IAF : पाकिस्तानी लष्कर म्हणतं प्रत्युत्तराची वेळ आणि जागा आम्ही ठरवू

आसिफ़ गफूर

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतानं केलेले दावे खोडून काढले आहेत.

भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ, आमचं प्रत्युत्तर वेगळं असेल, त्याची वेळ आणि जागा आम्ही ठरवू. तुम्हाला काय करायचं होतं ते तुम्ही केलं आहे आता आमची पाळी आहे."

"भारतानं जाणूनबुजून सामान्य लोकांवर हल्ला केला जेणेकरून त्यांना हा दशतवाद्यांवर केलेला हल्ला आहे असं दाखवता येईल आणि त्याचा निवडणुकीत फायदा घेता येईल," असंही त्यांनी म्हटलं आहे.

"भारतानं 4 बाँब टाकले, पण इथं काहीचं झालं नाही, 350 दशतवादी मारल्याचा भारताचा दावा आहे, पण तिथं काही नव्हतंच तर लोक मरणार कुठून. माणसं मेली असतील तर त्यांचे मृतदेह कुठे आहेत. त्यांची अंत्ययात्रा तर निघाली असती," असा दावा गफूर यांनी केला आहे.

पाकिस्तान योग्यवेळी प्रत्युत्तर देणार - शाह मेहमूद कुरेशी

भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामाबादमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक घेण्यात आली. या बैठकीला परराष्ट्र मंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, लष्करप्रमुख आणि इतर ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फोटो स्रोत, @SMQURESHIPTI

बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांनी बालाकोटमध्ये कट्टरवाद्यांचा कँप असल्याचा आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या दाव्याचं खंडन केलं.

भारतीय सरकारने स्वत:च्या समाधानासाठी आरोप लावले असून ते बिनबुडाचं आहे यावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली. सध्या भारतात निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे ही कारवाई केली आहे आणि त्यामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात आली आहे. ज्या परिसरात हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे तो परिसर सगळ्यांनी पहावा. त्यासाठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना या जागी नेण्यात येणार आहे, असं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटलं आहे.

भारताने हा निरर्थक हल्ला केला आहे. या हल्ल्याला योग्य जागी आणि योग्य वेळी प्रत्युत्तर दिलं जाईल, असा ठराव पाकिस्ताननं केल्याचं कुरेशी यांनी सांगितलं आहे. संपूर्ण देशाला या निर्णयाची माहिती मिळावी म्हणून 27 फेब्रुवारीला पाकिस्ताननं त्यांच्या नॅशशन असेंब्लीचं विशेष अधिवेशन बेलावलं आहे. तसंच नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठकही बोलावण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सर्व संरक्षण दलांना आणि लोकांना सर्व प्रकारच्या शक्यतांसाठी तयारी ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानच्या सैन्यानं भारतीय सैन्याला योग्य वेळी दिलेल्या प्रतिसादाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं.

दरम्यान ही आणीबाणीसदृश परिस्थिती आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी नॅशनल असेंब्लीचं विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती हिना रब्बानी खार यांनी केली आहे.   

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्ता नुसार चीनने भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान या दक्षिण आशियातले दोन महत्त्वाचे देश आहेत. या दोन्ही देशात चांगले संबंध असतील तर दक्षिण आशियात शांतता नांदेल असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. 

पाकिस्तानात ट्विटरवरही प्रतिक्रिया

सध्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियावर त्यांच्या वायूसेनेची स्तुती करत आहेत की त्यांच्या तात्काळ कारवाईनंतर भारताला माघार घ्यावी लागली.

पाकिस्तानमध्ये ट्विटरवर बालाकोट, पाकिस्तानी आर्मी, पाकिस्तानी एयरफोर्स हे शब्द ट्रेंड होत आहेत.

नय्याब कयानी लिहितात, आम्ही झोपलो होतो, मात्र आमचे जवान जागे होते, अल्लाह त्यांना साथ देईल.

यासिर मलिक यांनी ट्विट केलं की भारताने सीमारेषेचं उल्लंघन केलं आणि त्यांच्या सैन्याला सीमेपलीकडे पाठवलं. मात्र आमच्या वायुसेनेने त्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि माघार घ्यायला भाग पाडलं.

अरसलन याकूब लिहितात, "100 कोटी हिंदू आमच्यावर हल्ला करण्यासाठी तयार आहे आणि आम्ही 20 कोटी पाकिस्तानी लोक पाकिस्तानी सुपर लीग (पाकिस्तानमधील एक क्रीडा स्पर्धा)चा आनंद घेत आहोत. आमचे सैनिक पाठीशी असल्यामुळे निवांतपणे आम्ही याचा आनंद घेऊ शकतो.

खूर्रम केटीएस नावाचं एक ट्विटर हँडलने लिहिलं आहे, "भारताकडून हवाई हल्ल्याची माहिती भारताच्या कृषिमंत्र्यांनी दिली आहे. त्यांनी टोमॅटो तर फेकून मारले नाही ना हे पहायला हवं."

यामध्ये पाकिस्तानच्या लोकांनी सरकार आणि सेनेच्या लोकांनाही काही प्रश्न विचारले आहेत.

के फवाद जावेद यांनी सैन्याला प्रश्न विचारले आहे की भारतीय विमानं सीमापार कशी घुसली? "ते आमच्या हवाई क्षेत्रात घुसले आहेत आणि आमचं सैन्य त्यांना मारू शकलं नाही. आता फक्त ट्विटरवर गोळीबार करत आहेत."

काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेटच्या सुरक्षा समितीच्या झालेल्या बैठकीचे आणि पाकिस्तानचे पंतप्रधान आराम करत असल्याचे फोटो ट्वीट केलं आहे.

पाकिस्तानचे एक पत्रकार अहमद नुरानी लिहितात, "काल रात्री भारताने जे केलं त्याचा मी निषेध करतो. तसं तर मी युद्धाच्या विरोधात आहे. मात्र त्याचवेळी माझा पाकिस्तानच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे आणि भारताच्या कारवाईचं आम्ही योग्य प्रकारे उत्तरं दिलं. हा पाकिस्तानच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)