बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने स्फोटक टाकली - पाकिस्तानचा दावा

भारतीय वायुसेनेने बालाकोट इथं 'पेलोड' टाकलेल्या ठिकाणाचा हा फोटो पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते जनरल असिफ गफूर यांनी ट्वीट केला आहे.

फोटो स्रोत, Maj Gen Asif Ghafoor@OfficialDGISPR/Twitter

फोटो कॅप्शन,

भारतीय वायुसेनेने बालाकोट इथं 'पेलोड' टाकलेल्या ठिकाणाचा हा फोटो पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते जनरल असिफ गफूर यांनी ट्वीट केला आहे.

भारतीय वायुसेनेच्या विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानच्या सरहद्दीत शिरून भारताने कारवाई करण्याचा प्रयत्न केला, असं पाकिस्तानने म्हटलं आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत भारतीय वायुदलाने बालाकोट इथला जैश ए मोहम्मदचा प्रशिक्षण तळ उद्धवस्थ केल्याचं म्हटलं.

भारतीय माध्यमांशी बोलताना भारतीय वायुसेनेतल्या सूत्रांनी दावा केला की भारतीय लढाऊ विमानं पहाटे 3.30 वा. बालाकोटजवळ पोहोचली आणि त्यांनी जैश-ए-मोहम्मदच्या एका कँपवर हल्ला करून तो नष्ट केला. बीबीसीला वायुदलातील सूत्रांनी या कारवाईची माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, "मिराज विमानांनी अंबाली इथल्या वायुदलाच्या तळावरून उड्डाण भरलं आणि आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता उद्दिष्टांवर हल्ला करण्यात आला. 30 मिनिटं ही कारवाई झाली. सर्व विमानं सुरक्षित परत आली."

जर तुम्ही क्षमाशील असाल तर कौरव तुम्हाला भित्रे समजतात पण अखेर विजय शक्तीचाच होतो, असं ट्वीट भारतीय लष्कराने केलं आहे.

केंद्रीय राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ट्वीटवर भारतीय वायुसेनेनं नियंत्रण रेषेच्या पलीकडे 'दहशतवादी तळांवर' हल्ला करून ती पूर्णपणे नष्ट केली असं म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की भारतीय वायुसेनेच्या विमानांनी मुजफ्फराबाद सेक्टरमध्ये 'घुसखोरी' केली, पण याला पाकिस्तानच्या लष्कराने तातडीने प्रत्युत्तर दिले.

"पाकिस्तानच्या लष्कराने प्रभावी उत्तर दिल्याने भारतीय विमानं परतली," असं त्यांनी म्हटलं आहे. "या विमानांनी पळून जाताना बालाकोट इथे स्फोटकं टाकली. यामध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही."

फोटो स्रोत, TWITTER/MAJ GEN ASIF GHAFOOR

फोटो कॅप्शन,

जर जनरल आसिफ गफूर

राष्ट्रीय सुरक्षासंदर्भातील विश्लेषक निखिल गोखले यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि जैश ए महम्मदचा तळ उध्वस्थ केला असं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीवटमध्ये म्हटलं आहे, "मिराज 2000 या विमानांनी केलेल्या कारवाईत जैशचा तळ पूर्ण नष्ट करण्यात आला आहे. एकपेक्षा जास्त विमानं या कारवाईत सहभागी झाली होती, असं सूत्रांनी सांगितलं."

पुलवामातील हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव असताना पाकिस्तानने हा दावा केला आहे. 14 फेब्रुवारीला हा हल्ला झाला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाईसाठी भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक दिली असल्याचं सांगितलं होतं. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने हल्ला केला तर प्रत्युत्तर देऊ, असं म्हटलं होतं.

जवळपास 500 किलो इतक्या वजनाच्या लेसर गाईडेडे बाँबचा वापर केला गेला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय वायुदलाच्या सैनिकांना सलाम केला आहे.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्रवाहिन्याना मुलाखत दिली आहे. ते म्हणाले, "भारतीय म्हणून मला भारतीय सेनेचा अभिमान वाटतो. भारतीय सेनेनं एकप्रकारे आमच्या शहीद जवानांचं बलिदान वाया जाणार नाही, हे खऱ्या अर्थानं पाकिस्तानला दाखवून दिलं आहे. अजून सगळी अधिकृत माहिती माझ्याकडे नाहीये. पण मीडिया रिपोर्ट्स आणि जी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार हवाई हल्ला करून जैश-ए-मोहम्मद किंवा अन्य संघटनांचे आतंकवादी कॅम्प जिथून पाकिस्तान आतंकवाद्यांना ट्रेनिंग देऊन पाठवत होते त्या कॅम्पना उद्धवस्त करण्याचं काम झालं आहे."

मुख्यमंत्र्यांनी वायुदलाचं अभिनंदनही केलं. त्यांनी म्हटलं, की देशाच्या पंतप्रधांनांनी पहिल्याच दिवशी अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं, की सैनिकांचं बलिदान वाया जाणार नाही आणि सेनेला सगळे अधिकार दिले होते. भारतीय सेनेनं आपली शक्ती काय असते, हे दाखवून दिलं आहे. भारतीय वायुदलाचे मी अभिनंदन करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात जे होतं, ते आता होतंय. भारत आता एक मजबूत देश म्हणून जगासमोर आला आहे आणि कोणताही हल्ला आपण सहन करणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी वायुदलाचं अभिनंदन केलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)