उत्तर कोरिया अण्वस्त्रांशिवाय उत्तम देश असू शकतो - डोनाल्ड ट्रंप

ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर कोरियाने जर अण्वस्त्रांचा त्याग केला तर तो एक उत्तम देश होऊ शकतो, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे.

ट्विटरवर हे वक्तव्य करताना ते म्हणाले, "या राष्ट्राला इतर देशांपेक्षा प्रगतीच्या जास्त संधी आहेत."

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी उत्तर कोरिया अजूनही धोकादायक आहे, असं म्हटलं होतं त्या पार्श्वभूमीवर ट्रंप यांनी हे वक्तव्य केलं आहे.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांची डोनाल्ड ट्रंप व्हिएतनाममधल्या हनोई इथं भेट घेणार आहेत.

"आम्ही सिंगापूरमधल्या पहिल्या भेटीत जे निर्णय झाले त्या निर्णयांच्या प्रगतीविषयी चर्चा करणार आहोत." असं ट्रंप यांनी ट्वीट केलं आहे. दोन नेत्यांमध्ये जूनमध्ये जी भेट झाली त्याचा संदर्भ या ट्विटमध्ये होता.

अमेरिकेतल्या गव्हर्नरांच्या सभेत बोलताना किम यांच्याशी संबंध आता दृढ झाले आहेत, असं ट्रंप म्हणाले होते.

उत्तर कोरियानं अण्वस्त्रांचा त्याग करण्याबाबत कोणतीही घाई केली नाही, या गोष्टीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

सिंगापूरची भेट ऐतिहासिक होती. मात्र या दोन नेत्यांनी ज्या करारावर सही केली त्याबद्दलच्या विस्तृत माहितीबद्दल संभ्रम आहे. उत्तर कोरियात अण्वस्त्रमुक्तीच्या निर्णयाबाबत पुढे फारसं काहीही झालेलं नाही.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप व्हिएतनाम भेटीच्या पूर्व संध्येला बोलत होते. या दौऱ्याकडून असलेल्या अपेक्षांच्या संदर्भात ते बोलत होते.

परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनीही या भेटीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला जे हवं आहे ते आम्हाला मिळेल असंही नाही. पण आम्हाला जे हवं आहे ते मिळेल अशी अपेक्षा आहे."

एका वेगळ्या मुलाखतीत त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या भूमिकेच्या विरोधात वक्तव्य केलं. उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रांचा धोका नाही, अशी भूमिका ट्रंप यांनी घेतली आहे.

उत्तर कोरियाचा अजूनही धोका आहे का असा प्रश्न CNN चे जेक टेपर यांनी विचारला होता. या प्रश्नावर पॉम्पेओ यांनी होकारार्थी उत्तर दिलं.

मात्र राष्ट्राध्यक्षांनी तर या विरोधी भूमिका घेतली असं टेपर यांनी सांगितल्यावर ते म्हणाले, "ते असं म्हणाले नाहीत. ते काय म्हणाले आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे."

मागच्या वर्षी सिंगापूर भेटीनंतर "मी कार्यभार हाती घेतल्यानंतर प्रत्येकाला सुरक्षित वाटेल. आता उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रांचा कोणताही धोका नाही."

अमेरिकेने दक्षिण कोरियातलं सैन्य मागे घेतल्याशिवाय उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा त्याग करणार नाही असंही सांगितलं होतं.

किम जाँग उन हनोईला रेल्वेमार्गे निघाले आहेत. ट्रंपही व्हिएतनामला सोमवारी जाणार आहेत.

काही बातम्यांनुसार किम यांची ट्रेन चीनच्या चांगशा शहरातून गेली आणि सोमवारी व्हिएतनामला पोचण्याची शक्यता आहे.

त्यांचा नक्की मार्ग काय असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र सूत्रांनी रॉयटर्सला सांगितलं की किम व्हिएतनामच्या सीमेवर डाँग डँग इथं उतरून पुढचा प्रवास कारने करणार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)