मोहम्मद बिन सलमान : सौदीत 'महिलांना हक्क देणारा' आणि 'विरोधकांना चिरडणारा' तेलसम्राट

सौदी अरेबिया Image copyright AFP
प्रतिमा मथळा सौदीचे युवराज मोहम्मद

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान अल सौद भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुलवामा इथं झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दौऱ्याला मोठं महत्त्व आलं आहे. जगातील आघाडीच्या तेलउत्पादक राज्याचे युवराज या नात्याने त्यांचा दौरा आर्थिक तसेच राजकीय पातळीवर विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा.


सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान अल सौद यांचं नाव जेमतेम काही लोकांनी ऐकलं असेल. पण 33 वर्षीय मोहम्मद बिन सलमान हे जगाला खनिज तेलाचा अमर्याद पुरवठा करणाऱ्या सौदी अरेबियाचे सर्वेसर्वा आहेत.

सौदीतील कर्मठ परंपरांना छेद देत सुधारणांची मोहीम राबवल्याबद्दल पाश्चिमात्य देशांनी मोहम्मद यांच्या नेतृत्वशैलीचं कौतुक केलं होतं. मोहम्मद यांनी सौदीत महिलांवरील ड्रायव्हिंगची बंदी रद्द केली.

मात्र शेजारील राष्ट्र येमेनेशी युद्धाचा निर्णय घेतल्याप्रकरणी मोहम्मद यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती. या युद्धामुळे मानवजातीवर संकट ओढवलं असं अनेकांनी म्हटलं. या युद्धाचा परिणाम म्हणून सौदी आणि कतार यांच्यातील राजनयिक संबंध दुरावले. त्यातूनच गल्फ कॉऑपरेशन काऊंसिल (जीसीसी) मध्ये फूट पडली.

सौदी पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या हत्येनंतर मोहम्मद यांना पदावरून दूर करावे अशी मागणीही जोर धरत होती. खाशोग्जी यांनी मोहम्मद यांच्या धोरणांना सातत्याने विरोध केला होता. ऑक्टोबर 2018 मध्ये इस्तंबूल येथील सौदीच्या दूतावासात सौदीच्या गुप्तचर सूत्रांनी खाशोग्जी यांची हत्या केली.

मोहम्मद बिन सलमान यांचा जन्म 31 ऑगस्ट 1985 रोजी झाला होता. प्रिन्स सलमान बिन अब्दुल अझिझ अल सौद आणि त्यांच्या तिसऱ्या पत्नी फहदाह बिन्त फलाह बिन सुलतान यांचे ते मोठे चिरंजीव.

राजधानी रियाध शहरातील किंग सौद विद्यापीठात राजे मोहम्मद यांनी कायद्याच्या पदवीचं शिक्षण घेतलं. त्यांनी प्रशासनात अनेक भूमिका भूषवल्या. 2009मध्ये मोहम्मद यांची त्यांच्या वडिलांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. मोहम्मद यांचे वडील त्यावेळी रियाधचे गव्हर्नर होते.

मोहम्मद यांच्याकडे 2013 मध्ये सौदीच्या मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. 2012मध्ये मोहम्मद यांची क्राऊन प्रिन्सपदी म्हणजे युवराज पदावर नियुक्ती झाली. नायफ बिन अब्दुल अझिझ यांचा मृत्यू झाल्याने त्यांची निवड झाली.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा सौदीतलं वातावरण वेगळं आहे.

जानेवारी 2015मध्ये किंग अब्दुल्ला बिन अब्दुल अझिझ यांचा मृत्यू झाला आणि सलमान यांच्याकडे वयाच्या 79व्या वर्षी सौदीच्या राजेपदाची सूत्रं हस्तांतरित झाली.

त्यांनी मोहम्मद यांची संरक्षणमंत्रिपदी नियुक्ती केली.

मोहम्मद यांनी संरक्षणमंत्रिपदाची सूत्रं हाती घेताच अन्य अरब राष्ट्रांच्या बरोबरीने येमेनमध्ये मार्च 2015मध्ये लष्करी आक्रमण केलं. इराणमधील बंडखोरांप्रमाणे, सौदी बंडखोरांनी राजधानी सानावर ताबा मिळवला. या बंडामुळे राष्ट्राध्यक्ष अब्दुराबूह मन्सौर हादी यांनी देशातून पळ काढला.

