बांग्लादेश: ऐतिहासिक इमारतींना आग, मृतांचा आकडा 78 वर

बांग्लादेशची राजधानी ढाका इथं गजबजलेल्या परिसरात आग लागल्याने 78 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण होरपळले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अग्निशमन दलाचे महासंचाक अली अमद खान यांच्या मते मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

राजधानी ढाकाच्या जुन्या भागातील चौक बाजार परिसरात एका इमारतीला आग लागली. ही रहिवाशी इमारत होती. मात्र त्यात केमिकल साठवण्याचं एक गोदामही होतं.

त्यामुळे बघता बघता ही आग आजूबाजूच्या इमारतींमध्ये पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 37 गाड्या घटनास्थळी आहेत.

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आगीत जीव गमावलेल्यांमध्ये लग्नाच्या वऱ्हाडातील अनेकांचा समावेश असल्याचं समजतं.

शतकभराचा इतिहास असलेल्या ऐतिहासिक चौकबाजार परिसरात भरगच्च वस्तीचा असून, दाटीवाटीने इमारती वसल्या आहेत.

बांगलादेशात जुन्या आणि मोठ्या इमारतींना आग लागण्याच्या घटना सातत्याने घडतात. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडतात. गेल्या काही वर्षात शेकडो नागरिक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत.

रविवारी चितगाव शहरातील एका झोपडपट्टीत लागलेल्या आगीत नऊ जणांनी जीव गमावला होता.

फोटो स्रोत, Reuters

बुधवारी रात्री पावणेबारा वाजता ही आग लागली. आगीत जीव गमावलेले बहुतांशजण त्यावेळी गाढ झोपेत होते.

काही लोकांच्या मते, "CNG सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आग लागली. मात्र तपासानंतरच त्याचं कारण कळू शकेल. शिवाय प्लास्टिक आणि केमिकल गोदामामुळे आग वेगानं पसरली. ज्यामुळे मोठी जीवितहानी झाली."

"गॅस स्फोटांमुळे आग उफाळली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. माझे पंचवीसहून अधिक मित्र आणि नातेवाईक गायब आहेत. माझ्या भावाचा या दुर्देवी आगात अंत झाला आहे असं वाटतं," असं चौकबाझारमध्ये कॉस्मेटिक्सचे दुकान चालवणाऱ्या मोहम्मद फिरोझ यांनी सांगितलं.

'इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफॉर्मर उडाल्याने समोर उभ्या असलेल्या मिनिबसला आग लागली. मिनीबसमधील गॅस सिलेंडर फुटला आणि आगीचा लोळ जवळच्या केमिकल दुकानात पसरला'', असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

फोटो स्रोत, Reuters

या आगीत हाजी अब्दुल कादेर यांचं अख्खं दुकान आगीत भस्मसात झालं. ते म्हणाले, ''एक प्रचंड स्फोटासारखा आवाज झाला. मी मागे वळून पाहिलं तर संपूर्ण आळीला आगीने वेढलं होतं''.

मृतांचा आकडा 78 असल्याचं न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सोहेल महमूद यांनी सांगितलं.

मृतांमध्ये बिल्डिंगबाहेरील माणसं, हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेलं लग्नाचं बिऱ्हाड यांचा समावेश आहे असं एएफपीने म्हटलं आहे. आगीची तीव्रता एवढी होती काही मृतदेह ओळण्यापलीकडे आहेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पाच तासांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. अरुंद गल्ल्या आणि पाण्याची कमतरता असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी खूप वेळ लागला.

पंतप्रधान शेख हसीना यांनी दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींप्रती शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेत जीव गमावलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)