'इस्लामिक स्टेटचा पाडाव पण त्यांचा विखारी विचार कायम आहे'

इस्लामिक स्टेट Image copyright AFP

इस्लामिक स्टेट पुन्हा उचल खाऊ शकतं का?

थोडक्यात उत्तर आहे, होय. पण त्याचं स्वरूप वेगळं असेल.

जिहादी दहशतवादी गट आणि स्वयंघोषित 'खिलाफत'ने सीरिया आणि इराकमधील 80 लाख लोकांवर एकेकाळी राज्य केलं होतं. पण आता इस्लामिक स्टेटचा प्रभाव जवळपास संपला आहे.

पाश्चात्य देशांच्या राजधानीत या विजयाचा आनंद दिसत आहे. 79 देशांचे साडेचार वर्षांचे अथक प्रयत्न आणि काही अब्ज डॉलरचा खर्च यातून हा क्षण आलेला आहे.

पण ज्या लोकांना इस्लामिक स्टेटच्या गुप्त घडामोडींची माहिती आहे, ते मात्र काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं सांगतात.

ब्रिटनची गुप्तहेर संस्था MI6चे प्रमुख अॅलेक्स यंगर यांनी म्युनिच इथल्या सुरक्षा परिषदेत दिलेली माहिती महत्त्वाची आहे. ते म्हणतात, "खिलाफतचा लष्करी पराभव याचा अर्थ दहशतवाद संपला असा होत नाही. त्यानं वेगळा आकार घेतलेला असेल. सीरिया आणि सीरिया बाहेरही हे होऊ शकतं. पारंपरिक दहशतवादी संघटनांची धाटणी अशीच असते."

याच कार्यक्रमात जर्मनीचे संरक्षण मंत्री उरसुला वोन डेर लेयेन म्हणाले, "सध्या इस्लामिक स्टेट भूमिगत झालेली आहे. इतर दहशतवादी संघटनांसोबत इस्लामिक स्टेट नेटवर्क उभं करत आहे."

Image copyright Getty Images

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे जनरल जोसेफ वोटेल यांनी इशारा दिला आहे की इस्लामिक स्टेटचं नेटवर्क जरी विस्कळित झालं असलं तरी त्यांच्यावर दबाव ठेवण्याची फार गरज आहे कारण पुन्हा एकत्र येण्याची क्षमता त्यांच्यात आहे. इस्लामिक स्टेटसाठी लढणारे इराक आणि सीरियात विखुरले असून त्यांची संख्या 20 हजार ते 30 हजार आहे. शिक्षा होण्याच्या भीतीने यातील अनेक जण त्यांच्या मूळ देशात परत जाऊ इच्छित नाहीत.

याशिवाय लिबिया, इजिप्त, पश्चिम आफ्रिक, अफगाणिस्तान आणि दक्षिण फिलिपाईन्स या देशांत लहान प्रमाणात इस्लामिक स्टेटशी संबंधित गट आहेत. इराकमध्ये इस्लामिक कट्टरपंथी उत्तर प्रांतात मोठे हल्ले करत असल्याचं दिसून आलं आहे.

अशा परिस्थितीत इस्लामिक स्टेटचा उदय कसा झाला आणि सुरुवातीला यश कसं मिळत गेलं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

इस्लामिक स्टेटचा उदय

इस्लामिक स्टेटचा उदय हा अल कायदातून झाला. अमेरिकेचा इराकवरील ताबा संपवणं सर्व मुस्लिमांचं कर्तव्य आहे, असं अल कायदा सांगत होती. पण अल कायदातील इतकी हिंसक होती त्यातून इराकी टोळ्या बाजूला होऊन सरकारच्या बाजूने गेल्या. त्यातून अल कायदाला बाहेर करण्यात यश आलं. पण इराकमधील शिया पंथीयांच्या सरकारने या यशाने हुरळून जात सुन्नी मुस्लिमांवर अत्याचार सुरू केले. याचा परिणाम असा झाला की 2014मध्ये इराकमधील दुसऱ्या क्रमाकांचं मोठं शहर असलेल्या मोसूलमध्ये जेव्हा इस्लामिक स्टेटेने प्रवेश केला त्यांना कोणताही विरोध झाला नाही. इराकच्या फौजांचं मनोधैर्य इतकं खचलं होत की जवळपास एक तृतीयांश इराक इस्लामिक स्टेटच्या ताब्यात गेला. तर शेजारीच असलेल्या सीरियातील गृहयुद्ध आणि अनागोंदी इस्लामिक स्टेटच्या पथ्यावर पडली.

इस्लामिक स्टेट 2.0

पण हे असं पुन्हा होऊ शकतं का? कोणत्याही आकारात आणि प्रकारात "खिलाफत"ला पुन्हा अस्तित्वात येऊ दिलं जाणार नाही. पण इस्लामिक स्टेटला सुरुवातीला ज्यामुळे यश मिळालं ती कारण अजूनही काही प्रमाणात अस्तित्वात आहेत. इराकमध्ये शिया बंडखोरांची संख्या मोठी आहे, त्यातील काहींना इराणकडून पैसा आणि लष्करी प्रशिक्षण मिळालं आहे. तर काही प्रकरणांत इराकमध्ये सुन्नी ग्रामस्थांना घराबाहेर हकललं जात असल्याचंही दिसून आलं आहे.

Image copyright MANBAR.ME

त्यामुळे इराकला एकात्मिक सरकार आणि राष्ट्रीय पुनर्निर्माणाची गरज आहे. तरचं इस्लामिक स्टेटचा पुनर्जन्म टाळता येईल, पण असं होताना दिसत नाही.

सीरियात ज्या कारणांनी गृहयुद्ध भडकलं ती कारणं अधिकच बळकट झालेली दिसत आहेत. राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना इराण आणि रशियाने पराभवापासून वाचवलं. ते आता अधिकच बळकट झाले आहेत. सीरियातील नागरिकांत आता त्यांना विरोध करण्याच त्राण राहिलेले नाहीत. पण काही जण सशस्त्र संघर्षाकडे ढकलले जातील आणि अशा परिस्थितीमध्ये सीरियात इस्लामिक स्टेट स्वतःसाठी जागा शोधण्याचा प्रयत्न करेल.

तर दुसरीकडे जिथं-जिथं मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत आणि त्यांना बाजूला पाडलं जात आहे अशी भावना असेल आणि तरुणांना जीवनाचा कोणताच उद्देश दिसत नसेल तिथं इस्लामिक स्टेट या संप्रदायात भरती करणाऱ्यांसाठी संधी असेल.

खिलाफत संपली असली तरी त्यांचा विखारी विचार मात्र संपलेला नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)