मुकेश अंबानी झाले आणखी श्रीमंत; फोर्ब्सच्या यादीत 16वरून 13व्या स्थानी

मुकेश अंबानी Image copyright Reuters

फोर्ब्सने 2019च्या सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुकेश अंबांनी यांनी सहा स्थानांनी वधारून 13 व्या स्थानी आगेकूच केली आहे.

2018मध्ये मुकेश अंबांनी 19 व्या क्रमांकावर होते तर 2017मध्ये ते 33 व्या स्थानावर होते.

या यादीमध्ये अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (131 अब्ज डॉलर) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यानंतर बिल गेटस् (96.6 अब्ज डॉलर) आणि वॉरेन बफेट (82.5 अब्ज डॉलर) यांचा क्रमांक आहे.

फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग (62.3 अब्ज डॉलर) यांची घसरण झाली असून ते 3 स्थानांनी घसरून 8 व्या स्थानी आहेत.

न्यूयॉर्कचे माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग (55 अब्ज डॉलर) यांनी दोन स्थानांनी प्रगती करून ते 9 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

फ्रान्सच्या LVMHचे सीईओ बर्नार्ड अरनॉल्ट (76 अब्ज डॉलर) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठी मोबाईल कंपनी अमेरिका मोविलचे मालक कार्लोस स्लिम हेलू (64 अब्ज डॉलर) या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. ते मेक्सिकोमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

पहिल्या दहा लोकांची यादी पाहिल्यास प्रसिद्ध जारा या फॅशन चेनचे अमानसियो ऑरटेगा (62.7 अब्ज डॉलर) सहाव्या स्थानावर ओरॅकलचे संस्थापर लॅरी इलिसन (62.5 अब्ज डॉलर) सातव्या स्थानावर, गूगलचे माजी सीईओ लॅर पेज (50.8 अब्ज डॉलर) 10 व्या स्थानावर असल्याचं दिसून येईल.

फोर्ब्सच्या यादीमधील महिला

गेल्या 10 वर्षांमध्ये महिला अब्जाधीशांच्या संख्येत 167 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2010मध्ये महिला अब्जाधीशांची संख्या 91 होती, ती 2019मध्ये वाढून 243 वर पोहोचली आहे.

यावर्षी पहिल्या 20 क्रमांकामध्ये फ्रँकोइस बेटनकोर्ट आणि क्रिस्टल ब्रिजेस म्यूझियम ऑफ अमेरिकन आर्टच्या एलिस वॉल्टन या फक्त दोन महिलांचा समावेश आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फ्रँकोइस बेटनकोर्ट

बेटनकोर्ट या फ्रेंच कॉस्मेटिक्स कंपनी 'लॉरियल'च्या उत्तराधिकार आहेत. तर एलिस वॉल्टन या अमेरिकन सुपरमार्केट 'वॉलमार्ट'चे संस्थापक सॅम वॉल्टन यांच्या एकुलत्या कन्या आहेत.

या यादीमध्ये सर्वात तरुण महिला अब्जाधीश म्हणून काईली जेनर यांचा समावेश झाला आहे. कार्दाशिया परिवारातील जेनर केवळ 21 वर्षांची आहे. त्यांनी मार्क झकरबर्ग यांचा वयाच्या 23 व्या वर्षी अब्जाधीश होण्याचं रेकॉर्ड मोडले आहे.

जेनर काईली कॉस्मेटिक्स कंपनी चालवतात. त्यांनी ही कंपनी केवळ 3 वर्षांपूर्वी सुरू केली होती. या कंपनीने गेल्या वर्षभरात 36 कोटी डॉलरचा व्यवसाय केला आहे.

जेनर यांनी फोर्ब्सला सांगितले, "मी काहीही अपेक्षा करत नाही. तसंच भविष्याबाबत काहीही पूर्वानुमान करत नाही."

"पण मान्यता मिळाल्यानं बरं वाटतं, मला ही शाबासकी मिळाली आहे.",असं जेनर म्हणाल्या.

फोर्ब्सच्या 2019च्या यादीमध्ये 2153 लोकांचा समावेश आहे. 2018 मध्ये यापेक्षा 55 अधिक लोकांचा समावेश होता.

2018मध्ये अब्जाधीशांची संख्या 2208 होती. त्यावर्षी अब्जाधीशांची एकूण संपत्ती 9100 अब्ज डॉलर होती ती या वर्षी 8700 डॉलर इतकी झाली आहे.

फोर्ब्सची ही यादी 8 फेब्रुवारीच्या कंपन्यांचे शेअर्स आणि विनिमयाच्या दरानुसार तयार करण्यात आली आहे.

पहिल्या 100 मध्ये केवळ 4 भारतीय

गेल्या एक वर्षभरात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये जवळपास 10 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. 2018 साली त्यांची संपत्ती 40.1 अब्ज डॉलर इतकी होती. ती 2019 मध्ये 500 अब्ज डॉलर झाली आहे.

Image copyright PTI

2017मध्ये मुकेश अंबानी यांना 'ग्लोबल गेम चेंजर' असा दर्जा देण्यात आला होता. या यादीमध्ये अनिल अंबानी यांचं नाव 1349 व्या क्रमांकावर आहे. 2008 साली अनिल अंबानी याच यादीमध्ये 6 व्या स्थानावर होते.

मुकेश अंबानींबरोबर पहिल्या 100 अब्जाधीशांमध्ये अझिम प्रेमजी 22.6 अब्ज डॉलरसह 36 व्या स्थानावर आहेत, तसेच 'एचसीएल'चे सहसंस्थापक शिव नाडर 82 व्या तर 'आर्सेलर मित्तल'चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल 91 व्या क्रमांकावर आहेत.

पहिल्या हजारजणांमध्ये 'आदित्य बिर्ला समूहा'चे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला (122), 'अदानी समूहा'चे संस्थापक गौतम अदानी (167), 'एअरटेल'चे अध्यक्ष सुनील मित्तल (244), 'पतंजली आयुर्वेद'चे सहसंस्थापक आचार्य बालकृष्ण (365), पीरामल एंटरप्रायजेसचे अद्यक्ष अजय पिरामल (436), 'बायोकॉन'चे संस्थापक किरण मुजूमदार- शॉ (617), 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक एन आर नारायणमूर्ती (962) यांचंही नाव समाविष्ट आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)