ऑस्करमध्ये यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 8 सिनेमांविषयी थोडक्यात जाणून घ्या

सिनेमा

फोटो स्रोत, FACEBOOK

यंदा ऑस्कर पुरस्कार जिंकलेले सिनेमे हे संगीत, प्रेम, मैत्री, सत्ता, समाजिक बदल अशा वेगवगेळ्या विषयांवर आधारीत आहेत.

1) Bohemian Rhapsody- आयुष्य म्हणजे संगीत आणि संगीत म्हणजेच आयुष्य

बोहेमियन ऱ्हॅपसडी हा सिनेमा फ्रेडी मर्क्युरी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आफ्रिकेच्या झांजीबारमध्ये जन्माला आलेला एक मुलगा काही काळ भारतातल्या तत्कालिन बाँबे प्रांतात वाढला.

पुढं तो कसा ब्रिटिश पॉप म्युझिकचा बादशाह झाला, हा त्याचा प्रवास या सिनेमातून दाखवण्यात आला आहे.

समाजातल्या सगळ्या चालीरूढी मोडून फ्रेडी मर्क्यूरी जगातला उत्तम कलाकार कसा होतो, त्याचा हा प्रवास या सिनेमात दाखवला आहे.

रामी मलेक हे या सिनेमात मर्क्युरी यांची भूमिका साकारतात. BBCने 2002 साली प्रसिद्ध केलेल्या "100 सर्वांत महान ब्रिटिश लोकांच्या यादीत" मर्क्युरी हे 58व्या स्थानी होते.

2) Black Panther -आफ्रीकेतल्या तरूण राजाची गोष्ट

आफ्रिकेत तंत्रज्ञानानं अतिशय प्रगत 'वाकंदा' नावाचा देश असतो. तिथल्या राजाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा टी'चल्ला देशाची सूत्र हाती घेतो. त्याच दरम्यान 'वाकंदा' देशावर एक अतिशय ताकदवान शत्रू आक्रमण करतो.

फोटो स्रोत, YouTube screen grab

वाकंदा देश आणि संपूर्ण जगावर संकट कोसळतं तेव्हा टी'चल्ला 'ब्लॅक पँथर'चं रुप धारण करतो. पण जवळचे लोक फितूर झाल्यानं लोकांचा जीव वाचवणं आणखी अवघड होतं.

3) The Green Book - दोन मैत्रांची गोष्ट

जगप्रसिद्ध कृष्णवर्णीय पियानिस्ट एका श्वेतवर्णिय इटालियन-अमेरिकन बाऊंसरला डायव्हर म्हणून नोकरी देतो. त्यांना संगिताच्या कार्यक्रमासाठी मॅनहॅट्टन पासून दक्षिणेकडच्या भागात गाडीतून जावं लागतं.

त्यावेळी आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'The Green Book'चं पालन करावं लागत होतं. तरी रस्त्यात त्यांना वांशिक हिंसेला सामोरं जावं लागतं.

फोटो स्रोत, FACEBOOK

तसंच त्यांना लोकांकडून एका वेगळ्याच माणुसकीची झलक मिळते. जगप्रसिद्ध पियानिस्ट आणि त्याचा ड्रायव्हर त्या प्रवासात गप्पा-मस्ती करतात. त्यादरम्यान आयुष्यभराचे मित्र कधी बनले हे कधी कळलंच नाही.

4) रोमा - मेक्सिकोमधल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी

सत्तरीच्या सुरुवातीला मेक्सिको धगधगत होतं. तेव्हा तिथल्या मध्यमवर्गीय कुटुंबात चाललेल्या घडामोडींची ही कहाणी आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलिज झाला आहे.

5) Vice - जगातल्या सर्वांत शक्तीशाली व्यक्तीसोबतचा उजवा हात

वाशिंग्टनमधला एक मुरलेला प्रशासकीय अधिकारी जेव्हा अमेरिकेचा व्हाईस प्रेसिडेंट बनतो तेव्हा जगातली त्याकाळची सर्वांत शक्तीशाली व्यक्ती जॉर्ज डब्लू बूश हे अमेरिकेचे प्रेसिडेंट असतात.

फोटो स्रोत, FACEBOOK

दोघांनी मिळून अमेरिका आणि जगाच्या राजकारणात कसे बदल केले, याविषयी हा सिनेमा आहे.

6) BlacKkKlansman - अमेरिकेतल्या एका कृष्णवर्णीय पोलीस डिटेक्टव्हची कहाणी

1970मध्ये एक कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन डिटेक्टिव्ह कोलोरॅडो पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत असतात.

जीवनात काहीतरी करून दाखवावं असं त्यांना सारखं वाटायचं. मग ते छुप्या मार्गानं Ku Klux Klan या जहालवादी संघटनेत घुसतात.

त्या संघटनेची वाईट कृत्यं त्यांना जगासमोर आणायची असतात.

फोटो स्रोत, FACEBOOK

ते डिटेक्टिव्ह एका व्यक्तीची ड्रायव्हर म्हणून नियुक्ती करतात. दोघे मिळून समाजात दुही निर्माण करणाऱ्या लोकांचं पितळ उघडं पाडतात. सत्य घटनेवर आधारित असलेला हा सिनेमा थरकाप उडवून देणारा आहे.

7) A Star Is Born - ऱ्हदयाला भीडणारी प्रेम कहाणी आहे

लेडी गागाचा गायकीचा प्रवास. सिनेमातली मुलगी उत्कृष्ट गाणी लिहीत असते, पण आपण चांगलं दिसत नाही म्हणून ती गाणी गायला कचरत असते. त्यावेळी तिचा मित्र तिला स्टेजवर गाणी गायला प्रोत्साहित करतो.

फोटो स्रोत, FACEBOOK

त्या दरम्यान त्यांच्यात प्रेम होतं. लेडी गागाची भूमिका बजावणारी नायिका गायकीच्या क्षेत्रात मोठं नावं कमावते, पण तिला वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. ही हृदयाला भिडणारी प्रेम कहाणी आहे.

8) The Favourite - राणीची आवडती व्यक्ती कोण?

आठराव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये राजेशाही होती. तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्समध्ये सतत युद्ध व्हायचं. त्यावेळी नवीन राणी सत्ता हाती घेते. पण राणी सतत आजारी पडत असते त्यामुळं तिच्यासोबतची मैत्रीणच देश चालवते.

त्यावेळी राणीच्या दरबारात एक नवीन बाई कामाला येते. तिचा उत्साह पाहून राणीच्या मैत्रीणीला ती आवडते.

फोटो स्रोत, FACEBOOK

राणीची मैत्रीण नवीन आलेल्या या बाईला तिच्या बाजुनं घेते. यामागे राणीच्या मैत्रीणीचा इंग्लंडवर राज्य करायचा प्लान असतो.

पण जसंजसं राजकारण अधिक गढूळ होत जातं तसतसं नवीन आलेली स्त्री राणीच्या गटात सामिल होते. मग त्याठिकाणी दरबारात कामाला आलेली बाई तिच्या मार्गात आलेल्या सगळ्यांना बाजुला सारून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते.

सत्ताधारी लोकांच्या आवडीची व्यक्ती काय काय करू शकते हे या सिनेमात दिसून येतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)