पुलवामा : भारताने हल्ला केला तर पाकिस्तान प्रत्युत्तर देईल - इम्रान खान

इम्रान खान

फोटो स्रोत, Getty Images

जर पाकिस्तानवर हल्ला झाला तर पाकिस्तान विचार करणारा नाही, त्याचं उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. त्यात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इम्रान खान यांची भूमिका फेटाळून लावली आहे.

14 फेब्रुवारीला काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यात CRPFचे चाळीसच्यावर जवान मृत्युमुखी पडले. भारताने या हल्ल्यासाठी थेट पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. हा हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील कट्टरपंथी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली आहे.

इम्रान खान म्हणाले, "पाकिस्तानवर कोण्याताही पुराव्यांशिवाय आरोप केले आहेत. पाकिस्तानसाठी सौदी अरेबियाच्या राजकुमारांचा दौरा अतिशय महत्त्वाचा होता. पाकिस्तान स्थैर्याकडे वाटचाल करत असताना पाकिस्तान असं का करेल?"

"पाकिस्तान असं का करेल? त्यामुळे पाकिस्तानला काय फायदा होणार आहे? मी सातत्याने सांगत आहे हा नवा पाकिस्तान आहे. पाकिस्तान स्वतःच दहशतवादाचा सामना करत आहे. मी तुम्हाला प्रस्ताव देतो, या आणि चौकशी करा. जर कुणी दहशतवादासाठी पाकिस्तानच्या भूमिचा वापर करत असेल, तर तो आमच्यासाठी शत्रू आहे."

"मी विचारू इच्छितो कोणत्या आंतरराष्ट्रीय कायद्याने एक देश किंवा एक बाजू किंवा एक पक्ष न्यायाधीश, वकील आणि अंमलबजावणी करणारा असू शकतो? हे तुमचं निवडणुकीचं वर्ष आहे. पाकिस्तानला धडा शिकवला तर राजकीय फायदा मिळू शकतो."

इम्रान खान म्हणाले, "दहशतवाद हा या संपूर्ण परिसराचा प्रश्न आहे. दहशतवादामुळे पाकिस्तानचं 100 अब्ज डॉलरचं नुकसान झालेलं आहे. भारतातही नवा विचार येण्याची गरज आहे. कशामुळे काश्मीरमध्ये मृत्यूचं थैमान संपत नाही? या समस्येचा उपाय फक्त चर्चा हाच आहे. भारताने यावर विचार करू नये का? भारतातील माध्यमांतून आणि राजकीय क्षेत्रातून सांगितलं जात आहे की पाकिस्तानवर सूड उगवला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानवर हल्ला झाला तर पाकिस्तान विचार करेल? विचार नाही करणार, पाकिस्तान उत्तर देईल."

"पण पुढं काय होणार? युद्ध सुरू करणं सोप आहे पण ते थांबवणं कोणाच्याच हातात नाही. चांगल्या संवेदना जाग्या राहाव्यात. आम्ही शहाणपणं वापरू. समस्या फक्त चर्चेतून सुटतील. तेच आता अफागाणिस्तानात घडत आहे," असं ते म्हणाले.

भारताची भूमिका

इम्रान खान यांनी केलेल्या या भाषणाला प्रत्युत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भारताने विश्वासार्ह कारवाईची मागणी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेलं निवेदन असं :

"पुलवामातील हल्ला 'दहशतवादी' हल्ला मानण्यास इम्रान खान यांनी नकार दिला आहे याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या हल्ल्याचा निषेधही केलेला नाही आणि हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचं सांत्वनही केलेलं नाही."

"पाकिस्तानने दहशतवाद्यांशी संबंध वारंवार नाकारले आहेत. हा हल्ला ज्यांनी घडवला त्या जैश ए महम्मद आणि 'दहशतवाद्यां'नी केलेलं दाव्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. जैश ए महम्मदचा नेता मसुद अझहर पाकिस्तानात आहे हा पाकिस्तानने कारवाई करण्यासाठी पुरेसा पुरावा आहे."

"भारताने पुरावे दिले तर या हल्ल्याचा तपास करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. पण ही पळवाट आहे. मुंबईवरील हल्ल्याचेही पुरावे दिले गेले होते, पण 10 वर्षांत यात काहीही प्रगती झालेली नाही. पठाणकोट हल्ल्यातही असाच प्रकार घडला आहे. पाकिस्तानचा या संदर्भातील इतिहास पोकळ आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी 'नव्या पाकिस्तान'बद्दल मत मांडलं आहे. पण या 'नव्या पाकिस्तान'तील मंत्री हाफीज सईदसोबत व्यासपीठावर असतात. हाफीज सईदला संयुक्त राष्ट्रांनी 'दहशतवादी' ठरवलं आहे."

"पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संवाद व्हावा असं म्हटलं आहे. भारताने दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरण असेल तर द्विपक्षीय चर्चेची तयारी नेहमीच दर्शवली आहे. पाकिस्तान 'दहशतवादा'चा सर्वांत मोठा बळी आहे, हा दावाही खोटा आहे. कारण पाकिस्तान कधीच 'दहशतवादा'च्या केंद्रस्थानी नव्हता."

"पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताने या 'दहशतवादी' हल्ल्याला दिलेल्या प्रतिक्रियेचा संबंध लोकसभा निवडणुकीशी जोडला आहे. भारता हे आरोप फेटाळत आहे. भारत ची लोकशाही जगासाठी आदर्श आहे, पाकिस्तान हे कधीही समजू शकणार नाही. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करणं बंद करावं आणि पुलवामातील हल्ल्यांत विश्वासार्ह कारवाई करावी, अशी भारताची मागणी आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)