मोहम्मद यांनी येमेनमध्ये हाती घेतलेल्या लष्करी आक्रमणाला साडेतीन वर्षात मर्यादित यश मिळालं. सौदी अरेबिया आणि मित्रराष्ट्रांवर युद्धादरम्यान गुन्हेगारी केल्याचा आरोप आहे. युद्धामुळे हजारो येमेनी नागरिकांना दुष्काळाच्या चटके सहन करावे लागत आहेत.

एप्रिल 2015मध्ये किंग सलमान यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. त्यांनी मोहम्मद बिन नायफ यांची राजकुमारपदी निवड केली. स्वत:च्या मुलाला उपराजकुमार म्हणून निवडलं. मोहम्मद यांना सौदीचे उपपंतप्रधानही केले. त्याचवेळी काऊंसिल ऑफ इकॉनॉमिक अँड डेव्हलपमेंट अफेअर्सचे अध्यक्ष होते.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा सौदीने येमेनवर लष्करी आक्रमण केलं.

वर्षभरात, मोहम्मद बिन सलमान यांनी आर्थिक आणि सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने महत्त्वाची अशी महत्वाकांक्षी योजना मांडली. केवळ तेलाभोवती असलेलं सौदीचं अर्थ आणि समाजकारण यालाही त्यांनी वेसण घातलं.

व्हिजन 2030 असं या योजनेचं नाव आहे. 2020च्या शेवटापर्यंत बिगर तेल उद्योग-व्यवसायातून 160 बिलिअन डॉलर्स एवढी रक्कम गंगाजळीत यावी असा त्यांचा मानस आहे. त्यानंतर दहा वर्षांत म्हणजे 2030पर्यंत 1 ट्रिलिअन रियाल्स व्हावा असं त्यांना वाटतं.

मोहम्मद यांना 3 ट्रिलिअन डॉलर्स एवढा प्रचंड जागतिक सार्वभौम निधी तयार करायचा आहे. सौदी अरामको या तेल उत्पादक कंपनीचं अंशत: खासगीकरण करून हा निधी उभारण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

या योजनेअंतर्गत शैक्षणिक अभ्यासक्रमांचं स्वरूपही बदलण्यात येणार आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचं प्रमाण वाढावं तसंच रोजगार निर्माण व्हावा यासाठी मनोरंजन क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार आहे.

एप्रिल 2017मध्ये राजघराण्याने रियाध शहराच्या बाहेर 334 किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेलं एंटरटेनमेंट सिटी स्थापन करण्याची घोषणा केली. या परिसरात सफारी पार्कच्या बरोबरीने अनेक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रम असणार आहेत.

जून 2017मध्ये सौदीसह संयुक्त अरब अमिराती, बहरीन, इजिप्त यांनी एकत्रित कतारवर बहिष्कार टाकला. या मोहिमेचं मोहम्मद यांनी नेतृत्व केलं. दहशतवादाला पाठिंबा आणि शेजारी देशांच्या कारभारात हस्तक्षेप केल्याप्रकरणी कतारवर अशी कारवाई करण्याचा निर्णय या देशांनी घेतला होता.

कतारने हे सगळे आरोप नाकारले आहेत. राजनैतिक आणि व्यापारी संबंध पूर्ववत व्हावेत यासाठी अटींची पूर्तता करण्यास कतारने नकार दिला. यामुळे कतार आणि मध्यपूर्वेतील अन्य देशांमधील संबंध दुरावलेलेच आहेत.

जून 2017मध्ये राजे सलमान यांनी अनेक महिने सुरू असलेला शक्यतांचा खेळ संपुष्टात आणला. मोहम्मद बिन नायफ यांना गृहमंत्रीपदावरून हटवण्यात आलं. या निर्णयामुळे सुरक्षा यंत्रणेची सूत्रं शाही राजघराण्याच्या हाती आली.

मोहम्मद बिन सलमान यांनी हळूहळू आपलं वर्चवस्व प्रस्थापित केलं. ते करताना त्यांनी आर्थिक आणि सामाजिक सुधारणांची अंमलबजावणी केली.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा मानवाधिकार कार्यकर्त्या अझिझा-अल-युसुफ यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

मोहम्मद बिन सलमान यांनी लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मिळणारे भत्ते, बोनस आणि आर्थिक फायदे रद्द केले. 2016 मध्ये तेलाच्या किमती घसरत असताना हा बदल करण्यात आला होता.

