान आजही कायम आहे.

आफ्रिका आणि पॉलिनेशिया येथे 20व्या शतकात पार पडलेल्या ट्रिपेनेशनच्या प्रकरणांचा अभ्यास असे दर्शवतो की किमान या क्षेत्रातील ट्रिपेनेशनच्या शस्त्रक्रिया या वैद्यकीय कारणांसाठी करण्यात आल्या होत्या. कवटीला झालेल्या दुखापतीमुळे होणाऱ्या वेदना किंवा मज्जातंतूविषयक आजारांसाठी या सर्जरी झाल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज आहे.

कदाचित याच हेतूने प्रागैतिहासिक काळातही ट्रिपेनेशनची अवघड सर्जरी केली जात असावी. ट्रिपेनेशनच्या साक्षीदार असलेल्या अनेक कवट्यांवर मज्जारज्जूशी निगडित आजारांचे वा मेंदू कवटीला जोडला जातो त्या भागाच्या दुखापतीविषयक आजारांची लक्षणे दिसून आली आहेत. इतकेच नाही तर बहुतांश प्रकरणांमध्ये कवटीच्या एका विशिष्ट ठिकाणीच होल करण्यात आल्याचे आढळून आले आहे.

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन,

प्राचीन काळातलं एक दृश्य

मात्र वैद्यकीय आणीबाणीसाठी ज्याप्रमाणे या ट्रिपेनेशनचा वापर केला जात असावा त्याप्रमाणे प्राचीन मानवी समूह ही ट्रिपेनेशनची सर्जरी एका वेगळ्याच हेतूने पार पाडत असावेत, असा संशोधकांचा कयास आहे. एखादी रूढी परंपरा वा प्रथा असल्याप्रमाणे हे केले जात असावे का?

ट्रिपेनेशनचे सगळ्यात जुने आणि ठोस पुरावे अंदाजे 7 हजार वर्षांपूवीचे आहेत. प्राचीन ग्रीस, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, पॉलिनेशिया आणि पूर्वेकडील टोकाचा भाग अशा भौगोलिकदृष्ट्या विविध ठिकाणी याचे अवशेष मिळाले आहेत. बहुदा त्यावेळच्या लोकांनी या सर्जरीबाबतची कौशल्ये स्वतंत्रपणे विकसित केली असावीत.

मध्य युगाच्या शेवटच्या टप्प्यात अनेक संस्कृतींनी या ट्रिपेनेशनवर बंदी आणली होती, मात्र तरीही पॉलिनेशिया आणि आफ्रिकेतील काही मागास वा विभक्त भागांमध्ये ही प्रथा 1900व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातही पार पाडली जात होती.

19व्या शतकात या ट्रिपेनेशनवरचा पहिला, ठोस आणि विस्तृत संशोधनपर अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून, अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत- मानवी शरीरातून आत्मा बाहेर पडावा वा आत्म्याने शरीरात प्रवेश करावा म्हणून आत्म्याच्या प्रवेशासाठी केलेली ही प्रारंभीची कृती असावी असा दावा ते करतात.

मात्र या दाव्याची पुष्टी करणारे थेट पुरावे मिळालेले नाहीत. तरीही ही शक्यता अगदीच रद्दबादल करता येण्यासारखी नाही. वैद्यकीय कारणांसाठी ट्रिपेनेशन केले जात असले हे तथ्य मानले तर काही प्रकरणांमध्ये मेंदूविकारांचा कोणताही पुरावा सापडलेला नाही, तरीही ही प्रकिया पार पडलेल्याचे आढळून आले आहे.

मात्र रशियातील एका लहानशा भागातील संशोधकांनी चोख कामगिरी बजावली आहे. याबाबतचे आतापर्यंतचे सर्वोत्तम विश्लेषण सादर करत त्यांनी ट्रिपेनेशन आणि त्याच्याशी संबंधित रूढींबाबत जबाबदार भाष्य केले आहे.

