इटलीच्या पोलिसांची हुशारी, चोरी होण्याआधीच बदललं कोट्यवधींचं चित्र

द क्रुसिफिकेशन चित्र Image copyright Getty Images

अत्यंत हुशारीने चोरांनी एक मौल्यवान चित्र चोरलं. पण पोलिसांनी खरं चित्र आधीच सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं होतं त्यामुळे त्यांची ही हुशारी धुळीला मिळाली.

पोलिसांच्या या हुशारीमुळे ते चोरावर मोर ठरल्याची चर्चा इटलीत सुरू आहे.

त्याचं झालं असं की इटलीच्या कॅसलनोव्हो मागरा या ठिकाणी असलेल्या सॅंटा मारिया मेडलेना चर्चमध्ये पीटर ब्रुगेल द यंगर या चित्रकाराचा मूल्यवान पेंटिंग होतं. या चित्राची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. ते चित्र चोरीला गेलं अशी चर्चा सुरू होती पण पोलिसांनी नवा खुलासा केल्यामुळे घटनेला वेगळंच वळण मिळालं आहे.

पीटर ब्रुगेल यांचं द क्रुसिफिक्शन हे चित्र चोरीला जाऊ शकतं अशा अफवा उठल्या. मग पोलिसांनी खरं चित्र सुरक्षित ठिकाणी ठेवलं आणि त्याच्या जागी अगदी त्याचप्रमाणे दिसणारं चित्र ठेवलं. या चित्राची अंदाजे किंमत 3 दशलक्ष युरो (अंदाजे 23 कोटी 51 लाख) इतकी आहे. एका कुटुंबाने चर्चला हे चित्र दान केलं होतं.

या गोष्टीला महिना उलटला आणि चोरांनी आपला डाव साधला. एका हातोड्याने केस फोडून ते चित्र पळवलं. पण त्यांचं दुर्दैव की त्यांनी खोटं चित्र नेलं. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

चित्र बदलल्याची पूर्वकल्पना शहराचे महापौर डॅनियल माँटबेलो यांना होती. त्यांना पूर्वकल्पना दिल्यानंतर पोलिसांनी सर्व व्यवस्था केली आणि चोरी होण्याची वाट पाहिली.

महापौर डॅनियल यांनी हा सर्व प्रकार बुधवारी रात्री माध्यमांना सांगितला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यामुळे मी तुमच्यासमोर सर्व गोष्टी सांगू शकत नाही असं ते म्हणाले.

विशेष म्हणजे चर्चमध्ये येणाऱ्या काही लोकांनी हे ओळखलं होतं की हे चित्र अस्सल नाही. त्यांनी ही गोष्ट चर्चच्या अधिकाऱ्यांना सांगितली. पण अधिकाऱ्यांनी त्यांना इतकंच सांगितलं होतं की याची वाच्यता कुठेही करू नका. याचा खुलासा महापौरांनी केला. चर्चच्या अधिकाऱ्यांनी या काळात संयम पाळला त्याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार मानले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)