IAF: पाकिस्तानमध्ये झालेली बालाकोटची संपूर्ण कारवाई समजून घ्या 11 मुद्द्यांमध्ये

भारत-पाक

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जाऊन जी कारवाई झाली, ती 11 मुद्द्यांमध्ये थोडक्यात समजून घ्या. पाहूया काय झालं दिवसभरात:

1. काय झालं?

भारतीय वायुदलाने पाकिस्तानमधल्या बालाकोट इथे 26 फेब्रुवारीच्या पहाटे हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा कँप आम्ही नष्ट केला, असं भारताचे परराष्ट्र सचिव वियज गोखले यांनी सांगितलं. या हल्ल्यात 'अनेक अतिरेकी मारले गेले' असंही ते म्हणाले.

पाकिस्तानने हल्ला झाल्याचं मान्य केलं, पण तिथे जैशचा तळ नव्हता असा दावा केला आहे. तिथे कुणीही मारलं गेलं नाही, फक्त भारताने स्फोटकं टाकून झाडांची नासधूस केली, असं पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे.

2. नेमका कुठे झाला हल्ला?

हा हल्ला पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये झाला, असा दावा पाकिस्तानने केला. पण बीबीसीला दोन्ही बाजूंच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा हवाई हल्ला खैबर पख्तुनख्वा या पाकिस्तानी राज्यात झाला. याचा अर्थ असा की भारताने ताबा रेषाच नाही तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हा हल्ला केला.

पण आम्ही खैबर पख्तुनख्वामध्ये हल्ला केला, असा स्पष्ट उल्लेख करण्याचं भारताने टाळलं.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन,

बालाकोटमधल्या घटनास्थळाचा पाकिस्तानी लष्काराने ट्वीट केलेला फोटो.

3. प्रत्यक्षदर्शी म्हणतात 'भूकंप झाला...'

बालाकोटच्या जाबा टॉपमध्ये राहणारे मोहम्मद आदिल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "हा हल्ला इतका भयंकर होता, की एका क्षणी असं वाटलं जणू भूकंपच आला आहे.

4. का केला हल्ला?

जैश-ए-मोहम्मद आणखी हल्ले करण्याच्या तयारीत होता, म्हणून भारताने ही प्रतिबंधात्मक कारवाई केली, असं भारताने म्हटलं आहे. तर पाकिस्तानाने आरोप केला आहे भारतात निवडणुका होणार आहेत, म्हणून हा हल्ला करण्यात आला.

5. मोदी म्हणाले 'सौगंध खाते हैं....'

राजस्थानच्या चुरूमध्ये प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत सुरक्षित हातांमध्ये आहे.

फोटो स्रोत, Twitter

6. भारतीयांनी काय म्हटलं?

अनेक भारतीयांनी ठिकठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. त्यांनी सोशल मीडियावरही आनंद साजरा करत पाकिस्तानवर टीका केली. त्यातल्या काही प्रतिक्रिया तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर वाचू शकता:

7. पाकिस्तान म्हणतं बदला घेणार

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतानं केलेले दावे खोडून काढले आहेत.

भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ, आमचं प्रत्युत्तर वेगळं असेल, त्याची वेळ आणि जागा आम्ही ठरवू. तुम्हाला काय करायचं होतं ते तुम्ही केलं आहे आता आमची पाळी आहे."

8. पाकिस्तानी लोकांना काय वाटतं?

पाकिस्तानी लोकांमध्ये विविध तऱ्हेच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आधी पाकिस्तानी माध्यमांनी म्हटलं की भारताने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण ते पळून गेले. नंतर जसं स्पष्ट होत गेलं की भारताने हल्ला केला होता, तसतसा माध्यमांचा आणि लोकांचा सूर बदलत गेला.

पाकिस्तानी नेते, पत्रकार आणि सर्वसामान्य लोकही विचारू लागले की पाकिस्तानी वायुसेनेने प्रतिकार का नाही केला?

फोटो स्रोत, Twitter

पण पाकिस्तान प्रत्युत्तर का देऊ शकला नाही याची कारणं तुम्ही इथं वाचू शकता.

9. चीन पाकला मदत करणार?

चीनने भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. चीन आणि पाकिस्तानचे संबंध घनिष्ट आहेत, त्यामुळे यापुढे चीन काय भूमिका घेतं, याकडे जगाचं लक्ष असेल.

अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांनी चित्र स्पष्ट होईपर्यंत प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. यापूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दोन्ही देशांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

10. पाकिस्तानसमोर पर्याय काय?

पाकिस्तानमध्ये दिवसभर महत्त्वाच्या बैठका झाल्या. तातडीने नॅशनल असेंब्लीचं संयुक्त अधिवेशन आणि नॅशनल कमांड ऑथॉरिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. आता कोणतीही परिस्थिती उद्भवू शकते, असं पाकिस्तान सरकारने म्हटलं आहे. पण पाकिस्तानसमोरचे पर्याय मर्यादित आहेत, असं जाणकार सांगतात.

भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळावर किंवा नागरिकांवर हल्ला केला नाहीये. हल्ला जैशच्या तळावर होता, असं भारताचं म्हणणं आहे. पाकिस्तानने उत्तर म्हणून भारताच्या लष्करी तळावर हल्ला केला तर युद्धाला तोंड फुटेल. दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्यामुळे युद्ध सुरू होणं धोकादायक ठरेल.

11. खोट्या गोष्टी

हल्ल्याची बातमी आल्यानंतर सीमेच्या दोन्ही बाजूंना अनेक व्हीडिओ पसरवले जाऊ लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला आणि अनेक भारतीय न्यूज चॅनेल्सवर दाखवला जाणारा भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकचा व्हीडिओ 26 फ्रेब्रुवारीच्या पहाटेचा नसून जुना आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)