फोटो स्रोत, The German Archaeological Institute (DAI), Julia G

फोटो कॅप्शन,

कवटीला पाडलेलं भोक

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

याची सुरुवात झाली 1997 साली. रशियाच्या दक्षिणेकडील टोकावर वसलेल्या रोस्तोव्ह-ऑन-डॉन या ठिकाणी प्रागैतिहासिक काळातील एका जागेचे उत्खनन करत असताना काही अवशेष संशोधकांच्या हाती लागले. काळ्या समुद्राच्या नजीकच्या नॉर्थन रिचेस भागाजवळचे हे ठिकाण.

या ठिकाणी 35 मानवी सागांड्यांचे अवशेष हाती लागले. 20 स्वतंत्र थडग्यांमध्ये हे सांगाडे पुरलेले होते. पुरण्याच्या पद्धतीवरुन पुरातत्वशास्त्रज्ञांना याची खात्री पटली की किमान इसवी सन 5000 ते 3000 च्या काळातले हे अवशेष असावेत. ताम्रयुग वा ताम्रपाषाण युग या नावावे हा काळ ओळखला जातो.

त्यातल्याच एका थडग्यात पाच वयस्कांचे सांगाडे आढळून आले होते- दोन स्त्रिया आणि तीन माणसे पुरलेली. तर त्यांच्यासोबतच 1 ते 2 वर्षांचे मूल आणि 1 किशोरवयीन मुलगी यांचेही सांगाडे तेथे पुरण्यात आले होते.

वास्तविक एकाच ठिकाणी आणि एकाच थडग्यात इतक्या जणांचे सांगाडे सापडणे विशेषतः प्रागैतिहासिक काळातील अवशेषांचे ही आजिबात नावीन्यपूर्ण गोष्ट नाही. मात्र या सर्व सांगाड्यांमध्ये जे साम्य आढळून आले ती बाब दखल घेण्याजोगी होती. त्यांच्यातील 2 बायका, 2 पुरुष आणि 1 किशोरवयीन मुलगी या सगळ्यांचे ट्रिपेनेशन झालेले होते.

व्हीडिओ कॅप्शन,

3000 वर्षापूर्वीचे अवशेष सापडले गोरेवाडामध्ये

या सगळ्यांच्या कवटीमध्ये एक होल आढळून आले, काही सेंटीमीटर रुंद असलेले आणि आकाराने लंबवर्तुळाकृती असलेले हे होल ओबडधोबड किनारीचे आहे. तिसऱ्या पुरुषाच्या कवटीमध्ये या वर्तुळाच्या भोवती कसल्याशा खुणाही दिसल्या, कोरून कोरून हे वर्तुळ केलेले असावे असे यातून वाटते. मात्र संपूर्ण वर्तुळाच्या परिघावर या खुणा नव्हत्या. फक्त लहानग्या बालकाच्या कवटीवर कसलेली छिद्र नाही.

रशियातील रोस्तोव्ह-ऑन-डॉन येथील सदर्न फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या एलेना बटिवा या पुरात्त्वशास्त्रज्ञ असलेल्या प्राध्यापिकेवर या थडग्यांचे विश्लेषण करण्याची जबाबदारी आली. त्यांनी तात्काळ हे ट्रिपेनेशनच्या प्रकरणांचे पुरावे असल्याचे सांगितले, मात्र त्यांनाही वरवर साधे दिसणारे हे अवशेष साधारण नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं.

सर्व कवट्यांमध्ये करण्यात आलेले होल एकाच ठिकाणी करण्यात आले होते. वैद्यकीय परिभाषेत ज्याला कवटीचा ओबेलियन पॉइंट अर्थात शिखाबिंदू म्हणतात, अगदी त्याच जागी सर्वांना छिद्रे पाडण्यात आली होती. कवटीच्या मधोमध आणि कानांना जोडणाऱ्या रेघेवर वरील बाजूला हा बिंदू असतो. साधारणपणे उंच जागी पोनीटेल बांधली तर जिथे ती बांधली जाईल तिकडेच हा बिंदू असतो.

