अमेरिकेतील 'मांसाहारी गायीं'पासून मिळणाऱ्या दुधाच्या उत्पादनांचा भारताने विरोध केलाय कारण...

अमेरिकेतील गाय Image copyright Getty Images

आपल्याकडून दुग्धजन्य उत्पादनं भारताने विकत घ्यावीत, असी अमेरिकेची मागणी आहे. भारताने त्याला नकार आहे. आमच्या सांस्कृतिक आणि धार्मिक भावनेशी कसलीही तडजोड होऊ शकत नाही, असं भारताचं म्हणणं आहे. पण का?

अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये गायीला खायला देण्यात येणाऱ्या आहारात गाय-डुक्कर आणि मेंढीचे मांस आणि रक्त मिसळलं जातं. त्याला 'ब्लड मील' असंही म्हटलं जातं.

असा आहार घेतलेल्या गायींच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांबाबत भारताची स्पष्ट भूमिका आहे. 'ब्लड मील' देण्यात आलेल्या गायींच्या दुधापासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना आपण विकत घेऊ शकत नाही, असं भारतानं स्पष्ट केलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनल्ड ट्रंप यांनी भारताला व्यापारातील प्राधान्य देशांच्या यादीमधून वगळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच भारताने अमेरिकेतील दुग्धजन्य पदार्थ घेण्यास नकार दिला, असं तज्ज्ञ सांगत आहेत.

ट्रंप याबाबत म्हणाले होते, "अमेरिकन उत्पादनं भारत आपल्या बाजारांमध्ये योग्य पद्धतीनं पोहोचवेल, असं आश्वासन भारतानं अद्याप दिलेलं नाही. भारत सरकारशी भरपूर चर्चा झाल्यानंतरच हा निर्णय मी घेत आहे."

व्यापार प्राधान्य यादीतील स्थानामुळे भारत 560 कोटी डॉलर किंमतीचा माल अमेरिकन बाजारांमध्ये निर्यातशुल्काविना पाठवायचा आणि त्याबदल्यात अमेरिका आपला माल भारतात पाठवायचा. परंतु या दुग्धजन्य उत्पादनांच्या प्रकरणांवर सगळं अडून बसलं आहे.

भारत सरकारची बाजू

अमेरिकेसमोर भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे भारतानं एक स्पष्टीकरण दिलं आहे. 'ब्लड मील' देण्यात येणाऱ्या जनावरांपासून तयार होणारे उत्पादन आमचा देश खरेदी करू शकत नाही, असं त्यात म्हटलं आहे.

या स्पष्टीकरणात म्हटलं आहे, "भारताने आपली बाजू मांडली आहे. सर्टिफिकेशन प्रक्रियेनुसार आयात होणारी उत्पादनं 'ब्लड मील' न देण्यात आलेल्या म्हणजेच मांसाहारी नसलेल्या जनावरांपासून बनवलेली असली पाहिजेत.

"भारताची ही अट सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांशी निगडित आहे. यावर तडजोड शक्य नाही. सर्टिफिकेशन प्रक्रियेचं पालन झालं तर भारताला आयात करण्यात काहीही अडथळा नाही."

'ब्लड मील' काय आहे?

'ब्लड मील' हा मांस पॅकिंग व्यवसायाचं सहउत्पादन आहे. हे दुसऱ्या जनावरांना खाऊ घालण्यासाठी वापरलं जातं.

जनावरांना मारताना (विशेषतः गोवंश) त्यांचं रक्त जमा करून उन्हामध्ये किंवा हीटरमध्ये वाळवलं जातं. त्यापासून जे खाद्य तयार होतं, त्याला 'ब्लड मील' असं म्हणतात.

Image copyright WWW.AMAZON.IN

हे लायसीन नावाच्या अमिनो आम्लाचा एक महत्त्वाचा स्रोत मानलं जातं. हे आम्ल गायीच्या दुधातून मिळणाऱ्या दहा आवश्यक अमिनो आम्लापैकी एक आहे. त्याचा वापर पशुपालन व्यवसायात केला जातो.

दुभत्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी, दूध उत्पादन वाढावे, यासाठी त्यांना नियमित ब्लड मील देण्यात येतं.

दुभत्या जनावरांशिवाय कोंबड्या, मासे आणि झिंग्यांनाही ते दिले जाते. तसेच शेतीमध्येही त्याचा खत म्हणून वापर केला जातो, त्यामुळे नायट्रोजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

गायीच्या शरीरामध्ये मिळणाऱ्या प्रथिनामध्ये दहा प्रकारचे अमिनो आम्ले असतात. त्यामध्ये लायसीन आणि मिथियोनाईन ही दोन महत्त्वाची आम्लं असतात. आपल्या अन्नामधून गाय प्रथिनं शोषू शकत नाही. गायी वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्लं शोषू शकतात. त्यामुळे त्यांच्या चाऱ्यामध्ये 'ब्लड मील' आणि मका दिला जातो. 'ब्लड मील' हा लायसीनचा स्रोत आहे आणि मक्यातून मिथियोनाइन मिळतं.

पण काही तज्ज्ञांच्या मते 'ब्लड मील'मुळे अमिनो आम्लाचे असंतुलन तयार होते आणि त्यामुळेच ते दुभत्या जनावरंसाठी चांगले खाद्य नाही, असं म्हटलं जातं.

Image copyright AFP/GETTY IMAGE

'डेरी हर्ड मॅनेजमेंट'मध्ये छापलेल्या एका बातमीमध्ये मिनेसोटा विद्यापीठात झालेल्या एका संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. अशा आहारामुळे लायसीनचं प्रमाण बिघडतं, जास्त तापवल्यामुळे 'ब्लड मील'मधील पोषकतत्त्वं नष्ट होतात आणि अशा परिस्थितीत लायसीनसाठी सोयाबीन हा चांगला स्रोत आहे, असं त्यात म्हटलं आहे.

भारतात अनेक ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइटवर शेतीसाठी 'ब्लड मील' विकलं जातं. फीडिपीडिया नावाच्या वेबसाईटने 'ब्लड मील'मुळे खाटिकखान्यातील कचरा कमी होतो आणि प्रदूषण कमी होतं. पण तज्ज्ञांच्या मते, रक्त वाळवण्याच्या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागू शकते.

ब्लड मीलला विरोध का?

याला विरोध करण्यामागे भारत सरकारकडे केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक श्रद्धेचं कारण नाही तर शास्त्रीय कारणही आहे.

1980च्या दशकामध्ये 'मॅडकाऊ' नावाचा एक आजार अमेरिका आणि इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला होता. सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार दुभत्या जनावरांना होणारा हा आजार प्रियॉन नावाच्या प्रोटीनमुळे होतो. त्याचा जनावराच्यां मज्जासंस्थेवर परिणाम होतो.

याचा फटका मनुष्यालाही होऊ शकतो. जनावरांना हाडांपासून बनवलेला चारा दिल्यामुळे ते झालं असावं, असं सांगण्यात येतं.

यामुळेच अमेरिकेच्या फूड अँड ड्रग विभागाने 1997 आणि 2008मध्ये पशुपालन करताना जनावरांच्या मांस आणि रक्तापासून तयार करण्यात आलेल्या चाऱ्याबाबत नियम केले होते. त्यानुसार दुभत्या जनावरांना चाऱ्यामध्ये हाडांचा चुरा वापरण्यावर बंदी घातली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)