सप्टेंबर महिन्यात राजघराण्याच्या ध्येयधोरणांना विरोध करणाऱ्या व्यक्तींविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली. वीस प्रभावशाली बुद्धिजीवी विचारवंतांना ताब्यात घेण्यात आलं.

परकीय मदतीच्या बळावर सौदी साम्राज्याच्या सुरक्षेविरोधात काम करणाऱ्या एका गटाला लक्ष्य करण्यात आलं.

त्याच महिन्यात राजे सलमान यांनी सौदीत महिलांना ड्रायव्हिंग करण्यास असलेली बंदी रद्द केली. या निर्णयाचं श्रेय मोहम्मद बिन सलमान यांना देण्यात आलं. या निर्णयाला पारंपरिक विचारसरणीच्या लोकांनी कडाडून विरोध केला होता.

मवाळ इस्लाम अर्थात मर्यादित प्रमाणात इस्लामच्या नीतीनियमांची अंमलबजावणी हे सौदी साम्राज्याच्या आधुनिकीकरणात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं राजेंनी ऑक्टोबर महिन्यात म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी निओम नावाच्या बिझनेस सिटीमध्ये 500 बिलिअन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा भ्रष्टाचारप्रकरणी अनेकांवर कारवाई करण्यात आली.

पुढच्याच महिन्यांत राजेंनी सर्वसमावेशक भ्रष्टाचारविरोधी मोहीम राबवली. या निर्णयासह साम्राज्याची सगळी सूत्रं त्यांच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला.

प्रिन्स अल्वालीद बिन तलाल आणि प्रिन्स मितेब बिन अब्दुल्ला, दिवंगत राजांचे पुत्र आणि आणि नॅशनल गार्डचे प्रमुख यांच्यासह 381 जणांना ताब्यात घेण्या आलं.

400 बिलिअन रियाल्स म्हणजेच 107 बिलिअन डॉलर्स एवढ्या प्रचंड रकमेच्या वाटाघाटी झाल्याचं अटॉनी जनरल यांनी जानेवारी 2018मध्ये घोषित केलं. ज्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे तसंच मालमत्ता, पैसे, सुरक्षाव्यवस्था आणि अन्य गोष्टी सरकारला सादर केल्या आहेत त्यांना सूट देण्यात आली असं जानेवारी 2018मध्ये अटॉर्नी जनरल यांनी घोषित केलं. ऑक्टोबरपर्यंत आठजण कोठडीत आहेत.

भ्रष्टाचाराचा विळखा दूर करण्यासाठी ही मोहीम राबवणं आवश्यक असल्याचं मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितलं. मात्र यामुळे सौदीत गुंतवणूक करण्यास उत्सुक विदेशी गुंतवणूकदार नाराज झाले असण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये थेट परकीय गुंतवणुकीची टक्केवारी 14 वर्षात नीचांकी ठरली आहे.

सौदी अरेबियाने कॅनडाबरोबरचे व्यापारी संबंध स्थगित केले. सौदीने नागरी हक्क आणि महिला हक्क चळवळ कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं होतं. या कार्यकर्त्याची सुटका व्हावी अशी मागणी कॅनडाने केली होती.

सौदी प्रशासनाने महिलांच्या ड्रायव्हिंगवरील बंदी हटवण्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर विदेशी पक्षांशी संपर्क असल्याचा आरोप आहे.

या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचं मोहम्मद बिन सलमान यांनी ब्लूमबर्ग वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत समर्थन केलं होतं. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्यावरून तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी तीन वर्षात पंधराशेहून अधिल लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

"सौदी अरेबियातील सुधारणांचा मी पाईक नाही. मी सौदी अरेबियाचा युवराज आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. नागरी युद्धाचा पर्याय न स्वीकारता जहालवाद आणि दहशतवाद यांना रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचवेळी विकासाची वाटचाल थांबायला नको. शांतता भंग करणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी थोडी किंमत चुकवावी लागली तर तसं करावं लागेल," असं मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितलं.

पत्रकार जमाल खाशोग्जी यांचं नेमकं काय झालं याविषयी काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र सौदी गुप्तचर सूत्रांनीच खाशोग्जी यांची हत्या केल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. हत्येचा आरोप असणाऱ्या सौदीतील गुप्तचर सूत्रं मोहम्मद बिन सलमान यांच्या वैयक्तिक सुरक्षेशी संलग्न असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)