न्यूझीलंड: ख्राइस्टचर्च मशीद हल्ल्यात गेलेल्या भारतीयांच्या मन हेलावून टाकणाऱ्या कथा

न्यूझीलंड श्रद्धांजली Image copyright NURPHOTO/GETTY IMAGES

जगाच्या पार एका कोपऱ्यात असणारा न्यूझीलंड देश अनेक लोकांना नवं आयुष्य सुरू करायला सुरक्षित वाटतो. पण गेल्या शुक्रवारी दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी एका व्यक्तीने केलेल्या बेछूट गोळीबारामुळे हा समज गळून पडला आहे.

"एका सुंदर देशामध्ये आपल्या मुलांना वाढवता येईल या कल्पनेने मी अत्यंत आनंदी होते परंतु (या हल्ल्यामुळे) मनाला अत्यंत वेदना झाल्या असं या हल्ल्यातून बचावलेले," मझरुद्दिन सय्यद अहमद यांनी सांगितलं.

या हल्ल्यामुळे एका आठवड्याभरात 50 व्यक्तींचे प्राण गेले आहेत. परंतु त्यानंतर ख्राइस्टचर्च शहराने एकात्मतेचा संदेश दिला आहे. इथल्या वैविध्यपूर्ण आणि मिश्र समाजाकडे इतके दिवस रहिवाशांचे फारसे लक्ष गेले नव्हते.

परंतु या हल्ल्यामुळे द्वेषाचं बीज समाजात पेरून द्वेष कसा वाढवला जाऊ शकतो, याचं दर्शन झालं. तसेच त्यादिवशी मशिदीत प्रर्थना करणाऱ्या लोकांचे अनुभव ऐकले की हे जग किती असुरक्षित आहे, याचीही प्रचिती आली.

या हल्ल्यात बळी पडलेल्या सात भारतीयांपैकी काही लोकांबद्दल इथे जाणून घ्या....

'तिचं स्वप्न पूर्ण करणं हेच त्याचं स्वप्न होतं'

24 वर्षांच्या अन्सी अलीबावाचं न्यूझीलंडला येणं तसं इतरांसारखं नव्हतं. तिचा केरळमध्ये एका साध्या कुटुंबात जन्म झाला होता. तिचे बाबा सौदी अरेबियामध्ये काम करायचे. त्यांचं तिकडंच निधन झाल्यावर अन्सीच वयाच्या 18व्या वर्षी आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ लागली होती.

तिचं हे सर्वांना मदत करणं आपल्या पहिल्याच भेटीमध्ये प्रभावित करणारं होतं, असं तिचे पती अब्दुल नाझर यांनी सांगितलं.

हे जोडपं वर्षभरापूर्वी शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतातून तिथं स्थलांतरित झालं होतं. 'तिचं' स्वप्न पूर्ण करणं हे 'आपलं' स्वप्न होतं, असं अब्दुल सांगतात.

Image copyright FAMILY HANDOUT

त्याच्या वडिलांनी घर गहाण ठेवून कर्ज काढल्यानंतरच या दोघांना न्यूझीलंडला जाणं शक्य झालं होतं. त्या दोघांचीही केरळबाहेर जाण्याची ही पहिलीच वेळ होती. ख्राइस्टचर्चमध्ये नोकरी मिळाल्यानंतर ते आपल्या कुटुंबाला मदत करू लागले होते.

नाझर सांगतात, "तिला शिकायला आवडायचं. ती ख्राइस्टचर्चच्या लिंकन विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होती आणि तिची इंटर्नशिप नुकतीच सुरू झाली होती."

कॅम्पसमध्ये आल्यावर दोघेही एकत्र राहायचे ती खोली, ते फिरायला जायचे त्या जागा, याबदद्लच्या सर्व आठवणी जाग्या झाल्याचं तो आपला भाऊ फहाद इस्माईल पोन्नाथला सांगत होता.

