व्हेनेझुएलात अन्न, औषध मिळवण्यासाठी हिंसाचार; मदतीचे ट्रक पेटवले, सीमा रोखल्या

व्हेनेझुएला

फोटो स्रोत, EPA

व्हेनेझुएलात ब्राझिल आणि कोलंबियामधून येणारी मदत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी रोखून धरल्यामुळे सीमेच्या आसपासच्या भागांत संघर्ष उफाळला आहे. ही मदत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागरिकांवर अश्रुधूर आणि रबरी गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात 2 जणांचा बळी गेला आहे.

अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी माईक पॉम्पेओ यांनी नागरिकांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला असून राष्ट्राध्यक्षांच्या समर्थकांचा उल्लेख 'ठग' असा केला आहे.

पॉम्पेओ यांनी आलेली मदत जाळून टाकणं म्हणजे खालच्या पातळीचं कृत्य आहे, अशी टीका केली आहे.

विरोधी पक्षाचे नेते खुआन ग्वाइडो यांनी ही मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. खुआन ग्वाइडो यांनी स्वतःला हंगामी राष्ट्रध्यक्ष जाहीर केलं होतं. खुआन ग्वाइडो यांच्या नेतृत्वाला काही देशांनी मान्यता दिली आहे. ते सोमवारी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांना कोलंबियात भेटणार आहेत. दरम्यान मादुरो यांनी खुआन ग्वाइडो यांच्या प्रवासावर निर्बंध लादले आहेत.

व्हेनेझुएलाला मुक्त करण्यासाठी सर्व पर्याय वापरावेत, असं आवाहन खुआन ग्वाइडो यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला शनिवारी केलं होतं.

मदतीवरून संघर्ष का?

खुआन ग्वाइडो यांनी आंतराराष्ट्रीय पातळीवर व्हेनेझुएलातील नागरिकांसाठी मदतीचं नियोजन केलं होतं. ही मदत व्हेनेझुएलाच्या सीमेवर पोहोचली होती. या मदतीत अन्न आणि औषधं यांचा समावेश आहे.

शनिवारपर्यंत जर ही मदत देशात येऊ दिली नाही तर आपले समर्थक ही मदत देशात आणतील असा इशारा त्यांनी दिली होता. याला उत्तर म्हणून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी कोलंबिया आणि ब्राझिल लागून असलेल्या देशाच्या सीमा बंद केल्या.

ही मदत मिळवण्यासाठी व्हेनेझुएलातील अनेक नागरिकांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. यातून उफाळलेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला, त्यात 14 वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे.

व्हीडिओ कॅप्शन,

व्हेनेझुएलातले 90 टक्के लोक दरिद्री झाले आहेत

मदत घेऊन आलेले अनेक ट्रक जाळण्यात आल्याचं वृत्त आहे. जखमींची संख्या मोठी असून अनेकांच्या डोळ्यांना जखमा झाल्या आहेत, असं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं.

खुआन ग्वाइडो यांनी कोलंबियाच्या सीमेनजीक असलेल्या एका पुलाजवळ नागरिकांना उद्देशून भाषण केलं. त्यांनी सैनिकांना मदतीचं आवाहन केलं असून जे सैनिक त्यांचं पद सोडतील त्यांना माफ केलं जाईल, असं आश्वासन दिलं आहे. सैनिकांनी योग्य बाजू घ्यावी, असंही ते म्हणाले.

निकोलस मादुरो यांनी सातत्याने खुआन ग्वाइडो यांचा राष्ट्राध्यक्ष पदावरील दावा फेटाळला आहे तसेच निवडणूक घेण्याचं आंतरराष्ट्रीय समुदायाचं आवाहनही त्यांनी फेटाळलं आहे. खुआन ग्वाइडो यांना त्यांनी अमेरिकेच्या हातचं बाहुलं म्हटलं आहे. अमेरिका आपल्या देशावर अतिक्रमण करत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)