ब्रेक्झिट : वैतागलेल्या लोकांना आता तोडगा हवाय - थेरेसा मे

थेरेसा मे Image copyright Reuters

ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी खासदारांना सुनावलं आहे.

ब्रेक्झिटच्या निमित्तानं सुरू असलेल्या राजकीय खेळाला लोक कंटाळले आहेत. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं थेरेसा मे यांनी डाऊनिंग स्ट्रीटवर बोलताना सांगितलं.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी, "आपण लोकांच्या बाजूने आहोत असं सांगितलं आहे. हा विलंब ब्रिटिश खासदारांमुळे होत असल्याचं" त्यांनी सांगितलं आहे.

तत्पूर्वी मे यांनी युरोपियन युनीयनचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांना ब्रेक्झीट 30 जूनपर्यंत पुढे ढकलावे अशी विनंती केली आहे. ब्रिटिश खासदारांनी दोनवेळा कराराचा मसुदा नाकारल्यानंतर मे यांना अशी विनंती करणं भागच होतं.

ब्रेक्झिटला उशीर होणं ही खेदाची बाब असल्याचे सांगत आता 30 जूनपेक्षा ब्रेक्झिटला विलंब करण्यास आपण तयार नाही असंही त्यांनी सांगितलं.

थेरेसा मे लोकांना उद्देशून म्हणाल्या, "आतापर्यंत तुम्ही बरंच सहन केलं आहे. सर्व राजकीय खेळाला तुम्ही कंटाळला आहात, मुलांच्या शाळा, राष्ट्रीय आरोग्यसेवा, गुन्हे अशा महत्त्वाच्य विषयांवर बोलण्याऐवजी खासदारांना केवळ ब्रेक्झिटवर बोलताना पाहून तुम्ही कंटाळला आहात.

हा ब्रेक्झीटचा काळ संपावा असं तुम्हाला वाटतं. तुमच्या भावनेशी मी सहमत आहे. मी तुमच्याच बाजूची आहे. "

आता या आपण तयार केलेल्या तोडग्यातून बाहेर पडायचं किंवा करारच करायचा नाही याचा खासदारांनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. अन्यथा लोकांच्या विश्वासाला तडा जाईल अशी ताकीदही मे यांनी दिली.

आता त्या ब्रसेल्सला जाऊन युरोपियन युनीयनच्या नेत्यांना भेटणार आहेत. ब्रसेल्समध्ये त्या मुदतवाढीसाठी चर्चा करणार आहेत.

मे यांनी मांडलेल्या विड्रॉवल अग्रीमेंटला खासदारांनी नाकारल्यानंतर आणखी एकदा मतदान घेण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो, मात्र सभापती जॉन बर्कोव यांनी नकार दिल्यामुळे आपण ते घेऊ शकलो नाही असं मे यांनी टस्क यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)