नीरव मोदींना त्या पत्रकाराने असं शोधलं

नीरव मोदी Image copyright Getty Images

इंग्लंडस्थित ज्येष्ठ पत्रकार मिक ब्राऊन यांनी गुरुवारी एका व्यक्तीला पाहिलं. त्या व्यक्तीवर भारतात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून भारतातून पळालेले हिरे व्यापारी नीरव मोदी होते. ब्राऊन त्याच्याकडे गेले. मात्र मोदी यांनी दिलेल्या एकसुरी आणि एक प्रकाच्या उत्तराने त्यांना आनंद होण्याऐवजी वैताग आला.

बीबीसी हिंदीला इमेलद्वारे दिलेल्या एका मुलाखतीत टेलिग्राफ या वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार मिक ब्राऊन म्हणाले की वेगवेगळे प्रश्न विचारूनदेखील मोदींनी प्रत्येक प्रश्नाला No Comment एवढंच उत्तर दिलं.

लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवर ब्राऊन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोदीचं चित्रीकरण केलं.

"मी तिथे गेल्यावर खरंतर त्याला धक्का बसला. एखाद्या व्यक्तीने सातत्याने प्रश्नाला उत्तर द्यायला नकार देत आहे आणि तुम्ही फारसं काही करू शकत नाही अशा परिस्थितीत चिडचिड होते," असं ब्राऊन या भेटीबाबत म्हणाले.

या भेटीच्या व्हीडिओत मोदी लंडनच्या रस्त्यावर चालताना दिसत आहे. त्यांच्या प्रत्यापर्णाची स्थिती, लंडनमध्ये किती दिवस राहणार, त्यांचे बिझनेस पार्टनर कोण या सगळ्या प्रश्नांना नीरव मोदी यांनी Sorry, No Comment इतकंच उत्तर त्यांनी दिलं.

छोट्या चणीचे आणि लठ्ठ प्रकृतीच्या मोदींनी मिशा वाढवलेल्या व्हीडिओत दिसतात. टेलिग्राफने ट्वीट केलेल्या व्हीडिओत प्रश्नांची उत्तरं देताना ते दिसत आहेत.

ब्राऊन त्यांचा पाठलाग करत असताना मोदी टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न करत होते. "दुपारी जेवणाच्या वेळी या रस्त्यावर टॅक्सी मिळणं नेहमीच त्रासदायक असतं," असं ब्राऊन यांनी बीबीसीला सांगितलं.

दोन मिनिटं आणि तेरा सेकंदाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर आणि मुख्य माध्यमांमध्ये व्हायरल झाला. राहुल गांधींसह अनेक विरोधी पक्षांनी हा व्हीडिओ रिट्वीट केला.

"खरं सांगायचं तर भारताकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे मला आश्चर्य आणि समाधान वाटलं. नीरव मोदींची ही बातमी भारतासाठी खूप मोठी आहे याची मला कल्पना आहे. मात्र त्याला इतका प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं," ते म्हणाले.

निव्वळ योगायोग नाही

हा व्हीडिओ तयार करण्यापूर्वी नीरव मोदीचं लंडनला राहण्याचं काय उद्दिष्ट आहे याची नीट चौकशी करण्यात आली होती. ही भेट म्हणजे निव्वळ योगायोग नव्हती.

ब्राऊन यांनी बीबीसीला सांगितलं की ते डिसेंबरपासून मोदींचा ठावठिकाणा शोधत होते. त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टेलिग्राफ मॅगझीनसाठी नीरव मोदींवर लेख लिहिला होता.

मोदी लंडनमध्ये आहेत हे याआधी कळलं होतं. मात्र त्यांना शोधणं इतकं सोपं नव्हतं. "आम्हाला त्यांना शोधायचं होतंच. गेल्या काही दिवसात ते एक विशिष्ट दिनचर्या पाळत आहेत. त्यांचं घर आणि ऑफिसदरम्यान ये जा करत असतात. याच कार्यालयातून त्यांचा सध्या व्यापार सुरू आहे असा आमचा कयास आहे," ब्राऊन सांगत होते.

Image copyright Getty Images/INDRANIL MUKHERJEE

"आम्हाला त्याला शोधायचं होतं. आणि जेव्हा त्याचा सुगावा लागला, तेव्हा ते मोदीच आहे, याची आधी आम्हाला शंभर टक्के खात्री पटवणं खूप आवश्यक होतं," त्यांनी सांगितलं.

