HIV वर उपचार शक्य होणार?- लंडनमधील संशोधन आशेचा किरण

HIV वर नवीन संशोधन Image copyright Getty Images

HIV हा आतापर्यंत असाध्य समजला जात होता. मात्र या आजारावर उपचार मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. युकेमध्ये एका रूग्णाच्या शरीरातून HIV 'गायब' झाल्याचं डॉक्टरांना आढळून आलं.

या रूग्णाच्या शरीरात स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या शरीरात HIV आढळून आला नाही. रूग्णाच्या शरीरातून हा विषाणू पूर्णपणे नाहीसा होण्याची ही दुसरीच वेळ आहे, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

लंडनमधील या रुग्णावर कॅन्सरसाठी उपचार केले जात होते. त्याला HIV/एड्सही झाला होता. मात्र स्टेम सेल प्रत्यारोपणानंतर आता तो HIV साठीची औषधं घेत नाहीये.

संशोधकांच्या मते तो पूर्णपणे बरा झालाय, असं म्हणणं थोडं घाईचं होईल. HIV बाधित लोकांवर उपचार करण्यासाठी ही पद्धत व्यवहार्य नाहीये. मात्र भविष्यात HIV/एड्सवर उपचारासाठी याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.

लंडनमध्ये ज्या पुरूष रुग्णावर (त्याच्या नावाचा उल्लेख केला नाहीये.) उपचार सुरू होते, त्याला HIV/एड्स असल्याचं निदान 2003 मध्ये झालं होतं. 2012 मध्ये त्याला Hodgkin's Lymphoma (कॅन्सरचा एक प्रकार) असल्याचंही डॉक्टरांच्या लक्षात आलं.

त्याच्यावर केमोथेरपी सुरू करण्यात आली. त्याचसोबत HIV प्रतिरोधक दात्याच्या शरीरातील स्टेम सेल्सचं प्रत्यारोपणही त्याच्या शरीरात केलं गेलं. परिणामी त्याच्या शरीरातील HIV आणि कॅन्सरचं प्रमाण कमी होताना आढळून आलं.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, इंपीरिअर कॉलेज लंडन, केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी या अभ्यासात सहभाग घेतला होता.

'केवळ योगायोग नाही'

एखाद्या रुग्णाच्या शरीरातून HIV नाहीसे होण्याची ही दुसरी वेळ आहे. दहा वर्षांपूर्वी बर्लिनमधील एका रूग्णामध्ये bone-marrow प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. HIV/एड्सवर मात करणारा टीमोथी ब्राऊन हा पहिला रूग्ण ठरला.

त्याच्यावर दोनदा bone-marrow प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर टीमोथीवर ल्युकेमियासाठी रेडिओथेरपीही केली गेली.

"प्रत्यारोपणाद्वारे HIV हद्दपार करण्यात दुसऱ्यांदा यश मिळालं आहे. बर्लिनमधील रुग्ण हा केवळ योगायोग नव्हता, हे आम्ही सिद्ध केलं आहे. योग्य उपचारांमुळेच या दोन्ही रुग्णांमधील शरीरातून HIV नष्ट करण्यात यश मिळालं आहे," असं या संशोधनातील प्रमुख प्रोफेसर रवींद्र गुप्ता यांनी सांगितलं.

HIV असाध्य राहणार नाही?

संशोधनाचे निष्कर्ष हे उत्साहवर्धक असले, तरी HIV नं बाधित असलेल्या लाखो रुग्णांना त्यामुळं लगेचच उपचार उपलब्ध होतील, अशी आशा लगेचच करता येणार नाही.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा HIV रुग्ण औषधोपचार घेणं थांबवू शकतात.

मुळात, या रुग्णांवरील प्रत्यारोपणाची उपचारपद्धती ही प्रामुख्यानं कॅन्सरच्या रुग्णांसाठी वापरली जाते. सध्या HIV वर केले जाणारे उपचार परिणामकारक आहेत. या उपचारांमुळे विषाणू असलेले रुग्ण दीर्घकाळ आणि आरोग्यदायी आयुष्य निश्चितच जगू शकतो.

मात्र HIV वर नवीन उपचार शोधण्यासाठी आणि हा आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तज्ज्ञांना या संशोधनाचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.

लंडनमधील इंपीरिअल कॉलेजमधील प्रोफेसर एद्युर्दो ऑलाव्हारिया यांनीही स्टेम सेल प्रत्यारोपणामुळे HIV वर नवीन उपचार पद्धती शोधण्यास मदत होऊ शकते, असं म्हटलं आहे. प्रोफेसर एद्युर्दो हेदेखील या संशोधनामध्ये सहभागी झाले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)