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन,

या यंत्राद्वारे कवटीला भोक पाडण्यात येतं

आतापर्यंत नोंद झालेल्या या ट्रिपेनेशनच्या प्रकरणांमध्ये या शिखाबिंदूच्या वरील बाजूवर होल आढळून आलेल्या अवशेषांचे प्रमाण 1 टक्क्यांहून कमी आहे. म्हणजे वरील अवशेष खास होते. एवढेच नाही तर अशा प्रकारचे टिपेनेशन प्राचीन रशियामध्ये फारच दुर्मिळ असल्याचे बेटीवा यांना माहित होते. त्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत असे शिखाबिंदवर ट्रिपेनेशन झाल्याचे 1 प्रकरण नोंद झालेले होते. 1947 साली झालेल्या उत्खननात त्यासंबंधीचे अवशेष समोर आले होते आणि आश्चर्य म्हणजे तो भाग आता सुरू असलेल्या उत्खनन क्षेत्राच्या जवळच होता.

त्यामुळे अशा प्रकारचे आणखी एखादे जरी ट्रिपेनेशनचे प्रकरण जरी समोर आले तरी ते महत्त्वाचेच होते. आणि बेटीवा यांच्यासमोर तर पाच-पाच अवशेष आले होते आणि तेही सगळे एकाच थडग्यात पुरलेल्या सांगांड्यांच्याबाबतीत. हे अभूतपूर्व होते आणि अजूनही हे दुर्मिळ उदाहरण आहे.

शिखाबिंदूवरील ट्रिपेनेशन खूपच दुर्मिळ असण्यामागे एक कारण आहे- ही कृती अत्यंत जोखमीची धोकादायक आहे.

शिखाबिंदू हा सुपिरियर सॅजिटल सायनसच्या थेट वर वसलेला आहे. मेंदूच्या मुख्य रक्तवाहिन्यांमधून वाहण्यापूर्वी जेथे रक्त जमा केले जाते त्याच्या थोडेसे वर हा बिंदू असतो. म्हणूनच या ठिकाणी कवटीला होल पाडणे किती जोखमीचे असेल याची कल्पना येऊ शकेल. थोडाही अंदाज चुकला तर गंभीर स्वरूपाचा रक्तस्राव किंवा थेट यमसदनी जाण्याचाही धोका आहे.

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन,

डोकेदुखी खूपच वेदनादायी असते.

यातून हे सूचित होते की रशियातील ताम्रयुगीन रहिवाशांकडे काहीतरी ठोस कारण असले पाहिजे ज्यासाठी ते ही जोखमीची ट्रिपेनेशनची सर्जरी करीत असावेत. इतकी धोकादायक असली तरी कोणाच्याही कवटीवर कोणत्याही जखमेच्या खुणा किंवा दुखापत झाल्याच्या खुणा सापडलेल्या नाहीत अगदी ट्रिपेनेशनच्या आधी वा नंतरही.

वेगळ्या शब्दात मांडायचे म्हणजे, पूर्णपणे निरोगी असलेल्यांवरही ट्रिपेनेशनची सर्जरी करण्यात आली होती. म्हणूनच ही ट्रिपेनेशनची प्रक्रिया एखाद्या रूढीचा वा प्रथेचा भाग असावी का, जेणे करून धोका पत्करुनही ती पार पाडण्यात आली होती?

कुतुहल जागवणारी तसेच आपली उत्सुकता कमालीची वाढवणारी ही शक्यता आहे. मात्र बटिवा यांच्यापुढचे आव्हान मोठे आहे, त्यांना या सगळ्यातून एक माग काढायचा आहे. त्यांना दक्षिण रशियातील आणखी काही सागांड्यांचे परीक्षण करायचे आहे, कितीही गूढ वाटले तरी काही मोजक्या सांगांड्यांमुळे संशोधनाची दिशा भरकटली जाऊ नये हेसुद्धा त्यांच्यापुढील मोठे आव्हान आहे.

कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी किंवा हे गूढ संशोधन गुंडाळण्यापूर्वी रशियातील पुरातत्त्व विभागाच्या अप्रकाशित अहवालांवर एखादी नजर टाकावी अशा विचार बेटिवा यांनी केला. समजा शिखाबिंदूवर ट्रिपेनेशन झाल्याचे आणखी काही दाखले इतिहासात असतील मात्र त्यांची योग्य नोंद घेतली गेली नसेल असे काही हाती लागल्यास उपयोगी पडेल या हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला.

आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या हाती दोन क्लू लागले. दोन तरुण महिला ज्यांच्याही शिखाबिंदूवर ट्रिपेनेशन केले गेले आहे, त्यांच्या कवट्या याआधी दोन वेळा झालेल्या उत्खननात सापडल्या होत्या- एकदा १९८० साली आणि दुसऱ्यांदा १९९२ साली. दोन्ही ठिकाणे रास्तोव्ह-ऑन-डॉन पासून ३१ मैलांच्या अंतरावरच वसलेली होती. विशेष म्हणजे दोन्ही प्रकरणांमध्ये वैद्यकीय कारणांसाठी ही प्रक्रिया केली गेली असल्याचे पुरावे हाती लागलेले नाहीत.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन,

एक सांगाडा

या घटनेमुळे बटिवा यांच्याकडे अभ्यासासाठी अथवा संदर्भासाठी आता एकूण ८ असमान्य कवट्या झाल्या. विशेष म्हणजे सगळ्यांचे उगमस्थान दक्षिणेकडील रशियाच्या आसपासचेच आणि साधारणपणे एकाच कालखंडातील म्हणता येतील अशी ही प्रकरणे आहेत. मात्र यानंतर साधापण १ दशकानंतर याबाबत नवी माहिती प्रकाशात आली.

2011 साली, आंतरराष्ट्रीय पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा एक चमू १३७ सांगाड्यांचे विश्लेषण करत होता. नुकत्याच तीन विविध ठिकाणी केलेल्या उत्खननात हे सांगाडे सापडले होते. ताम्रयुगातील हे अवशेष रोस्तोव्ह-ऑन-डॉनच्या अग्नेय दिशेकडे, अंदाजे ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या स्तावरोपोल क्राय या भागात सापडले होते. सध्याच्या जॉर्जियाबरोबरच्या सीमावर्ती भागातला हा प्रदेश आहे.

खरे तर ट्रिपेनेशनविषयी अधिक संशोधन करणे वगैरे हेतू या चमूचा नव्हताच. प्रागैतिहासिक काळात त्या भागात राहणाऱ्या स्थानिकांचे सर्वसाधारण आरोग्य कशाप्रकारचे होते याचा त्यांना अभ्यास करायचा होता. मात्र 137 सांगाड्यांपैकी 9 कवट्यांवर त्यांना संशयास्पद होल आढळून आले.

त्यांच्यातल्या 5 कवट्यांवर ट्रिपेनेशनचे उत्तम उदाहरण म्हणता येईल अशा खुणा होत्या. कवटीच्या पुढील बाजूला आणि एका बाजूला झुकलेल्या ठिकाणी होल करण्यात आल्याचे आढळून आले. मात्र यासोबत शारीरिक वेदना, दुखापत यांच्याही खुणा होत्या. ज्यावरून असे सूचित होत होते की कुठल्यातरी आजारावरील उपचाराचा भाग म्हणून ट्रिपेनेशन करण्यात आले होते.

उरलेल्या 4 कवट्यांवर कोणत्याही आजार व रोगाचा त्रास असल्याच्या खुणा सापडल्या नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चारही कवट्यांवर करण्यात आलेले ट्रिपेनेशन तंतोतंत शिखाबिंदूवरच करण्यात आले होते.

