Yellow vest protests : पॅरिसमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू

पॅरिस Image copyright AFP

पॅरिसमध्ये 'यलो वेस्ट' आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आंदोलकांनी शहरातील अनेक रस्त्यांवर लूट केल्याचे प्रकार घडले आहेत.

इंधनावरील कराची वाढ करण्यात आल्यानंतर सुरू झालेले हे आंदोलन आता आणखी मोठे झाले आहे.

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला आहे. या आंदोलकांनी 'आर्क दी ट्रियॉम्फ' या स्मृतिस्थळावर दगडफेकही केली.

शनिवारी या आंदोलनाने काही महिन्यांपूर्वीच्या आंदोलनाप्रमाणे स्वरूप धारण केले. फुकेस या उच्चवर्गीय लोकांमध्ये, राजकीय लोकांची उठबस असणाऱ्या रेस्टॉरंटची तोडफोड करण्यात आली. त्याचप्रमाणे रस्त्यावर आग लावून देणे, गाड्या तसेच बॅंकांच्या शाखा पेटवून देण्याचे प्रकार घडले आहेत.

एका बँकेला लावलेल्या आगीमुळे वरच्या मजल्यावरील सर्व रहिवाशांना बाहेर काढून अग्निशमन दलाला आग विझवावी लागली. त्यामध्ये 11 लोकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींमध्ये अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश असल्याची माहिती एएफपी वृत्तसंस्थेने दिली आहे.

या आंदोलनावर नियंत्रण आणण्यासाठी 1400 पोलिसांची फौज कार्यरत होती असे गृहमंत्री ख्रिस्टोफ कास्टनर यांनी सांगितले. दुपारी 80 पेक्षा अधिक आंदोलकांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कोणत्याही हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देण्याच्या सूचना पोलिसांना केल्याचे कास्टनर यांनी सांगितले. 'या लोकांना हिंसा हवी आहे म्हणूनच ते पॅरिसमध्ये गोंधळ घालत आहेत यात शंका नाही', असं कास्टनर यांनी ट्वीट केलं आहे.

Image copyright AFP

गेल्या वेळच्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन लहान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शनिवारी 8000 लोक रस्त्यावर उतरले होते. त्यात 1500 लोक अत्यंत हिंसक होते आणि ते केवळ तोडफोड आणि मारामारी आणि हल्ले करण्यासाठी आले होते, असंही ते म्हणाले.

जानेवारी महिन्यातच पोलिसांनी हिंसक आंदोलन मोडून काढण्याच्या सूचना पोलिसांना केल्या होत्या.

या आंदोलनानंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी आंदोलकांसाठी 10अब्ज युरोची मदत देऊन गरिब कामगार व निवृत्तीवेतनधारकांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला होता.

गेला महिनाभर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्समध्ये सर्वत्र फिरत असून ते स्थानिक महापौर व नागरिकांच्या भेटी घेत आहेत. ते लोकांना एकत्र येऊन फ्रान्सच्या पुढील वाटचालीसाठी कल्पना मांडायचे आव्हान करत आहेत. आतापर्यंत 8253 स्थानिक बैठका पार पाडल्या आहेत.

ज्यू धर्मीय विचारवंत अॅलेन फिंकिएलक्रौट यांचा पॅरिसमध्ये अपमान करून त्यांना टोमणे मारल्यानंतर या आंदोलकांवर अँटीसेमेटिजमचा आरोप केला जात आहे.

फिंकिएलक्रौट यांचा आंदोलकांनी अपमान करण्यास सुरूवात केल्यानंतर पोलिसांना मध्ये पडून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली होती. आपल्याला 'डर्टी झायोनिस्ट', 'थ्रो युअरसेल्फ इन द कॅनाल' अशाप्रकारचे शब्द ऐकू आल्याचे फिंकिएलक्रौट यांनी 'ल पॅरिसिएन' या वर्तमानपत्राला माहिती देताना सांगितले.

त्यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी गेल्या वर्षी फ्रान्समध्ये अँटीसेमेटिक हल्ल्यात 74 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)