"गेल्या शुक्रवारी डिन्स अव्हेन्यूमधील अल नूर मशिदीत नेहमीप्रमाणे गेले होते. पुरुषांच्या विभागात तो आणि महिलांच्या विभागात ती, असं नेहमीप्रमाणे प्रार्थनेसाठी ते गेले होते. गोळीबार सुरू झाल्यावर नाझर बाहेर पडला आणि कुंपण ओलांडून शेजारच्या जागेत गेला. सुरुवातीला तो दहशतवाद्यांपैकी एक असावा, असं वाटून त्या जागेच्या मालकाने त्याला मज्जाव केला होता," असं पोन्नाथ सांगतो.

प्रतिमा मथळा अब्दुल नाझर (डावीकडचा) आणि पोन्नाथ

परंतु त्यानं त्या घराचा आसरा सोडून आपल्या पत्नीचा शोध घ्यायचं ठरवलं. त्याची बायको रस्त्यावर अचेतन अवस्थेत पडलेली त्याला दिसली. तो तिच्या दिशेने जाऊ लागला तेव्हा ती मरण पावल्याचं इतर लोकांनी त्याला सांगितलं. थोड्याच वेळात पोलीस तिथे आले. त्यांनी त्याच्यासकट सर्वांना बाजूला केलं.

"ती अत्यंत दयाळू आणि प्रेमळ होती," 34 वर्षांचा नाझर आपल्या तोडक्यामोडक्या इंग्लिशमध्ये सांगतो. "ती सगळ्यांशी प्रेमानं वागायची. नातलग, मित्र, कुटुंबीयांसाठी तिच्या मनात मोठी जागा होती. माझे आईवडील, भावंडाबद्दल तिला विशेष प्रेम होतं."

आता न्यूझीलंडमध्ये कायम राहायचं की परत यायचं, याबद्दल नाझरनं अजून काहीच ठरवलेलं नाही. पण कुटुंबाची कर्ती व्यक्ती गेल्यामुळं अलीबावाच्या कुटुंबाची काळजीही त्यालाच घ्यावी लागणार आहे.

'माझा नवरा अत्यंत प्रेमळ होता'

बुधवारी मोहम्मद इम्रान खान यांच्या 'इंडियन ग्रील' या दुकानासमोर फुलं आणि श्रद्धांजलीपर संदेशांचा ढीग साचला होता.

मूळचे भारतीय असणारे इम्रानभाई हे ख्राइस्टचर्चमधलं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मित्रपरिवारात ते इम्रानभाई म्हणून ओळखले जायचे. लीनवूड मशिदीत त्यांचा मृत्यू झाला.

"लोकांकडून मोठ्या प्रमाणावर संदेशांचा आणि सांत्वनपर संदेशांचा ओघ आला आहे. यातले कित्येक लोक माझ्या ओळखीचेही नाहीत. माझा नवरा अत्यंत प्रेमळ होता," असं त्याची पत्नी ट्रेसी सांगते.

"ते इथल्या भारतीय समुदायात प्रसिद्ध होते. त्यांच्यावर लोक प्रेम करायचे, हे मला माहिती होतं. पण इतकं प्रेम करत असतील, असं वाटलं नव्हतं."

आता त्यांनी त्यांची मुलं आणि नवऱ्याच्या नातेवाईकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

'हा देश सुरक्षित आहे'

"आपल्या आयुष्याचा बहुतांश काळ भारत आणि सौदी अरेबियामध्ये काढल्यानंतर मझरुद्दिन सय्यद अहमद जेव्हा न्यूझीलंडला पहिल्यांदा आला, तेव्हा हा देश इतका सुरक्षित आणि सर्वसमावेशक कसा असू शकतो, यावर विश्वास बसत नव्हता," असं तो सांगतो.

तो आपल्या मित्रांना सांगायचा, "तुम्ही लोक विमानतळांवर जायला घाबरता. इथं न्यूझीलंडमध्ये आम्हाला विमानतळावर जाणं एखाद्या आनंदी सहलीसारखं आहे. आम्हाला विमानतळं आवडतात, कारण हा देश सुरक्षित आहे."

