उत्तर कोरियावरील अतिरिक्त निर्बंध ट्रंप यांनी हटवले

ट्रंप Image copyright Getty Images

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियावरील नुकतेच लावलेले निर्बंध हटवले आहेत.

याबद्दल त्यांनी शुक्रवारी ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या ट्रिझरीने लावलेल्या अतिरिक्त निर्बंधांचा उल्लेख आहे.

गुरुवारी अमेरिकेच्या ट्रिझरीने चीनमधील दोन शिपिंग कंपन्यांवर निर्बंध लादले होते. अमेरिकेने उत्तर कोरियावर लावलेल्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याने या शिपिंग कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती.

उत्तर कोरियाने या संदर्भात कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी हे निर्बंध महत्त्वाचे असल्याचं म्हटलं होतं. जहाज उद्योगाने उत्तर कोरियाचे बेकायदेशीर जलवाहतूक हालचाली रोखण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत असं त्यांनी म्हटलं होतं. उत्तर कोरियावरील निर्बंधांतून पळवाट काढण्यासाठी या कंपन्यांनी प्रयत्न केले होते. या घोषणेनंतर उत्तर कोरियाने इंटर कोरियन लायजन ऑफिसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण याचा आणि निर्बंधांचा काही संबंध आहे का हे कळू शकलेलं नाही.

या कार्यालयातून उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील अधिकारी विविध विषयांवर संवाद साधतात.

ट्रंप काय म्हणाले?

ट्रंप यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. ते म्हणाले, "अमेरिकेच्या ट्रिझरीने उत्तर कोरियावर अतिरिक्त निर्बंध लादले आहेत. हे अतिरिक्त निर्बंध मागे घेण्याचे आदेश मी दिले आहेत." व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी नेमके कोणते निर्बंध हटवले आहेत, याबद्दल माहिती दिलेली नाही. त्या म्हणल्या, "हे निर्बंध आवश्यक आहेत, असं ट्रंप यांनी वाटत नाही."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)