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन,

अनेक कवट्या

जवळपास योगायोगानेच जर्मनीतील पुरातत्त्व संस्थेच्या (डीएआय) एक पुरातत्त्वीय शास्त्रज्ञ ज्युलिया ग्रेस्की यांचीही या संशोधनात उडी घेतली. त्यापूर्वी बटिवा यांच्या संशोधनपर प्रबंधांचे वाचन त्यांनी केले होते. रोस्तोव्ह-ऑन-डॉन येथील दुर्मिळ ट्रिपेनेशनविषयी बटिवा यांनी विस्तृत मुद्दे त्यात मांडले होते.

त्यामुळे आता ग्रेस्की, बटिव्हा आणि आणखी काही शास्त्रज्ञ एकत्र आले आणि त्यांनी दक्षिण रशियातील या दुर्मिळ वा असाधारण ट्रिपेनेशनचा अन्वयार्थ लावण्याचा कयास सुरू केला. त्यांचा अभ्यास अमेरिकन जर्नल ऑफ फिजिकल अँथ्रोपोलॉजी या मासिकात एप्रिल 2016मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

कुठेही सापडल्या असल्या तरी त्यांच्या हाती आलेल्या या 12 कवट्यांचा शोध हा लक्षणीय ठरणारच होता. पण सत्य हे होते की रशियाच्या एका छोट्याशा भागातून हे अवशेष हाती लागले होते. याचा अर्थ जागा आणि घटना यांच्यातही काही कनेक्शन असणारच होतं. जर काहीच लींक नसती, तर अशा दुर्मिळ ट्रिपेनेशनच्या घटनांचे अवशेष तेही दक्षिण रशियातच फक्त आढळून येण्याच्या शक्यता धूसर असत्या.

ग्रेस्की, बटिवा तसेच त्यांचे सहकारी असा दावा करतात की जरी हे सिद्ध करणे कठीण असले तरी या दुर्मिळ ट्रिपेनेशनचे अवशेष याच भागात अधिक प्रमाणावर एकवटलेले पाहायला मिळतात त्यावरून दक्षिण रशिया कदाचित अशा ट्रिपेनेशनच्या प्रथांचे केंद्र असल्याचे म्हणता येईल.

मॉस्कोतील रशियन ॲकेडमी ऑफ सायन्सच्या मारीया मोडनिकोवा या रशियीतील ट्रिपेनेशन या विषयातील तज्ज्ञ समजल्या जातात. त्यांचा असा विश्वास आहे की मेंदूच्या नाजूक भागाजवळ धोकादायक ठरतील अशा जागी होल करण्याची क्रिया कुठल्यातरी ठोस प्रकारचे 'परिवर्तन' प्राप्त करण्यासाठी केली जात असावी. या ठिकाणी ट्रिपेनेशन केल्यामुळे समाजातील सामान्य माणसांकडे असलेल्या कौशल्यांपैक्षा उच्च दर्जाचे काही गुण किंवा शक्ती यांची प्राप्ती होऊ शकेल असा लोकांचा विश्वास असावा असा दावा त्या करतात.

मात्र बाहेरून इतके निरोगी असणाऱ्या लोकांनी अशी जीवघेणी धोकादायक पद्धतीने केली जाणारी शस्त्रक्रिया का केली असेल याबाबत आपण फक्त अंदाज व्यक्त करु शकतो. ट्रिपेनेशनच्या होलला आपण खरे तर धन्यवाद दिले पाहिजेत. कारण ट्रिपेनेशन झाल्यावर त्या लोकांच्याबाबत काय झाले असावे याबाबतचे सत्य त्यांच्या स्थितीवरूनच आपल्याला कळू शकले.

12 कवट्यांपैकी एका महिलेची कवटी, जी महिला अंदाजे पंचविशीच्या घरातली असावी जिचे अवशेष रोस्तोव्ह-ऑन-डॉन नजीकच्या पुरातत्वीय क्षेत्राजवळ सापडले होते. तिच्या अवशेषांवरुन तिची ट्रिपेनेशननंतर दुरुस्त झाली असावी असे पुरावे नाहीत. याचा अर्थ ही सर्जरी सुरु असतानाच किंवा झाल्यावर थोड्याफार वेळानेच तिचा मृत्यू झाला असावा असे दिसून येते.