"इथल्या लहानशा भारतीय मुस्लीम समुदायासाठी लिनवूड मशीद एखाद्या घरासारखी होती," असं सय्यद अहमद सांगतात. "शुक्रवारी तिथं जाणं आम्हाला आवडायचं. आम्ही प्रार्थना करत होतो..." बोलताना त्यांनी शेवटच्या शब्दांवर भार दिला...

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - न्यूझीलंड मशीद हल्ला: पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांची विशेष मुलाखत

"हा जगातला सर्वांत चांगला देश वाटायचा, इथं असं झालंच कसं, हे आम्हाला कळतच नाही," असं सय्यद अहमद सांगतात.

"तीन गोळ्यांचा आवाज ऐकल्यावर मी जागीच थिजलो. लोकांनी प्रार्थनेला सुरुवात केली, परंतु आपले कान दुसऱ्याच घटनेचा कानोसा घेत होते," असं ते सांगतात. "...हे सुरू असताना अचानक 'पळा, पळा' असं ओरडत एक माणूस आला. का माहिती नाही, पण आवाज ऐकूनही मी मुख्य दाराच्या दिशेने पळत सुटलो. हल्लेखोर आत आला तेव्हा मी दाराच्या जवळ स्टोरेजच्या जागेमध्ये थांबलो होता.

अब्दुल अझीज नावाच्या व्यक्तीनं हल्लेखोराच्या दिशेनं क्रेडिट कार्ड मशीन फेकल्यामुळं आपला जीव वाचला, असं ते मानतात. "पण त्याच वेळेस माझा मित्र माझ्यासमोर होता. क्षणार्धात रक्ताची चिळकांडी भिंतीवर उडाली आणि माझ्या डोळ्यांदेखत त्याचे प्राण गेले," असं ते सांगतात.

'त्यांनी काय पाप केलं होतं?'

या घटनेत अहमदाबादचे मेहबूब खोखर यांच्यासह बडोद्याचे रमीझ व्होरा आणि असिफ वोरा यांचाही मृत्यू झाला. मेहबूब आणि त्याची पत्नी अख्तर बेगम न्यूझीलंडमध्ये आपला मुलगा इम्रानला भेटायला दोन महिन्यांपूर्वी आले होते. त्यांचा मुलगा गेली अनेक वर्षे न्यूझीलंडमध्ये राहात आहे.

"तो एक चांगला माणूस होता", असं मेहबूबच्या शेजारी राहाणारा एक जण सांगतो. "मेहबूबचा या घटनेत मृत्यू झाला, हे त्याचे कुटुंबीय स्वीकारायला तयार नाहीत," असं तो सांगतो. "न्यूझीलंड हा एक शांत देश मानला जातो. इथं असं काही झालंच कसं?" असा प्रश्न त्यानं विचारला.

बडोद्यात जन्मलेले रमीझ व्होरा अनेक वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले होते.

प्रतिमा मथळा असिफ आणि रमीझ

बीबीसी गुजरातीशी बोलताना त्यांचे मोठे बंधू असिफ व्होरा म्हणतात, "माझा पुतण्या रमीझला नुकतीच मुलगी झाली, म्हणून असिफ आणि त्याची बायको 14 फेब्रुवारी रोजी तिकडे गेले होते.

रमीझ न्यूझीलंडमध्ये एका कारखान्यात काम करत होता. असिफची पत्नी बडोद्यामध्ये इन्शुरन्स एजंट आहे.

"आमच्या कुटुंबातील सदस्यांचे प्राण गेले आहेत. सरकारनं दोषींना फाशी दिली तरीही ते परत येणार नाहीत. त्यांनी काय चूक केली होती म्हणून त्यांना मारलं? जगभरात प्रेम आणि शांतता नांदो, अशी आम्ही प्रार्थना करत आहोत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)