#Christchurch: हल्ल्याचा व्हीडिओ कसा झाला व्हायरल?

हल्ला Image copyright Getty Images

न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च येथे दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यात 49 जण मृत्युमुखी पडले आणि 20हून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यातील संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

मुख्य संशयित हा 28 वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. त्याचं नाव ब्रेंटन टॅरंट आहे. या घटनेची सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे संशयितांनी या घटनेचं फेसबुक लाइव्ह केलं होतं.

या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडिया कंपन्यांनी हा व्हीडिओ आपल्या साइटवरून हटवेपर्यंत तो अनेकांनी डाउनलोड केला होता आणि त्या लोकांनी पुन्हा रिशेअर केला.

या घटनेचे फोटो आणि व्हीडिओचे स्क्रीन ग्रॅब अनेक न्यूज वेबसाइटने तसेच वर्तमानपत्रांनी शेअर केल्या आहेत. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया कंपन्या हा दावा वारंवार करत आल्या आहेत की हिंसाचाराशी संबंधित व्हीडिओला आम्ही आळा घालू. पण अशा घटनेनंतर हे सिद्ध झालं आहे की असे व्हीडिओ रोखण्यात त्यांना सातत्यानं अपयश येत आहे.

सोशल मीडियावर नेमकं काय शेअर झालं?

न्यूझीलंड हल्ल्याच्या 10-20 मिनिट अगोदर 8 तैन या कट्टरपंथी वेबसाइटने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात हल्ल्याच्या संशयिताच्या फेसबुक पेजची लिंक देण्यात आली होती. याच पेजवर संशयिताने हल्ल्याचं लाइव्ह स्ट्रिमिंग केलं होतं. याच पेजवर काही प्रक्षोभक विचारदेखील शेअर करण्यात आले होते.

Image copyright Getty Images

''हे प्रक्षोभक विचार पेजवर शेअर करण्याचं मुख्य कारण लोकांचं लक्ष विचलित करणं असावं'', असं डेटा विश्लेषक रॉबर्ट इव्हान यांचं म्हणणं आहे.

हा व्हीडिओ फेसबुक आणि युट्युबवर शेअर झाल्यानंतर दोन्ही प्लॅटफॉर्मनं तो त्वरित हटवला पण त्याआधीच अनेकांनी हा व्हीडिओ डाउनलोड केला होता आणि रिशेअर केला. रिशेअर करून तो पुन्हा डाउनलोड करण्यात आला अशा प्रकारे तो व्हीडिओ व्हायरल झाला. ऑस्ट्रेलियाच्या काही वाहिन्यांनी हा व्हीडिओ प्रसारित केला.

फेसबुकनं सांगितलं की हा व्हीडिओ आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामहून काढून टाकला आहे. त्याच वेळी त्यांनी हे देखील सांगितलं की हल्ल्याच्या संशयितांच्या स्तुतीवर काही व्हीडिओ तयार करण्यात आले आहेत ते देखील हटवण्यात आले.

युट्यूबनं सांगितलं की या घटनेसंदर्भातले व्हीडिओ आम्ही हटवले आहेत.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा युट्यूबनं सांगितलं की या घटनेसंदर्भातले व्हीडिओ आम्ही हटवले आहेत.

कट्टरपंथियांचे व्हीडिओ थांबवण्याचे सोशल मीडियाने प्रयत्न केले आहेत. रिचर्ड स्पेंसर या 'अमेरिकन श्वेतवर्णीय राष्ट्रवादी' तरुणाचं अकाउंट ट्विटरनं ब्लॉक केलं होतं. हा तरुण आपल्या अकाउंटवरून द्वेषपूर्ण वक्तव्य प्रसिद्ध करत होता. 2018मध्ये फेसबुकने त्याचं अकाउंट ब्लॉक होतं.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म काय करू शकतात?

''सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असलेले प्रक्षोभक व्हीडिओ रोखणं'', हे त्या कंपन्यासमोर मोठं आव्हान आहे असं राज्यशास्त्राचे प्राध्यापक सीरन गिलेस्पी यांना वाटतं. ते सांगतात की, "अशा प्रकारचे व्हीडिओ थांबवण्याचे प्रयत्न कंपन्यांकडून केले जातात पण ते लगेच डाऊनलोड करून शेअर केले जातात. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवणं कठीण होऊन जातं. "

गिलेस्पी सांगतात की ते स्वतः देखील संशोधनासाठी युट्यूबचा खूप वापर करतात. त्या ठिकाणी कट्टरपंथियांचे अनेक व्हीडिओ त्यांच्या हाती लागल्याचं ते सांगतात. युट्युब हे कट्टरपंथी आणि नक्षलवादी विचारांच्या व्हीडिओचं भांडार आहे असं गिलेस्पींना वाटतं. याबाबतीत युट्युबला खूप काम करावं लागणार आहे असं ते सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)