मात्र इतर कवट्यांच्याबाबतचे चित्र वेगळे होते. हे बाकीचे लोक या कठीण सर्जरीनंतरी बचावले होते. त्यांच्या कवट्यांवर होल झाल्यानंतर ती जखम भरली गेल्याच्या खुणा आहेत. जरी हाडांची पूर्णपणे मूळ स्वरूपात वाढ होत नसली तरी त्यांची झालेली झीज भरुन आल्याचे दिसून येते.

फोटो स्रोत, The German Archaeological Institute (DAI), Julia G

फोटो कॅप्शन,

कवटीला भोक पाडण्यामागचं रहस्य काय असावं?

12 पैकी 3 कवट्यांवर थोडीफार जखम भरून आलेली दिसून आली. यावरुन या सर्जरीनंतर हे लोक 2 ते 8 आठवड्याच्या अंतराने मृत्यू पावले असावे असे दिसून येते. यातल्या 2 महिलांच्या कवट्या असून त्या 20 ते 35 वयोगटातील असाव्यात असे दिसून येते. तर तिसरी व्यक्ती थोडी वयस्कर महिला असून 50 ते 70 वयोगटातील ती असावी असे वाटते.

इतर 8 कवट्यांमध्ये दुखापत भरुन आल्याच्या खुणा प्रभावीपणे दिसून येतात. आज हाडांच्या पुनर्वाढीविषयी जे काही संशोधन झाले आहे, त्या आधारावार ट्रिपेनेशन नंतर हे लोक कमीत कमी 4 वर्षे तरी जगले असावेत असे अंदाजाने म्हणता येईल.

या आठ जणांमध्ये रोस्तोव्ह-ऑन-डॉनजवळ सापडलेल्या सामूहिक थडग्यांमधील पाच माणसांच्या सांगाड्यांचाही समावेश आहे. जवळपास 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदा बटिवा यांचे लक्ष या अवशेषांनी वेधून घेतले होते.

दोन पुरुष, दोन महिला आणि 1 किशोरवयीन मुलगी हे सगळे शिखाबिंदूवर ट्रिपेनेशन झाल्यानंतरही अनेक वर्षे जगले. किशोरवयीन मुलीच्या सांगाड्यावरून ती 14 ते 16 वर्षांची असावी असा अंदाज बांधता येतो. ही सर्जरी पार पडली असावी तेव्हा ती 12 वर्षे किंवा त्याहूनही लहान असली पाहिजे असे सांगता येईल.

तरीही अशी शक्यता आहे की हे 12 लोक डोक्याच्या दुखापतीने किंवा मेंदूशी निगडित आजारानेही पीडित असावेत. याचा अर्थ ट्रिपेनेशनची सर्जरीचा उपयोग त्यांच्यातल्या किमान 8 जणांना तरी झाला आहे.

पण हीसुद्धा शक्यता आहे की बटिवा आणि तिचे सहकारी यांचा अंदाज खरा असण्याचीही शक्यता आहे. आणि एखादा विधी पार पाडण्याच्या हेतूनेच त्यांच्यावर ट्रिपेनेशन केले गेले असावे. आणि जर हे सत्य असेल तर त्यांना त्यानंतर आयुष्यात त्याचा काय फायदा झाला किंवा त्यांना काय फायदा होणार होता, याबाबत आपण फक्त कल्पना करू शकतो.

मात्र अशाप्रकारची धोकादायक सर्जरी प्राचीन काळात आपल्या पूर्वजांनी पार पाडली, त्याचा खरोखरीच उपयोग असेल तर हे गूढ सुटलेच पाहिजे अशा प्रकारातले आहे असे म्हणावे लागेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)