नरेंद्र मोदी : 'दहशतवाद्यांचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी विवेकशील देशांनी एकत्र यावं'

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियातील सेऊल पीस प्राइज फाउंडेशनचा 'सेऊल शांतता पुरस्कार' मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता नांदावी आणि आर्थिक प्रगतीसाठी पंतप्रधान मोदींनी जे प्रयत्न केले आहेत त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं सेऊल पीस प्राइज फाउंडेशननं म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार स्वीकारून हा पुरस्कार भारतीयांना समर्पित केला. भारताने शांततेसाठी प्रयत्न केले आहेत पण सीमेपलीकडील दहशतवादाने शांततापूर्ण मार्गात नेहमी अडसर आणला असल्याचे मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले. जगाच्या शांततेला आणि सुरक्षेला सर्वांत मोठा धोका दहशतवादाकडून असल्याचं ते यावेळी म्हणाले. जगभरात असलेलं दहशतवाद्यांचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व जगभरातल्या विवेकशील देशांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

भारताच्या प्रगतीची कथा ही केवळ भारताच्याच फायद्याची आहे असं नाही तर त्यामुळे संपूर्ण जगाला फायदा होऊ शकतो असं ते म्हणाले.

हा पुरस्कार मी माझा समजत नाही तर संपूर्ण भारतीय जनतेच्या प्रयत्नाचं हे फळ आहे असं मी मानतो. गेल्या पाच वर्षांत भारतीय जनतेनं प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांनीच भारताला यशस्वी बनवल्याची भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)