पुलवामा: पाकिस्तान सरकारने हाफीज सईदच्या जमात-उद-दावावर बंदी घातली

हाफिज सईद

2008 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला हाफीज सईद याच्या जमात-उद-दावा आणि त्याची धर्मादाय संस्था फलह-ए-इन्सानियत या संघटनांवर पाकिस्तान सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक गुरुवारी झाली. "त्यामध्ये पाकिस्तान पंतप्रधान कार्यलयाने राष्ट्रीय सुरक्षा आराखड्याचा मागोवा घेतला. जमात-उद-दवा आणि फलह-ए-इन्सानियत फाऊंडेशनला गृहमंत्रालयानं बेकायदेशीर ठरवल्याचं या बैठकीत निश्चित करण्यात आलं," असं पाकिस्तान सरकारने एका प्रसिद्धिपत्रकात जाहीर केलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या बैठकीचे निर्णय पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या ट्विटर हॅंडलवरून जाहीर केले.

"कट्टरतावाद आणि दहशतवाद हे आपल्या प्रांतातले मोठे प्रश्न आहेत. पाकिस्ताननेही दहशतवादात 70 हजारपेक्षा जास्त जीव गमावले आहेत. याशिवाय, आमच्या साधनसंपत्तीचंही प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असं ते म्हणाले.

या बैठकीमध्ये पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तान कोणत्याही प्रकारे सहभागी नसल्याचं या बैठकीतील सहभागी सदस्यांनी स्पष्ट केलं. तसंच त्याची सर्व नियोजनापासून हल्ला प्रत्यक्षात येईपर्यंत सर्व घडामोडी भारतातच झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्दयावर संवाद करायला तयार आहे. पण भारतानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी आमची अपेक्षा असल्याचं सहभागी सदस्यांनी मत मांडलं. 

"भारतानं कोणत्याही प्रकारचा हल्ला करण्याचा किंवा काही 'वेडं धाडस' करण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानच्या सुरक्षा दलांना निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे," असा पुनरुच्चार इम्रान खान यांनी केला.

"'भारतव्याप्त काश्मीर'मध्ये भारतीय लष्कराद्वारे होणारी हिंसा प्रतिकूल परिणाम घडवत आहे. काश्मीरचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि काश्मिरी लोकांच्या आकांक्षापूर्तीसाठी तसेच संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष देण्याची गरज आहे," असंही इम्रान खान या बैठकीत म्हणाले.

पाकिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी करतात या भारताच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले, "योग्य तपासावर आधारित आणि ठोस पुरावे मिळाल्यावर पाकिस्तान आपल्या भूमीचा वापर (दहशतवादासाठी) करणाऱ्या कुणावरही कारवाई करेल. मात्र भारतव्याप्त काश्मीरमधील लोकांना मृत्यूचीही भीती का वाटेनाशी झाली, याचा विचारही भारताने करायला हवा."

गुरुवारी संध्याकाळीच भारताचे केंद्रीय जलसंसाधन आणि नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलं की पाकिस्तानला जाणाऱ्या पूर्वेकडील नद्यांचं पाणी अडवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)