ब्राऊन आणि रॉबर्ट मेन्डिक यांनी दिलेल्या एका बातमीनुसार मोदी वेस्ट एंड भागात 80 लाख पौंड किंमत असलेल्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा आता हिऱ्यांचा व्यापार आहे.

48 वर्षीय मोदी सध्या एका तीन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतात. त्यांनी अर्धा मजला व्यापला आहे. लंडनमधील सेंटर पॉइंट या इमारतीत ते राहतात. त्यांच्या राहत्या घराचं भाडं दरमहा 17000 पौंड असल्याची बातमी टेलिग्राफने दिली आहे.

यावर मोदी किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

या व्हीडिओवर प्रतिक्रिया देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या प्रत्यार्पणासाठी शक्य तितकी सगळी पावलं उचलली जात आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी दिल्लीत बोलताना सांगितलं की नीरव मोदी लंडनमध्ये आहे याची भारताला कल्पना आहे. "आम्ही त्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती इंग्लंडच्या सरकारला केली आहे. याचाच अर्थ असा की ते लंडनमध्ये आहे हे आम्हाला माहिती आहे. नीरव मोदी दिसले याचा अर्थ त्यांना लगेच आणता येईल असा होत नाही." ते पुढे म्हणाले.

मोदींनी यूकेमध्ये आश्रय मागितला की नाही आणि भारताच्या विनंतीवर तिथलं सरकार काय कारवाई करत आहे याची माहिती उपलब्ध नाही. टेलिग्राफ यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं नाही.

"सध्या काय स्थिती आहे हे सांगणं कठीण आहे. भारत सरकारने त्यांच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केली आहे. मात्र यूके प्रशासनाने त्यावर काय कारवाई केली हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. प्रत्यार्पणाच्या आधी त्यांना अटक करावी लागेल हे स्पष्ट आहे. ज्याअर्थी त्यांना अटक झालेली नाही त्याअर्थी प्रशासनाला ते अजून सापडलेले नाहीत," असं ब्राऊन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

पंजाब नॅशनल बँक ही भारतातील दुसरी मोठी सरकारी बँक आहे. 2018मध्ये नीरव मोदी आणि त्यांचा मामा मेहुल चोकसी यांच्या मालकीच्या दागिन्यांच्या दोन कंपन्यांनी 13 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा त्यांचावर आरोप आहे. मोदी आणि चोकसी या दोघांनीही या आरोपाचा इन्कार केला. हा घोटाळा उघड होण्यापूर्वी त्यांनी भारतातून पलायन केलं.

त्यांचा दागिन्यांचा पिढीजात व्यवसाय आहे. गेल्या आठ वर्षांत नीरव मोदी यांनी दागिन्यांचा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ब्रँडची स्थापित केला. लंडन, न्यूयॉर्क आणि हाँगकाँग या शहरांमध्ये या ब्रँडचे स्टोअर्स आहेत. या यशामुळे ते भारतातील सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या मालमत्तेची किंमत 122 अब्ज होती असं फोर्ब्सतर्फे जाहीर करण्यात आलं.

Image copyright Getty Images

त्यांचे काका गीतांजली ग्रुपचे प्रमुख आहे. त्यांची भारतात 4000 दुकानं आहेत. व्हायरल झालेल्या व्हीडिओत मोदींनी जे जॅकेट घातलं तेसुद्धा चर्चेचा विषय झालं होतं. टेलिग्राफच्या मते हे जॅकेट ऑस्ट्रिच हाईड या कंपनीचं होतं. त्याची किंमत 10000 पौंड इतकी आहे.

"हो ऑस्ट्रिचचं जाकिट हा चर्चेचा विषय झाला होता. मी फॅशनच्या क्षेत्रात तितकासा तज्ज्ञ नाही. मात्र फॅशन डेस्कच्या माझ्या एका सहकाऱ्याने ते ऑस्ट्रिचचं जाकिट असल्याचं सांगितलं. जेव्हा मोदी त्यांच्या दारात आले तेव्हा त्या सेल्समनला नक्कीच आनंद झाला असेल," असं ब्राऊन यांनी सांगितलं.

या बातमीवर वर्तमानपत्र पुढे काम करतच राहील असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)