Balakot : पाकिस्तानची सीमारेषा ओलांडून खैबर पख्तुनख्वा राज्यात भारताने केला हल्ला

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक फोटो

भारतीय वायुसेनेने बालाकोटमध्ये हल्ला केला हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे बालाकोट पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये आहे की थेट पाकिस्तानमध्ये खैबर पख्तुनख्वा राज्यात आहे, यावरून गोंधळाचं वातावरण होतं. पण बीबीसीला दोन्ही बाजूच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय विमानांनी हल्ला केला ते बालाकोट खैबर पख्तुनख्वा राज्यातलं आहे.

याच खैबर पख्तुनख्वा राज्यातून देशाचे पंतप्रधान इम्रान खान निवडून येतात.

स्थानिकांनी ऐकले स्फोटकांचे आवाज

पत्रकार झुबैर खान यांनी बीबीसी उर्दूला सांगितलं की खैबर पख्तुनख्वा राज्यातल्या मनसेहरा जिल्ह्यात बालाकोट इथे जाबा नावाचा डोंगर आहे. तिथे स्फोट झाल्याचे आवाज स्थानिकांनी पहाटे चारच्या सुमारास ऐकले.

बालाकोट आणि मनसेहरामधल्या अधिकाऱ्यांनीही नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं की स्फोटांचे आवाज आल्यानंतर पोलिसांना अनेक स्थानिक लोकांनी फोन केले.

हे ठिकाण अबोटाबादजवळ आहे, जिथे ओसामा बिन लादेनला पकडण्यात आलं होतं. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे सुरक्षा अधिकारी आधीच पोहोचले होते. त्यांनी पोलिसांना माघारी फिरायला सांगितलं, असं सूत्रांनी बीबीसी उर्दूला सांगितलं.

भारतीय सूत्रांनीही हल्ला खैबर पख्तुनख्वामध्ये झाल्याचं बीबीसीला सांगितलं.

त्यामुळे भारतीय विमानांनी फक्त ताबा रेषाच ओलांडली नाही तर आंतरराष्ट्रीय सीमारेषाही ओलांडली आहे. यापूर्वी भारतीय विमानांनी 1971 साली युद्धादरम्यान ही सीमा ओलांडली होती. शांतता काळात ही सीमा ओलांडल्याची पहिली घटना आहे.

जाबा टॉप काय आहे?

सूत्रांनी बीबीसी इंडियाला दिलेल्या माहितीनुसार जाबा टॉप हा डोंगराळ भाग आहे. तिथे जैशचे कँप असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पुढे आली होती. तिथे स्फोटकं टाकण्यापलिकडे भारताने किमान एक क्षेपणास्त्र डागल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

हा संपूर्ण भाग सध्या सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतला आहे. हा भाग मनसेहरा जिल्ह्यातल्या बालाकोट उपविभागात मोडतो.

भारताच्या वतीने जेव्हा परराष्ट्र सचिव व्ही. के. गोखले यांनी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्यांनी बालाकोट नेमकं कुठलं आणि कुठे आहे, याबद्दल अधिका माहिती दिली नाही.

पण पाकिस्तानच्या लष्कराने म्हटलं आहे की "भारतीय विमानांची घुसखोरी मुझफ्फराबाद सेक्टरमध्ये आझाद काश्मीरमध्ये झाली आहे." भारतीय विमानांनी जी स्फोटकं टाकले ते मोकळ्या जागी पडले, त्यात पायाभूत सुविधांना कसलंही नुकसान झालेलं नाही असं ते म्हणाले.

'... तर ते आक्रमण होऊ शकतं'

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे, "जर KPK (खैबर पख्तुनख्वा) येथील बालाकोटवर हा हल्ला झाला असेल तर ते आक्रमण म्हणता येऊ शकतं आणि भारतीय वायुसेनेनी केलेली मोठी कारवाई असं आपण म्हणू शकतो."

"पण हे बालाकोट नियंत्रण रेषेपलीकडील पुंछ सेक्टरमधलं असेल तर हा हल्ला प्रतीकात्मक स्वरूपाचा आहे असं मानावं लागेल. कारण या ऋतूमध्ये दहशतवादी तळं त्या ठिकाणी नसतात," अब्दुल्लांनी पुढे लिहिलं.

पाकिस्तानातील काही तज्ज्ञांनी बालाकोट पाकिस्तानात असल्याने हा पाकिस्तानवर झालेला हल्ला असल्याचं म्हटलं आहे.

पाकिस्तानमधल्या 'द इंटरनॅशनल न्यूज' या वृत्तपत्रासाठी लिहिणारे मुशर्रफ झैदी यांनी म्हटलं आहे की हल्ला झालेलं बालाकोट खैबर पख्तुनख्वामध्ये आहे. त्यामुळे भारताने ताबा रेषाच नाही तर सीमारेषा ओलांडली, असा त्यांनी दावा केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)